श्रीकृष्णाच्या बाललीलांनी अकलूदची पोदार स्कूल झाली ‘गोकुळनगरी’
परंपरा, संस्कार आणि शिक्षणाचा सुंदर संगम; जन्माष्टमी उत्साहात साजरी.
(महाराष्ट्र राज्य सहसंपादक सुरेश पाटील यावल)
यावल दि. ४ (सुरेश पाटील) — *“गोविंदा आला रे आला…”*च्या जयघोषात यावल तालुक्यातील अकलूद येथील पोदार इंटरनॅशनल स्कूलमध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव भक्तिमय व उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देतानाच भारतीय संस्कृती, परंपरा आणि नैतिक मूल्यांची ओळख करून देणारा हा उपक्रम ठरला.
जन्माष्टमीच्या निमित्ताने इयत्ता पहिली व दुसरीच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी राधा-कृष्णाची आकर्षक वेशभूषा धारण करून श्रीकृष्णाच्या बाललीला साकारल्या. नटखट कान्हा आणि राधेच्या मनमोहक रूपामुळे शाळेचा परिसर जणू गोकुळनगरीतच परिवर्तित झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
‘गोवर्धन लीला’ने वेधले लक्ष
कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरले ते इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेले ‘गोवर्धन लीला’ हे नृत्य-नाट्य. प्रभावी अभिनय, नृत्य आणि संवादाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत उचलून गोकुळवासीयांचे रक्षण केल्याची पौराणिक कथा सादर केली. या सादरीकरणाला उपस्थितांकडून उत्स्फूर्त दाद मिळाली.
यानंतर चिमुकल्या गोपाळांनी दहीहंडी फोडून उत्सवात आणखी रंगत आणली. ‘गोविंदा आला रे!’च्या जयघोषाने शाळेचा परिसर दुमदुमून गेला.
उत्सवातून संस्कारांची शिकवण
यावेळी शाळेचे प्राचार्य सचिन बनसोडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना भगवान श्रीकृष्णाच्या जीवनातील प्रेम, मैत्री, धैर्य, कर्तव्यनिष्ठा, सत्य आणि सदाचार या मूल्यांचे महत्त्व स्पष्ट केले. केवळ पाठ्यपुस्तकातील शिक्षण नव्हे, तर भारतीय संस्कृती आणि महान व्यक्तिमत्त्वांच्या विचारांतून विद्यार्थ्यांमध्ये चांगले संस्कार रुजणेही तितकेच महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.
श्रीकृष्ण जन्माष्टमीसारख्या सांस्कृतिक उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना आपल्या परंपरा समजतात, इतिहास व पौराणिक कथांची ओळख होते तसेच अभिनय, वक्तृत्व, नृत्य आणि सांघिक सहभागातून आत्मविश्वास व नेतृत्वगुण विकसित होतात. त्यामुळे शिक्षणासोबत संस्कारांची जोड देणारा हा उपक्रम पालक आणि विद्यार्थ्यांसाठी विशेष ठरला.
विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग, आकर्षक वेशभूषा, नृत्य-नाट्य सादरीकरण आणि दहीहंडीच्या उत्साहामुळे पोदार इंटरनॅशनल स्कूलमधील श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव आनंद, भक्तिभाव आणि संस्कारमय वातावरणात अविस्मरणीय ठरला, असे प्रसिद्धीपत्रकात प्राचार्य सचिन बनसोडे यांनी नमूद केले आहे.

