*पुणे तेथे सारेच उणे?*
(रोखठोक प्रशांत बाफना 8055440385)
दिल्लीतील तीन घटना आणि पुण्यातील दोन घटनांनी देश हादरला असून कायदा व न्यायव्यवस्था याबाबत समाजात गंभीर चर्चा सुरू झाली आहे. पहिल्या घटनेत स्वतंत्र भारद्वाज या गुंडानं जंतरमंतरवरील आंदोलनात सहभागी निशू नावाच्या मुलीच्या वडिलांचं डोकं फोडलं. मुलीनं तक्रार केली पण काहीच झालं नाही. मध्यंतरी स्वतंत्र भारद्वाजचा एक व्हिडिओ व्हायरल झाला. ज्यात तो स्वतः सांगतोय की, त्याच्यावर हाफ मर्डरची केस झाली पाहिजे होती, पण नाही झाली. त्याच्या डोक्यावर कपिल मिश्रा आणि चिराग पासवान यांचा हात आहे. तो पंतप्रधान नरेंद्र मोदींशीही ओळख असल्याचं सांगतो. दुसऱ्या घटनेत दिल्लीत एट पीएम न्युज चॅनेलच्या दोन पत्रकार महिलांनी मुख्यमंत्री रेखा गुप्तांविषयीची बातमी प्रसिध्द केली म्हणून दिल्लीत पोलीसांकडून त्यांना मारहाण करण्यात आली. तर तिसर्या घटनेत माजी आयएएस अधिकारी आशिष जोशींना ट्विट केल्यानं सकाळी मॉर्निंग वॉक करताना अटक करण्यात आली होती. जंतरमंतरवरील आंदोलनात अमानवी पद्धतीनं मुलांना मारहाण केल्यानंतर आता कळस रचणाऱ्या अशा अनेक घटना पुढे येत आहेत. पुण्यात सामाजिक कार्यकर्ते संतोष पंडीत यांना रस्त्यात उभा राहून खड्ड्यांविषयी आवाज उठवला म्हणून, भावना दुखवल्या गेल्यामुळे मध्यरात्री अटक करून पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. दुसरीकडं सातत्यानं डिजेविरोधात आवाज उठवणाऱ्या विद्यानंद बापटांना एका मुलाखतीदरम्यान मारहाण करण्यात आली. काय सुचवताय या पाचही घटना ?
गणेशोत्सवादरम्यान होणाऱ्या ध्वनीप्रदूषणाला विरोध करत डीजेवर बंदी घालण्याची मागणी करणारे विद्यानंद बापट अन् पुण्यातील विविध प्रश्नांवर मंत्र्यांसह अनेकांना धारेवर धरणारे संतोष पंडित यांनी गेल्या काही दिवसांपासून राज्यातील जनतेला विचार करायला भाग पाडले आहे. या देशातील जनतेची अवस्थाच अतिशय वाईट होत चालली आहे. सारेच निकष बदलत चालले आहे. बापाने कष्ट केलेले पिक उन्हाने करपलं जात आहे. पोराचा पेपर व्यवस्थेनेच फोडला. मीडिया डीजेचा मुद्दा धरून बसली. पीक विम्याचे निकष बदलत गेले. त्याबाबत प्रश्न विचारणाऱ्याला देशद्रोही ठरवले जाते. अशी जर वास्तविकता असेल तर कसं होणार या देशाचं ? एकूणच लाज आणणारा प्रकार आहे सारा. लोकशाहीमध्ये सरकारवर टीका करणं, प्रशासनाला जाब विचारणं, सार्वजनिक प्रश्न मांडणं, आंदोलन करणं किंवा एखाद्या धोरणाला विरोध करणं हा नागरिकांचा अधिकार आहे. असं असताना एकीकडं जिथं अटक करून कारवाई करण्यात यायला पाहिजे होती, तिथं खुलेआम गुन्हेगार व्हिडिओ काढून गुन्हाची कबुली देतो, तरी शांतता आहे. दुसरीकडे सामान्य माणसाच्या प्रश्नांना घेऊन आवाज उठवला तर संतोष पंडीत सारख्यीला तुरुंगात डांबलं जातयं, विद्याधर बापटाला मारहाण करण्यात येत आहे. एकुणचं हुकुमशाहीच्या दिशेने वाटचाल तर सुरू झाली असे म्हणायला हरकत नाही. तोंडातून अपशब्द निघाला की प्रशासन जागं होतं, पण रस्त्यावर खड्डा पडून माणसाचा जीव गेला की प्रशासन झोपतं का? हा सवाल आता सामान्य माणूस विचारतोय. अपशब्द बोलले म्हणून रातोरात अटक होते, कारवाई होते, म्हणजे प्रशासन किती तत्पर आहे हे दिसून येतं. रस्ता खराब आहे, काम निकृष्ट आहे, अतिक्रमण आहे हे सगळं दिसत असूनही कारवाई होत नाही; पण एखाद्याच्या तोंडून अपशब्द निघाला की प्रशासन लगेच कामाला लागतं. मग कायदा फक्त बोलणाऱ्यांसाठीच आहे का? सामान्य माणसाचा सवाल एवढाच आहे की, अपशब्दांवर एवढी तत्परता दाखवणाऱ्या प्रशासनानं एखाद्याचा जीव वाचवण्यासाठीही कधीही अशी तत्परता दाखवली नाही. एकीकडं महाराष्ट्रातल्या मोठ्या नेत्याच्या अपघाती मृत्यूवर एफआयआर व्हावी म्हणून एवढे प्रयत्न झाले, चर्चा झाली. पण काहीतरी कारवाई झाली का ? दुसरीकडं कांबळे ताईंनी रात्री यूट्यूबवर एक व्हिडिओ बघितला काय, व्हिडिओमध्ये तिसऱ्या व्यक्तीला अपशब्द वापरल्याचा आरोप झाला काय, लगेच कारवाई झाली व आरोपीला अटक झाली आणि पुढं पाच दिवसांची पोलीस कोठडीही मिळाली. विशेष म्हणजे हा सगळा प्रकार पुण्यातच घडतोय. 'पुणे तिथे काय उणे' असे म्हणण्याऐवजी आता 'पुणे तेथे सारेच काही उणे' अशी अवस्था झाली आहे. चंद्रकांतदादा पाटील, गोपीचंद पडळकर यांना जाब विचारले अन राग भलत्यांनाच आला. कांबळे ताईंच्या तक्रारीत असं काय वजन आहे की, पोलीस रात्रीच कामाला लागले? पुण्यातील गणेश उत्सव आणि ध्वनीप्रदूषण हा प्रश्न आता ‘उत्सवाचा अधिकार विरुद्ध शांततेने जगण्याचा अधिकार’ या स्वरूपात चर्चेला येताना दिसतो आहे. बापट किंवा त्यांच्यासारखी इतर अनेक मंडळी समाजात नागरी जाणीव व नागरिक सक्रियता वाढावी, यासाठी प्रयत्न करताना दिसतात. बापट यांनी मुलाखतीत वारंवार वापरलेला ‘व्यक्तिकेंद्रित आक्षेप’ घेण्याची तार्किक चूक हा मुद्दाच त्यांच्या विरोधकांना निष्प्रभ करणारा ठरतो. म्हणजेच युक्तवादाला उत्तर देण्याऐवजी त्या व्यक्तीच्या चारित्र्य, व्यक्तिमत्त्व, जात, धर्म, शिक्षण, नास्तिक, हेतू इत्यादींवर हल्ला करणे, पण बापट तर समस्येवर चर्चा करा असे सांगतात. समस्या कोण सांगतो येथे गौण असते. पण त्यांचा तार्किक युक्तीवाद कोणीही करताना दिसत नाहीत. त्याऐवजी त्यांना पाखंडी, परंपराभंजक, धर्मविरोधी, डावा, दिमागी नक्षल, नास्तिक, पुण्याबाहेरून आलेला, उत्सवविरोधक, अव्यहारिक इत्यादी विशेषणे लावली गेली. म्हणून तर बापट यांच्या मराठीची शुद्धता, संस्कृत व इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व, बहुशाखीय अभ्यास, तार्किक युक्तिवाद इत्यादी गुणांचे कौतुक करून त्यांच्या मुख्य मुद्याची धार कमी केली जात आहे. यापासून सावध होणे गरजेचे आहे!
*कार्यसिद्धी’साठी सतत लढत रहावे लागणार!*
विद्याधर बापटांच्याच भाषेत सांगायचे तर, ‘कार्यसिद्धी’साठी सतत लढत राहणे हे अंतिम उत्तर आहे. धर्म व संस्कृतीच्या अंगाने सुरू झालेल्या परंपरा व रुढी सार्वजनिक ठिकाणी साजरा करण्यास विद्यानंद बापट हिरिरीने करत असलेला विरोध घातक मानला जातो आहे. कारण हे परंपराजन्य उत्सव, कर्मकांडे, विधी इत्यादींच्या पाठीमागे असलेले अर्थकारण व त्यावर उभे असलेले राजकारण त्यामुळे संपुष्टात येत आहे. यानिमित्ताने संतोष पंडित व विद्याधर बापट आता पुण्याचे हीरो ठरत आहेत. त्यांच्या समर्थनार्थ आणि कारवाईच्या विरोधात पुणेकरांनी व विरोधकांनी आवाज उठवला आहे. सामान्य नागरिकांचे व कार्यकर्त्यांचे प्रश्न मांडणाऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सरकार करत आहे, असा आरोप विरोधकांनी केला आहे. तसेच या दोन्ही घटनांचा निषेध करत नागरिकांनी संतोष पंडित आणि विद्यानंद बापट यांच्या पाठीशी असल्याचे जाहीर केले आहे. पण मायबाप सरकार मात्र अजूनही ढीम्म असल्याचे जाणवू लागले आहे. म्हणूनच आता म्हणावेसे वाटते की, तुका म्हणे आता उगी रहा, जे जे होईल ते ते पहा

