वसंतवाडी तांड्यावर सोलर पॅनल कोसळून चिमुकला गंभीर जखमी!..
सोलर पॅनलखाली दबला तीन-चार वर्षांचा विराट प्रकाश राठोड; दोन्ही पायांना गंभीर दुखापत..
सोलरच्या कामाच्या दर्जावर गंभीर प्रश्नचिन्ह; बोगस कामाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाईची ग्रामस्थांची मागणी..
वसंतवाडी तांड्यावर सोलर पॅनल कोसळून चिमुकला गंभीर जखमी!..
(जळगाव तालुका प्रतिनिधी )
वसंतवाडी तांडा, ता. जळगाव :
वसंतवाडी तांडा येथे उभारण्यात आलेले सोलर पॅनल अचानक कोसळल्याची धक्कादायक घटना घडली. या दुर्घटनेत अवघ्या तीन ते चार वर्षांचा चिमुकला विराट प्रकाश राठोड सोलर पॅनलखाली दबला गेला. या दुर्घटनेत विराटच्या दोन्ही पायांना गंभीर दुखापत होऊन पाय मोडल्याची माहिती समोर आली आहे.
अचानक सोलर पॅनल कोसळल्याने चिमुकला त्याखाली दबला गेला. परिसरातील नागरिकांनी तत्काळ धाव घेत त्याला बाहेर काढले. या घटनेमुळे वसंतवाडी तांड्यावर हळहळ व्यक्त होत असून, सोलर पॅनलची सुरक्षितता आणि त्याच्या कामाच्या दर्जाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
सोलरचे काम बोगस असल्याचा ग्रामस्थांचा गंभीर आरोप
सदर सोलरचे काम निकृष्ट व बोगस पद्धतीने करण्यात आल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. सोलर पॅनल उभारण्यासाठी वापरण्यात आलेले साहित्य, लोखंडी सांगाडा, फाउंडेशन, जोडणी आणि संपूर्ण बांधकामाची तांत्रिक तपासणी करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.
सोलर उभारण्यासाठी किती निधी मंजूर झाला? काम कोणत्या एजन्सी किंवा कंत्राटदाराने केले? कामाचे अंदाजपत्रक काय होते? प्रत्यक्षात कोणते साहित्य वापरण्यात आले? कामाची गुणवत्ता तपासणी कोणी केली? काम पूर्ण झाल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी पाहणी केली होती का? या सर्व बाबींची चौकशी होणे आवश्यक आहे.
“हा सोलर आमच्या हद्दीत नाही” अशी भूमिका
या घटनेनंतर ग्रामसेवक बबन राजू वाघ आणि सरपंच विनोद शिवाजी पाटील यांनी सदर सोलर आपल्या हद्दीत नसल्याचे सांगितल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात येत आहे.
मात्र, सोलर नेमका कोणाच्या अखत्यारित आहे, त्याची देखभाल कोणाची जबाबदारी आहे, त्यासाठी परवानगी कोणी दिली आणि कामाची गुणवत्ता तपासण्याची जबाबदारी कोणाची होती, हे प्रशासनाने अधिकृत चौकशीतून स्पष्ट करावे, अशी मागणी होत आहे.
विराटच्या अपघाताला जबाबदार कोण?
अवघ्या तीन-चार वर्षांच्या चिमुकल्या विराट प्रकाश राठोडच्या अंगावर सोलर पॅनल कोसळून त्याच्या दोन्ही पायांना गंभीर दुखापत होणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. त्यामुळे या दुर्घटनेची केवळ अपघात म्हणून नोंद न करता संपूर्ण सोलर प्रकल्पाची तांत्रिक व प्रशासकीय चौकशी करण्यात यावी.
ग्रामसेवक बबन राजू वाघ आणि सरपंच विनोद शिवाजी पाटील यांची या प्रकरणातील नेमकी भूमिका काय आहे, त्यांच्यावर कोणती प्रशासकीय जबाबदारी होती किंवा नव्हती, याचीही चौकशी करण्यात यावी.
दोषी आढळल्यास तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी
या दुर्घटनेत सोलरचे काम निकृष्ट असल्याचे किंवा कोणत्याही व्यक्तीच्या निष्काळजीपणामुळे ही दुर्घटना घडल्याचे चौकशीत सिद्ध झाल्यास संबंधित ग्रामसेवक, सरपंच, कंत्राटदार किंवा इतर जबाबदार व्यक्तींवर कायद्यानुसार तात्काळ गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्यात यावी, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
तसेच चिमुकला विराट प्रकाश राठोड याच्या उपचाराचा संपूर्ण खर्च मिळवून देण्यासाठी प्रशासनाने तातडीने मदत करावी आणि त्याच्या कुटुंबाला योग्य ती नुकसानभरपाई मिळवून द्यावी, अशीही मागणी करण्यात येत आहे.
चिमुकल्या विराटच्या दोन्ही पायांना गंभीर दुखापत होण्याइतकी ही घटना गंभीर आहे. त्यामुळे “जबाबदारी आमची नाही” असे सांगून प्रकरणाकडे दुर्लक्ष न करता सोलरची तांत्रिक तपासणी, निधी व कामाच्या कागदपत्रांची चौकशी करून सत्य जनतेसमोर आणावे. दोषी आढळणाऱ्यांवर कोणताही मुलाहिजा न ठेवता कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी संतप्त मागणी वसंतवाडी तांडा येथील ग्रामस्थांकडून होत आहे.

