पाणी पितोय, पण उपोषण सोडणार नाही, जरांगे पाटील हैदराबाद गॅझेट प्रमाणपत्राचे वाटप सुरू होऊ द्या मग बघू..

पाणी पितोय, पण उपोषण सोडणार नाही, जरांगे पाटील 

हैदराबाद गॅझेट प्रमाणपत्राचे वाटप सुरू होऊ द्या मग बघू..


(अंतरवली सराटी । प्रशांत बाफना विभागीय संपादक )


मराठा आरक्षणाबाबत मनोज जरांगे पाटील यांनी पाच दिवसांपासून उपोषण सुरु केले आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनस्थळी बुधवारी आमदार प्रसाद लाड यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी हैदराबाद गॅजेटनुसार कुणबी प्रमाणपत्र देण्याचे सुरु करणार असून जरांगे पाटील यांच्या सर्व अटी सरकारने मान्य केल्याची माहिती यावेळी प्रसाद लाड यांनी दिली आहे. परंतु, यावेळी मनोज जरांगे पाटील आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. किमान चार प्रमाणपत्र दिल्याशिवाय उपोषण सोडणार नाही असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. हैदराबाद गॅझेट प्रमाणपत्राचे वाटप सुरू होऊ द्या मग बघू, असंही ते म्हणाले. इतकंच काय तर हैदराबाद गॅझेट प्रमाणपत्राचं वाटप मराठवाड्यातून सुरू व्हावं, असंही मनोज जरांगे पाटील पुढे म्हणाले. पाणी पितो पण उपोषण सोडणार नाही, यावर मनोज जरांगे पाटील ठाम राहिले. सर्व मागण्या मान्य केल्याशिवाय उपोषण थांबणार नाही असे त्यांनी जाहीर केले.

ओबीसी समाजाला ज्या -ज्या सवलती मिळतात त्या सर्व सवलती मराठा समाजाला देखील मिळणार हैदराबाद गॅझेनुसार कुणबी प्रमाणपत्र मिळाले पाहिजेत, ती अट देखील सरकारने यावेळी मान्य केली आहे. हैदरबाद गॅझेटनुसार प्रमाणपत्र मिळतील असं प्रसाद लाड यांच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

परभणी आणि लातूरमधील सर्व शाळांना सुट्टी;
बीड, धाराशिव आणि नांदेडमध्ये बंदची हाक
जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरु आहे. जरांगे पाटील यांची प्रकृती सातत्याने खालावत असल्याने मराठा समाज आक्रमक झाला आहे. सरकारच्या उदासीनतेचा निषेध करण्यासाठी गुरुवारी संपूर्ण मराठवाड्यात बंद पाळला जात आहे. परभणी आणि लातूर जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. परभणी, लातूर, बीड, धाराशिव आणि नांदेड या पाच प्रमुख जिल्ह्यांमध्ये बंदची हाक देण्यात आली आहे. संपूर्ण मराठवाड्यात या आंदोलनाचे तीव्र पडसाद उमटत आहेत. सर्वत्र कडकडीत शुकशुकाट पाहायला मिळत आहे. मराठवाड्यातील बिघडती परिस्थिती पाहता पोलीस प्रशासनाकडून सर्व महत्त्वाच्या चौक, महामार्ग आणि सरकारी कार्यालयांबाहेर कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. जरांगे पाटील यांच्या उपोषणावर तोडगा न निघाल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी दिला आहे
Previous Post Next Post