नेवाशाच्या सर्वसामान्य आणि कष्टकरी जनतेचा सहृदयी 'विठ्ठल'...!एकाच 'रिंग'मध्ये फोन उचलणारे किंवा 'कॉल बॅक' करणारे आमदार विठ्ठलराव वकीलराव लंघे...!पण नेवासकरांनो...! तुमचं चुकलंच बरं का...!खरं तर पंधरा वर्षे आधी विठ्ठलरावांना संधी मिळायला हवी होती...!

नेवाशाच्या सर्वसामान्य आणि कष्टकरी जनतेचा सहृदयी 'विठ्ठल'...!

एकाच 'रिंग'मध्ये फोन उचलणारे किंवा 'कॉल बॅक' करणारे आमदार विठ्ठलराव वकीलराव लंघे...!

पण नेवासकरांनो...! तुमचं चुकलंच बरं का...!

खरं तर पंधरा वर्षे आधी विठ्ठलरावांना संधी मिळायला हवी होती...! 

(विशेष वृत्त प्रशांत बाफना 8055440385)

आतापर्यंतच्या अनेक पंचवार्षिक निवडणुकीत आणि त्या प्रत्येक निवडणुकीनंतर तुम्ही - आम्ही अनेक प्रकारचे लोकप्रतिनिधी पाहिले आहेत. त्या प्रत्येकांचा 'ॲटिट्यूड', त्यांच्या पीए अर्थात स्वीय सहाय्यकाचा तोरा, आमदार साहेबांनी कोणाशी बोलायचं कोणाला टाळायचं, हे सारं मनमानीपणे ठरविण्यात पटाईत असलेले आमदारांचे पीए आणि पुढच्या दाराने भेटायला आलेल्या सामान्य गरजवंतांची भेट न घेताच आमदार महोदयांचं स्वतःच्याच संपर्क कार्यालयाच्या मागच्या दारानं पळ काढणं आणि 'साहेब खूप 'बिझी' आहेत', अशी सारवासारव करणारे त्यांचे पीए. वैताग आणणारं आहे हे सारं. पण नेवासा तालुक्याचे आमदार विठ्ठलराव लंघे आतापर्यंतच्या सर्वच लोकप्रतिनिधींपेक्षा फारच वेगळे आहेत. खरं तर तुम्हाला खोटं वाटेल, पण नेवाशाच्या सर्वसामान्य आणि कष्टकरी जनतेचा सहृदयी 'विठ्ठल' असलेले आमदार विठ्ठलराव लंघे हे एकाच रिंगमध्ये फोन उचलतात. काही अपवादात्मक परिस्थितीत आमदार लंघे यांना फोन घेणं शक्य नसेल तर संबंधित व्यक्तीला ते न चुकता 'कॉल बॅक' करायलाही अजिबात विसरत नाहीत. अशा सरळमार्गी आणि सहकार्याची भावना असलेल्या लोकप्रतिनिधीची निवड करताना नेवासकरांनो, तुमचं जरा चुकलंच बरं का. कारण पंधरा वर्षे आधी विठ्ठलरावांना संधी मिळायला हवी होती, हे विसरुन चालणार नाही.

सर्वसामान्य जनतेला एका लोकप्रतिनिधीकडून फार मोठ्या अपेक्षा नसतात. त्या लोकप्रतिनिधीने जनतेचे प्रश्न गंभीरपणे समजून घेत ते प्रश्न सोडविण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करण्याची सामान्य जनतेची अपेक्षा असते. किंबहुना लोकप्रतिनिधीने तसा सामान्य जनतेला विश्वास तरी द्यायला हवा असतो. दुर्दैवानं काही लोकप्रतिनिधी स्वतःला 'मालक' समजू लागले आहेत. खरं तर लोकशाहीचा हा खूप मोठा अपमान आहे. विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी लोकप्रतिनिधी आणि त्यांचे कार्यकर्ते मतदारांचे सातत्यानं उंबरठे झिजवतात. गोड गोड बोलून मतदारांना आश्वासनाची खैरात वाटतात. या काळात मोठ्या प्रमाणात 'लक्ष्मी दर्शन' होत असल्याच्या चर्चांना उधाण येतं. अर्थात 'तेरी भी चुप अन् मेरी भी चुप' यातला हा कार्यक्रम असल्यामुळे या गोष्टी फारशा चव्हाट्यावर येत नाहीत. येनकेन प्रकारे ही मंडळी सत्ता मिळवतात आणि सत्तेत गेल्यानंतर सामान्य जनतेला अक्षरशः मूर्खात काढतात. 

या सर्व उदासीन परिस्थितीमध्ये नेवाशाचे आमदार विठ्ठलराव लंघे यांच्या माध्यमातून या तालुक्यातल्या सर्वसामान्य जनतेला मोठा आशेचा किरण दिसत आहे. आमदार लंगे निदान फोन तरी घेतात किंवा फोन घेणं शक्य झालं नाही तर संबंधित व्यक्तीला ते पुन्हा फोन करतात. हा खरं तर त्यांचा 'प्लस पॉईंट' आहे. सामान्य जनतेचं गाऱ्हाणं लोकप्रतिनिधीने ऐकून घेतलंच पाहिजे. कारण लोकसेवक या नात्यानं हे त्यांचं प्राथमिक कर्तव्य आहे. आमदार झाल्यानंतर राज्यपालांच्या उपस्थितीत पद आणि गोपनीयतेची शपथ ज्यावेळी घेतली जाते, त्यावेळी निवडून आलेले आमदार 'मी कोणाचाही द्वेष करणार नाही. सर्वांना सोबत घेऊन तालुक्याचा विकास करीन. सर्व जाती धर्मातल्या लोकांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करीन', मात्र अनेक लोकप्रतिनिधी या पद आणि गोपनीयतेच्या शपथेविरुद्ध वागतात. आम्ही तर काही लोकप्रतिनिधी असे पाहिले आहेत, की त्यांना सकाळी फोन केला तर ते विचारतात, की कोण बोलतंय? दुपारी, संध्याकाळी फोन केला तरी त्यांचा तोच प्रश्न असतो रात्री फोन केला तरीही त्यांचा तोच प्रश्न असतो. नेवाशाचे आमदार विठ्ठलराव लंघे हे अशा लोकप्रतिनिधींच्या अगदी विरुद्ध आहेत.

प्रश्न असा आहे, एखाद्या जबाबदार लोकप्रतिनिधीच्या मोबाईलवर 'ट्रू कॉलर' हे 'ॲप' का नसावं? आपल्याला नक्की कोणाकोणाचे फोन येत आहेत, त्याचं काय काम आहे, त्यांची नक्की समस्या काय आहे, हे जाणून घेण्याचे साधे कष्टही हे लोकप्रतिनिधी का घेत नाहीत? तुमच्या आमच्या मोबाईल फोनमध्ये शेकडो कॉन्टॅक्ट नंबर 'सेव्ह' असतात. मग लोकप्रतिनिधींच्या मोबाईलमध्ये स्वतःच्या मतदारसंघातल्या सर्वच नाही पण निवडक लोकांचे त्यातल्या त्यात पत्रकारांचे नंबर अशा लोकप्रतिनिधींच्या मोबाईल फोनमध्ये सेव्ह का असू नयेत? 'आपल्याला लोकांची नाही तर लोकांना आपली गरज आहे', अशा 'ॲटिट्यूड'मध्ये हे लोकप्रतिनिधी आणि त्यांचे पीए असतात. विधानसभा निवडणूक जवळ आली, की मतदारसंघातल्या लोकांशी छान छान बोलायचं, जिथं गरज आहे तिथे पैशांचं वाटप करायचं, जिथं कोणी ऐकत नसेल त्या संबंधितांना 'साम, दाम, दंड आणि भेद' अशा मार्गांचा वापर करत कोणत्याही परिस्थितीत निवडणूक जिंकायचीच, अशा मानसिकतेत हे लोकप्रतिनिधी असतात. मात्र अशा लोकप्रतिनिधींना मतदारसुद्धा थारा न देता घरीच बसवतात. 

आमदार विठ्ठलराव लंघे मात्र या अशा लोकप्रतिनिधींपेक्षा खूपच निराळे आहेत. कोणीही फोन केला तरी ते पहिल्याच रिंगमध्ये फोन उचलतात. विशेष म्हणजे फोन उचलणं शक्य नसल्यास ते आवर्जून संबंधित माणसाला 'कॉल बॅक' करतात. असं असलं तरीही या निमित्तानं आमदार विठ्ठलराव लंघे यांना जाहीरपणे सांगावसं वाटतं, की हे एवढंच पुरेसं नाही. ठीक आहे, तुम्ही लोकांच्या भावनेचा आदर करता, हे शंभर टक्के योग्य आहे. पण याला जोड म्हणून मतदार संघातल्या जनतेला मूलभूत सुविधादेखील मिळाल्या पाहिजेत. कारण तुम्ही 'कामाचा माणूस' असल्यामुळे तुमच्याकडून मतदार संघातल्या जनतेच्या खूप मोठ्या अपेक्षा आहेत. जो माणूस आपलं ऐकतो, त्यालाच लोक आपल्या समस्या सांगतात. मात्र जो काय माणसांना टाळतो, त्याला लोक अजिबात महत्त्व देत नाहीत. विधानसभेची निवडणूक होऊन आता जेमतेम दोन वर्षांचा कार्यकाळ लोटला आहे. उर्वरित तीन वर्षांमध्ये आमदार लंघेंना नेवासा विधानसभा मतदारसंघात खूप काम करायची आहेत. अपूर्ण पाणी योजना मार्गी लावायची आहे. रस्त्यांची कामं पूर्ण करायची आहेत. हे सर्व करण्यासाठी 'रात्र थोडी आणि सोंग फार', अशी परिस्थिती असल्यामुळे आमदार विठ्ठलराव लंघे यांना 'रात्रीचा दिवस' करावा लागणार आहे
Previous Post Next Post