शहादेकरांसाठी धोक्याची घंटा, पाटबंधारे विभागाचे पाण्यावर 10% कपातीचे आवाहन; पण पालिका अजूनही सुस्त...
नंदुरबार जिल्हा विभागीय उपसंपादक
प्रा. डी. सी. पाटील
शहादा: यावर्षीच्या दुष्काळाचे गांभीर्य लक्षात घेता तापी नदीवरील सारंगखेडा बेरीज मधील पाणी साठा लक्षात घेऊन शहादा नगरपालिकेला दैनंदिन पाणी वापरात दहा टक्के कपात करण्याचे व पाणी काटकसरीने वापरण्याबाबतचे आवाहन पाटबंधारे विभागाने दिले आहे. मात्र, अद्याप पालिकेकडून त्या संदर्भातील कोणतीही हालचाल नसल्याने पाणी दुर्भिक्षाचे गांभीर्य अद्याप पालिका प्रशासनाला दिसून येत नाही.
*सारंगखेडा प्रकल्पाची सद्यस्थिती काय:*
सारंगखेडा मध्यम प्रकल्पाचा आजचा उपयुक्त पाणीसाठा 80.18 दलघमी आहे. सारंगखेडा मध्यम प्रकल्प आज रोजी 87.33% भरेलला आहे. दर वर्षी डिसेंबर महिन्या पर्यंत नदी प्रवाहित असते त्यामुळे प्रकल्प 100% भरलेला असतो. परंतु यावेळी अल-नीनोच्या प्रभावामुळे पाऊस कमी पडला आणि त्यामुळे सारंगखेडा मध्यम प्रकल्पच्या वरच्या बाजूस असलेले सुलवाडे मध्यम प्रकल्प, शेळगाव बॅरेज, हातनूर प्रकल्प यांनी गेट बंद केल्यामुळे नदीमधील पाण्याचा प्रवाह महिन्याभरापासून बंद आहे.
*पाणी वाटपाचे गणित आणि दुष्काळाचे पत्र:*
जलसंपदा विभागाचा दि. 05 ऑक्टोबर 2026 च्या शासन निर्णयानुसार राज्यातील 265 तालुक्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे. नंदुरबार जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचा त्यात समावेश आहे. त्या अनुषंगाने संभाव्य दुष्काळ सदृश्य परिस्थिती लक्षात घेता प्रथम प्राधान्य पिण्याच्या पाण्याला आहे. द्वितीय प्राधान्य औद्योगिकसाठी तर तृतीय प्राधान्य सिंचनासाठी आहे.
*सारंगखेडा प्रकल्पातील पाण्याचे नियोजन:*
सारंगखेडा मध्यम प्रकल्पातील असलेल्या जलसाठ्यातील पाणी शहादा व दोंडाईचा नगरपरिषद, इतर ग्रामीण पाणीपुरवठा व इतर वापर असा एकूण - 14.393 दलघमी बिगर सिंचनासाठी आरक्षित असते. बाष्पीभवनामुळे जाणारे पाणी सुमारे 16.37 दलघमी (यावेळी जास्त कडक उन्हाळा राहणार असल्याने त्यात वाढ होईल) तर भविष्यकालीन वापरासाठी बफर स्टॉक 20.72 दलघमी आहे.
सारंगखेडा मध्यम प्रकल्प आत्तापर्यंत 396 शेतकऱ्यांना दीर्घकालीन हंगामी पिकांसाठी 9.36 दलघमी पाणी परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे सुमारे 60.843 दलघमी पाण्याचा वापर यावर्षी अपेक्षित आहे.
*31 ऑक्टोबर 2027 पर्यंत पिण्याचे पाणी सुरक्षित, पण...*
दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता दोंडाईचा व शहादा शहरांसाठी पिण्याच्या पाण्यासाठी 31 ऑक्टोबर 2027 पर्यंत कमतरता भासणार नाही. परंतु जलाशयातून अनाधिकृत उपसा होत आहे, त्यावर आळा घालण्यासाठी पाटबंधारे विभागामार्फत गस्ती पथकाची निर्मितीही करण्यात आलेली आहे. त्यानुसार अनधिकृत पाणी उपसा करणाऱ्यांवर कार्यवाही होणार आहे. मात्र, तीव्र उन्हामुळे होणाऱ्या बाष्पीभवनाच्या वेग लक्षात घेता पाटबंधारे विभागामार्फत दोंडाईचा व शहादा नगर परिषद आतापासूनच दैनंदिन पाणी वापरत दहा टक्के कपात करण्याचे व पाणी काटकसरीने वापरण्याबाबतचे आवाहन 5 ऑक्टोबरला पत्राद्वारे केले आहे.
सध्या शहरात दोन दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. पाण्याची दुर्भिक्ष लक्षात घेता पालिकेने जर पाणी कपातीचा निर्णय घेत तीन दिवसाआड पाणीपुरवठा केला तर यावर्षी नागरिकांना पाण्याची कोणतीही अडचण येणार नाही असे जाणकारांचे मत आहे. मात्र, हे करीत असताना पाण्याची नासाडी करणाऱ्या नागरिकांना योग्य ती समज किंवा दंडात्मक कारवाई करणे अत्यावश्यक आहे.
मात्र पालिकेच्या बेफिकिरीमुळे ऐन उन्हाळ्यात शहरवासीयांना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
*पालिका नियम व नागरिकांची जबाबदारी :*
महाराष्ट्र पाणी पुरवठा अधिनियम :
पिण्याच्या पाण्याचा अपव्यय करणे, नळ उघडा सोडणे, मोटारीने अनधिकृत उपसा करणे - कलम ४२ नुसार दंडनीय आहे. पालिका दंड आकारू शकते.
शहादा नगरपरिषदेने तातडीने काय करावे ?
सर्व प्रभागात सरसकट ३ दिवसाआड पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक जाहीर करावे. १०% कपातीचा ठराव घेऊन जाहीर आवाहन करावे. नळाला तोटी न लावणाऱ्या, पाणी रस्त्यावर सोडणाऱ्यांवर रु. ५०० दंड वसूल करावा (नियमात तरतूद आहे).
नागरिकांनी काय करावे :
नळाला तोटी बसवा, टाकी भरल्यावर नळ बंद करा. गाडी धुणे, अंगण धुणे यासाठी पिण्याचे पाणी वापरू नका. लिकेज दिसल्यास तात्काळ पालिकेला कळविण्याची जबाबदारी पार पाडावी.

