*भोई गौरवचा वधू-वर विशेषांक प्रकाशित...*
* मुख्य संपादक चंद्रकांत लोणारे यांचा अभिष्टचिंतन सोहळा
देवळी प्रतिनिधी :-
(रविंद्र पारीसे)
भोई गौरव मासिकाच्या राज्यस्तरीय वधू-वर परिचय विशेषांकाचे प्रकाशन आणि मासिकाचे मुख्य संपादक चंद्रकांत लोणारे यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळा हनुमान नगर येथील गृहिणी समाज सभागृहात उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाला राष्ट्रीय मत्स्यजीवी सहकारी संघ, नवी दिल्लीचे अध्यक्ष प्रकाश लोणारे, मासिक स्वर्ण संदेशचे संपादक विवेक डुमरे तसेच साहित्यिक व कवी डॉ. बळवंत भोयर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले.
यावेळी चंद्रकांत लोणारे यांचा संपादक मंडळ आणि उपस्थित मान्यवरांच्या वतीने सत्कार करण्यात आला. राष्ट्रीय मत्स्यजीवी सहकारी संघाच्या अध्यक्षपदी प्रकाश लोणारे यांची दुसऱ्यांदा निवड झाल्याबद्दल भोई गौरव मासिकाच्या वतीने शाल व मानचिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी अन्य मान्यवरांचाही सत्कार करण्यात आला.
प्रास्ताविकात चंद्रकांत लोणारे यांनी भोई गौरव मासिकाच्या आठ वर्षांच्या वाटचालीचा आढावा घेतला. मासिकाच्या माध्यमातून समाजातील विविध विषयांना व्यासपीठ देण्यासोबतच नियमित प्रकाशन आणि महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांपर्यंत मासिक पोहोचविण्याचे काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी प्रकाश लोणारे, डॉ. बळवंत भोयर आणि विवेक डुमरे यांनी वधू-वर परिचय विशेषांकाच्या दर्जेदार मांडणीचे कौतुक केले. भोई गौरव मासिकाने आठ वर्षांपासून सातत्याने प्रकाशन सुरू ठेवले असून, त्याला भोई समाजाचे मुखपत्र म्हणून मान्यता मिळाल्याचे त्यांनी नमूद केले. मासिकाच्या माध्यमातून दरवर्षी सुमारे ५० ते ६० विवाह जुळत असल्याचाही उल्लेख त्यांनी केला.
वधू-वर परिचय विशेषांक गेल्या पाच वर्षांपासून प्रकाशित करण्यात येत असून, या माध्यमातून अनेक विवाह जुळले आहेत. समाजातील युवक-युवती आणि त्यांच्या पालकांसाठी हा उपक्रम उपयुक्त ठरत असल्याचे मान्यवरांनी सांगितले.
कार्यक्रमाला नागपूरसह विदर्भातील वधू-वरांचे पालक आणि समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी विशेषांकाचे कौतुक केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मासिकाचे सहसंपादक प्रा. राहुल गौर यांनी केले. आभार गजानन गळवेकर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहसंपादिका चित्रा मेश्रे, अनुप बावणे, विलास भडके, वैभव घोडे आणि मृणाल लोणारे यांनी परिश्रम घेतले.

