जिद्दीच्या तालावर थिरकणारी रश्मी "
(प्रशांत बाफना विभागीय संपादक 8055440385)
." संगीत ऐकता येत नसलं तरी ताल अनुभवता येतो,हे आपल्या पावलांनी सिद्ध करणार्या व जन्मतः कर्णबधिर असलेल्या रश्मी पाटीलची प्रेरणादायी यशोगता तपशीलात विशद करणार्या या अभ्यासपूर्ण लेखाचा सुसूत्र,सविस्तर गोषवारा असा:—
अर्चना पाटील यांची कन्या रश्मी पाटील ही जन्मतः कर्णबधिर तर तिचा भाऊही दिव्यांग आहे.दोन दिव्यांग मुलांना वाढवताना अर्चना पाटील यांना रोज नवी आव्हानं समोर यायची.डाॅक्टर, तपासण्या,उपचार,
शाळा,प्रवास,मुलांच्या गरजा आणि त्यांचं भविष्य याचा विचार करताना कधी कधी दिवस अपुरा पडायचा, पण अर्चना यांनी परिस्थितीला दोष न देता दोन्ही मुलांच्या क्षमतेवर विश्वास ठेवला. रश्मीच्या आयुष्यात अडचणी मात्र इथेच थांबल्या नाहीत. कर्णबधिरत्वासोबत वयाच्या पहिल्या वर्षापासून तिला तीव्र अर्धशिशीचा त्रास आहे.वर्षातून अनेकदा तीला रूग्णालयात दाखल व्हावं लागतं. आठवीपासून लो बीपीचा त्रासही सुरू झाला आहे.२०२४ मध्ये झालेल्या व्हायरल इन्फेक्शनमुळे तिच्या उजव्या कानाची उरलेली ऐकण्याची शक्तीही गेली.तरीही या सगळ्यामुळे रश्मीची वाटचाल थांबलेली नाही.रश्मीच्या या प्रवासामागे तिची आई अर्चना पाटील यांचीही तितकीच मोठी धडपड आहे.रश्मीला शिकवताना अर्चना पाटील यांनी तिच्यासाठी मुखवाचनाचा आधार घेतला,तिला सतत समजून घेतलं आणि सर्वसामान्य मुलांप्रमाणे संधी मिळावी यासाठी प्रयत्न केले. रश्मीला कर्णबधिर म्हणून त्यांना वाढवायचं नव्हतं.तिला तिच्या क्षमतेनुसार जगता यावं,स्वतःच्या पायावर उभं राहता यावं या त्यांच्या निर्धारामुळेच रश्मीच्या आयुष्याला वेगळी दिशा मिळाली.
रश्मीने सहाव्या वर्षापासून भरतनाट्यमचं प्रशिक्षण घ्यायला सुरूवात केली,पण कर्णबधिर मुलीला संगीतावर आधारित नृत्य शिकवणं हे मोठं आव्हान होतं.रश्मीला सूर ऐकू येत नव्हते, त्यामुळे ताल समजून घेण्यासाठी तिच्यासाठी शिकण्याची पद्धत वेगळी होती.पावलांची हालचाल,शरीराच्या हालचाली,हातवारे,
दृश्य संकेत,तालाची मोजणी आणि जाणवणारी स्पंदनं यांच्या आधाराने तिने नृत्य आत्मसाद केलं. संगीत ऐकता येत नसलं तरी ताल अनुभवता येतो,हे तिने आपल्या पावलांनी सिद्ध केलं.ऐकू न येणार्या रश्मीने ताल मनात पकडला आणि तो आपल्या पावलांत उतरवला.ज्या कलेत शिकण्याची तिला वेगळ्या पद्धतीची गरज होती,त्याच कलेचं शिक्षण ती पुढे इतरांना देऊ लागली.हा तिच्या प्रवासातला एक महत्त्वाचा टप्पा होता.
बारावीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर रश्मीने 'नृत्ययोग सूत्र ' हा डिप्लोमा केला.आर्ट टीचर ट्रेनिंग,मेकअप, ज्वेलरी मेकिंग, चाॅकलेट,मेणबत्त्या,
साबण अशा अनेक गोष्टींचं प्रशिक्षण घेतलं.आज ती 'रश्मीज आर्ट ' च्या माध्यमातून हस्तनिर्मित दागिने,मेणबत्त्या,
साबण,सजावटीच्या वस्तू आणि चाॅकलेट्स तयार करते.नृत्यांगना, कला शिक्षिका,योग प्रशिक्षिका,मेकअप आर्टिस्ट,उद्योजिका आणि माॅडेल अशा अनेक भूमिका ती एकाच वेळी निभावते आहे.आज रश्मीने भारतभर ५० हून अधिक वेळा रंगमंचावर भरतनाट्यम सादर केलं आहे.राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये तिने यश मिळवलं. विविध पुरस्कारांनी तिचा गौरव झाला. 'हिरकणी सन्मान' पासून राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कारांपर्यंत तिच्या कामाची दखल घेतली गेली.'गुगल इंडिया टाॅक शो' साठी तिची निवड झाली.राष्ट्रपती भवनात झालेल्या " पर्पल फेस्ट २०२५ " मध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत सादरीकरण करण्याची संधीही तिला मिळाली. " जगातील सर्वोत्कष्ट कर्णबधिर भरतनाट्यम नृत्यांगना "म्हणून मिळालेली ओळख तिच्या जिद्दीचीच पावती आहे.रश्मीला ऐकू येत नाही,पण तिच्या पावलांचा ताल हजारो लोकांपर्यंत पोहोचतो आणि म्हणूनच रश्मीचा प्रवास सांगतो,अडथळे आयुष्य थांबवू शकतात, पण जिद्द असेल तर स्वप्नांचा प्रवास थांबत

