निःस्वार्थ पशुसेवेची २७ वर्षे पूर्ण : श्री कामाजी शिरगिरे यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा संपन्न

निःस्वार्थ पशुसेवेची २७ वर्षे पूर्ण : श्री कामाजी शिरगिरे यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा संपन्न

मारोती एडकेवार 
जिल्हा प्रतिनिधी नांदेड 

 नांदेड :बिलोली पशुधनाच्या आरोग्य संवर्धनासाठी तब्बल २७ वर्षे निष्ठेने, प्रामाणिकपणे आणि निःस्वार्थ भावनेने सेवा बजावणारे पशुसंवर्धन विभागातील ज्येष्ठ कर्मचारी श्री कामाजी मोगलगोंडा शिरगिरे हे दिनांक ३१ जुलै २०२६ रोजी नियत वयोमानानुसार शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झाले. त्यांच्या गौरवशाली सेवापूर्ती निमित्त कुंचनवार फार्म हाऊस सभागृह, बिलोली येथे आयोजित करण्यात आलेला निरोप व सत्कार समारंभ अत्यंत उत्साहपूर्ण व भावनिक वातावरणात संपन्न झाला. अतिशय प्रतिकूल आर्थिक परिस्थितीत जन्मलेल्या श्री शिरगिरे यांचे बालपण संघर्षमय होते. त्यांचे वडील कै. मुगलकोंडा शिरगिरे व आई कै. गुजाबाई शिरगिरे यांच्या कष्टाळू संस्कारात ते वाढले. बालवयात गुरे राखण्याचे काम करून त्यांनी जीवनातील कठीण परिस्थितीचा सामना केला. अनेक ठिकाणी सालगडी म्हणून काम करत असतानाच शिक्षणाची जिद्द कायम ठेवली. माजी उपप्राचार्य श्री आत्माराम वानोळे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी दहावीची परीक्षा उत्कृष्ट गुणांनी उत्तीर्ण केली. त्यानंतर नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, कारला खुर्द शाखेत तात्पुरत्या सेवक पदावर कार्यरत असताना तेथील व्यवस्थापक श्री पठाण साहेब यांच्या मार्गदर्शनामुळे आणि स्वतःच्या कर्तृत्वाच्या बळावर त्यांनी शासकीय पशुवैद्यकीय सेवेत प्रवेश मिळविला. शासकीय सेवेत कार्यरत असताना सगरोळी, कोलंबी आणि कासराळी या भागांत त्यांनी मुक्या प्राण्यांच्या आरोग्य संवर्धनासाठी उल्लेखनीय कार्य केले. पशुपालकांना वेळोवेळी मार्गदर्शन, उपचार आणि सेवाभावी वृत्तीमुळे त्यांनी जनमानसात विश्वासाचे स्थान निर्माण केले. कर्तव्यनिष्ठा, प्रामाणिकपणा आणि सेवाभाव या गुणांमुळे त्यांनी सहकारी अधिकारी, कर्मचारी तसेच पशुपालकांचा स्नेह व आदर संपादन केला.
सेवापूर्ती गौरव समारंभाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा पशुसंवर्धन विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. सखाराम खुणे, पशुधन विकास अधिकारी डॉ. विजय कचरे, डॉ. शंकर उदगीरे, डॉ. रमेश चौरे, डॉ. स्वामी मॅडम, डॉ. बालाजी मोरे, डॉ. दीपक जाधव, माजी उपप्राचार्य श्री आत्माराम वानोळे, श्री मारुती सोमशेट्टी, श्री बालाजी पिटलेवाड, डॉ. हिंगणे यांच्यासह विभागातील अनेक अधिकारी, कर्मचारी, मान्यवर उपस्थित होते. तसेच श्री शिरगिरे यांचे आप्तेष्ट, नातेवाईक, मित्रपरिवार, मुली, जावई व कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन प्रा. डॉ. गोपाळ चौधरी यांनी केले.
कौटुंबिक जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडत श्री शिरगिरे यांनी आपल्या चार मुली व एका मुलाला उच्च शिक्षण देऊन आत्मनिर्भर बनविले. त्यांच्या सर्व पाल्यांनी विविध शासकीय सेवांमध्ये मानाचे स्थान प्राप्त केले असून, त्यांच्या यशामागे श्री शिरगिरे यांचे कष्ट, त्याग आणि शिक्षणावरील दृढ विश्वास असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
यावेळी मान्यवरांनी श्री शिरगिरे यांच्या प्रदीर्घ, निष्ठावान व जनहितकारी सेवेला उजाळा देत त्यांच्या भावी आयुष्यासाठी उत्तम आरोग्य, आनंदी, निरामय व दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या. संपूर्ण सेवाकाळात मुक्या प्राण्यांच्या आरोग्यरक्षणासाठी त्यांनी दिलेले योगदान पशुसंवर्धन विभागासाठी प्रेरणादायी असून, त्यांची कार्यशैली पुढील पिढीसाठी आदर्शवत राहील, अशा भावना उपस्थितांनी व्यक्त केल्या.

Previous Post Next Post