जामखेडमध्ये जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी; अखंड मराठा समाजाची नियोजन बैठक संपन्न..
(अहिल्यानगर। प्रशांत बाफना विभागीय संपादक)
मराठा आरक्षणाच्या मागणीवर ठाम राहत संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मुंबईच्या दिशेने एल्गार पुकारला आहे. येत्या १९ सप्टेंबर रोजी मुंबईतील ऐतिहासिक आझाद मैदानावर होणाऱ्या उपोषणासाठी मनोज जरांगे पाटील जामखेड मार्गे मुंबईकडे रवाना होणार आहेत. या पार्श्वभूमीवर जामखेड शहर व तालुक्यातील मराठा बांधवांकडून त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात येत असून, त्यांच्यासोबत मुंबईकडे जाणाऱ्या मराठा बांधवांसाठी विविध प्रकारची मदत व सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने रविवार दि. १३ सप्टेंबर रोजी अखंड मराठा समाज जामखेडच्या वतीने नियोजन बैठक घेण्यात आली.
या बैठकीत मनोज जरांगे पाटील यांच्या स्वागतासह त्यांच्या सोबत असलेल्या मराठा बांधवांसाठी पाणी, बिस्किटे, नाष्टा व इतर खाद्यपदार्थांची व्यवस्था करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच शहर व तालुक्यातील विविध ठिकाणी स्वागत कमानी, बोर्ड उभारण्याचे नियोजन करण्यात आले.
मनोज जरांगे पाटील हे दि. १५ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री बीड जिल्ह्यातील पाटोदा येथे मुक्कामासाठी थांबणार असून, दि. १६ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी जामखेड येथून मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहेत. त्यांच्या या प्रवासाच्या पार्श्वभूमीवर मोहा, रेडेवाडी तसेच परिसरातील गावांच्या वतीने मोहा फाटा येथे स्वागत कमानी उभारण्यात येणार आहेत. तसेच साकत फटा याठिकाणी धोत्री, सावरगाव, साकत यासह परिसरातील मराठा बांधवांकडून मनोज जरांगे पाटील यांचे स्वागत करण्यात येणार असून, रॅलीमध्ये सहभागी होणाऱ्या मराठा बांधवांसाठी पाणी बॉटल, बिस्किटे तसेच विविध खाद्यपदार्थांचे वाटप करण्यात येणार आहे.
मनोज जरांगे पाटील यांचे जामखेड शहरात आगमन होताच शहरातील विविध ठिकाणी मराठा बांधवांकडून त्यांचे स्वागत करण्यात येणार आहे. यामध्ये मार्केट कमिटी, विश्वक्रांती चौक, बीड कॉर्नर, जयहिंद चौक, खर्डा चौक, शंभुराजे कुस्ती संकुल, पंचायत समिती कार्यालयासमोर, एस.टी. बस स्थानक, नगर रोड, पंचदेवालय चौक तसेच पाटोदा-अरणगाव या ठिकाणांचा समावेश आहे.
शहरातील विविध चौकांमध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणात स्वागत कमानी व बोर्ड लावण्यात येणार आहेत. तसेच जामखेड शहरासह तालुक्यातील अनेक मराठा बांधवांनी मुंबईकडे जाणाऱ्या मराठा बांधवांसाठी पाणी बॉटल, बिस्किटे, नाष्टा तसेच इतर आवश्यक खाद्यपदार्थांची व्यवस्था करण्याचे नियोजन केले आहे.
दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांच्या जामखेड मार्गे होणाऱ्या मुंबई दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शहर व तालुक्यातील मराठा बांधवांमध्ये मोठा उत्साह निर्माण झाला असून, त्यांच्या स्वागतासाठी विविध ठिकाणी नियोजनाला वेग आला आहे. रविवारच्या बैठकीस जामखेड तालुक्यातील अनेक मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चौकट
मदतीसाठी केले आवाहन
मनोज जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी तसेच मुंबईकडे जाणाऱ्या मराठा बांधवांसाठी ज्या नागरिकांना आणखी काही प्रकारची मदत करायची असेल, त्यांनी अखंड मराठा समाज जामखेड यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे

