माझा पोरगा अधिकारी होऊन लाल दिव्याच्या गाडीत येईल.. पण पार्थिवच अ‍ॅम्ब्यूलन्समध्ये आलं, आईचा ह्रद्य पिळवटून टाकणारा टाहो...एमपीएससीची तयारी करणार्‍या तरुणाने नैराश्येतून जीवन संपवलं; अभिजीत दिपकेंचा मोठा इशारा.

माझा पोरगा अधिकारी होऊन लाल दिव्याच्या गाडीत येईल.. पण पार्थिवच अ‍ॅम्ब्यूलन्समध्ये आलं, आईचा ह्रद्य पिळवटून टाकणारा टाहो...

एमपीएससीची तयारी करणार्‍या तरुणाने नैराश्येतून जीवन संपवलं; अभिजीत दिपकेंचा मोठा इशारा.

(बीड/प्रशांत बाफना : विभागीय संपादक)


माझा मुलगा कलेक्टर बनून लाल दिव्याच्या गाडीत येणार होता मात्र तो अ‍ॅम्बुलन्समध्ये आला... असे काळीज पिनळवटून टाकणार्‍या भावना प्रथमेशच्या आईने व्यक्त केल्या. आर्थिक विवंचना आणि आणि आरक्षण याच दोन मुद्यांमुळे माझ्या मुलाने आत्महत्या केली, असा अरोप प्रथमेशच्या आईने केला. 


धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्यातील खासापूरी येथील एमपीएससी परीक्षेची तयारी करत असलेल्या प्रथमेश देशमुख (वय 29) याने पुण्यात आर्थिक अडचण आणि मानसिक तणावामुळे आपले जीवन संपवले पुण्यात राहून तो गेल्या काही काळापासून स्पर्धा परीक्षांची तयारी करीत होता. देशमुख कुटुंबावर काही लाखांचे कर्ज होते. शेतीचे नुकसान, परीक्षांचे पेपर सतत पुढे ढकलणे, अशा गोष्टींमुळे प्रथमेश चिंतेत होता. त्याच नैराश्येतून त्याने टोकाचे पाऊल उचलले. 


प्रथमेश अधिकारी होऊन लाल दिव्याची गाडी घेऊन घरी येईल, असे आम्हाला वाटले होते. पण आज दिवा असणार्‍या अ‍ॅम्ब्युलन्समधून त्याचे पार्थिव आणण्यात आले. पुण्याला जाण्याआधी त्याने शेतात फेरफटका मारला होता. गेल्या वर्षी तुरीचे पीक वाहून गेले होते. पिकासहित मातीही वाहून गेली होती. यावर्षी पाणी नाही म्हणून पीक वाळून गेले होते. त्याने घरी आल्यावर मला याच गोष्टी सांगितल्या होत्या. घर संसार कसा चालवायचा, याबद्दल त्याला काळजी वाटत होती. 


निसर्गाच्या पुढे कुणी जात नसते. तू काळजी करू नकोस तुझे दाजी तुला महिन्याला पैसे पाठवताहेत. तू घरची चिंता करू नको. तू अभ्यास कर, असे मी त्याला समजावले होते. पण त्याच्या मनात नैराश्येने घर केले होते. असे टाहो फोडत प्रथमेशच्या आईने सांगितले. 


प्रथमेशची बहीण म्हणाली, “ आठ दिवसांपूर्वी तो गावाकडे येऊन गेला होता. त्यावेळी आम्ही दोघांनीही गप्पा मारल्या. पुण्यात असताना त्याला आम्ही सारखा सारखा फोन करत नसायचो. अभ्यासात व्यत्यय नको म्हणून 15 दिवसांतून एकदा बोलणे व्हायचे घरून पुण्याला जाताना तो नाराजच होता. पुण्याला पोहोचल्यावर एकदा बोलणे झाले होते. त्यावेळीही तो नाराज असल्याचे फोनवरून जाणवले.” असही प्रथमेशची बहीण म्हणाली. 


व्यवस्थेने घेतलेला बळी: कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी प्रथमेश देशमुख यांच्या मुळ गावी धाराशिव जिल्ह्यातील खासापूरी (ता.परंडा) येथे त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. अभिजीत दिपके यांच्यासमोर प्रथमेशच्या आईने अत्यंत काळीज चिरणारा टाहो फोडला. “ माझा मुलगा अधिकारी बनून लाल दिव्याच्या गाडीतून गावात परत येणार होता, पण तो रुग्णवाहिकेतून (अ‍ॅम्ब्यूलन्स) आला” अशा शब्दांत त्यांनी आपले दु:ख व्यक्त केले.


कुटुंबीयांच्या सांत्वना नंतर अभिजीत दिपके यांनी माध्यमांशी बोलताना म्हणाले ही केवळ आत्महत्या नसून “ व्यवस्थेने केलेला मर्डर” आहे, असा गंभीर आरोप अभिजीत दिपके यांनी सरकारवर केला. परीक्षा वेळेवर न होणे आणि विद्यार्थ्यांच्या आर्थिक- मानसिक कोंडीकडे दुर्लक्ष करणे यांमुळेच महाराष्ट्रातील तरुणांना असे पाऊल उचलावे लागत आहे, असा संताप त्यांनी व्यक्त केला. 


राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा : प्रथमेशला न्याय मिळवून देण्यासाठी आणि एमपीएससी परीक्षा पद्धतीतील गोंधळाविरोधात सीजेपी विद्यार्थ्यांसह राज्यव्यापी तीव्र आंदोलन छेडणार असल्याची घोषणा दिपके यांनी केली. तसेच त्यांनी इतर स्पर्धा परीक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांना कोणत्याही परिस्थितीत असे टोकाचे पाऊल न उचलण्याचे व एकत्र येऊन लढण्याचे आवाहन केले
Previous Post Next Post