शहाद्यात दुष्काळाची दाहकता: २६ एकर ऊस, पपई, केळीवर रोटाव्हेटर; ८ महिने मुलासारखं जपलेलं पीक मातीत..

शहाद्यात दुष्काळाची दाहकता: २६ एकर ऊस, पपई, केळीवर रोटाव्हेटर; ८ महिने मुलासारखं जपलेलं पीक मातीत..

नंदुरबार जिल्हा विभागीय उपसंपादक
प्रा. डी. सी. पाटील 

शहादा (प्रतिनिधी): नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यात दुष्काळाने रौद्ररूप धारण केले आहे. पाण्याअभावी शेतकऱ्यांवर उभ्या पिकांवर रोटाव्हेटर फिरवण्याची हृदयद्रावक वेळ आली आहे.
       शहादा तालुक्यातील कवठळ तर्फे शहादा येथील प्रगतशील शेतकरी विनोद जाधव चौधरी यांनी पाण्याअभावी आपल्या २६ एकर क्षेत्रातील ऊस, पपई आणि केळी पिकावर रोटाव्हेटर फिरवला. आठ महिने मुलाप्रमाणे जपलेल्या पिकांवर रोटाव्हेटर फिरवताना या शेतकऱ्याला अक्षरशः अश्रू अनावर झाले होते.
  *नेमकं काय घडलं:*
       विनोद चौधरी यांचे एकूण ६० एकर क्षेत्र आहे. त्यापैकी ६ एकरवर ऊस, १२ एकरवर पपई, ८ एकरवर केळी तर ३० एकरवर कापूस आणि मिरचीची लागवड त्यांनी केली होती.
       शेतातील दोन बोअरवेलच्या जोरावर त्यांनी तब्बल आठ महिने पिकांचे मुलाप्रमाणे संगोपन केले. मात्र गेल्या दोन आठवड्यांपासून भूगर्भातील पाणी पातळी खालावल्याने दोन्ही बोअरवेल आटले.
       पिके वाचवण्यासाठी त्यांनी ६०० फूट खोल असलेले तब्बल चार नवीन बोअरवेल खोदले. यासाठी त्यांनी ३ लाख रुपये खर्च केले, मात्र एकाही बोअरवेलला थेंबभरही पाणी लागले नाही. डोळ्यादेखत पीक करपत असल्याचे पाहून अखेर त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतला.
       *लाखोंचं नुकसान, कर्जाचा डोंगर*
६ एकर ऊसासाठी ८ महिन्यात - ३ लाख रुपये खर्च
१२ एकर पपईसाठी - ९ लाख रुपये खर्च
८ एकर केळीसाठी - ६ लाख रुपये खर्च
       कर्ज काढून उभी केलेली फळबाग हातची गेल्याने लोकांचे पैसे कसे फेडायचे? या विवंचनेत ते सापडले आहेत.
"आम्हाला शासनाच्या कुठल्याही अनुदानाची भीक नको. आम्हाला कुठलीही मदत नको, आम्हाला फक्त शेताच्या बांधापर्यंत पाणी द्या," अशी आर्त हाक विनोद चौधरी यांनी सरकारला दिली आहे.
*प्रशासन सुस्त, शेतकरी त्रस्त*
       यंदा शहादा तालुक्यात पावसाची ५१ टक्क्यांपेक्षा जास्त तूट आहे. जिल्ह्यात सर्वात कमी पर्जन्यमान शहादा तालुक्यात नोंदवले गेले आहे. तापी नदीपात्रात पाणी असतानाही ते शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचवण्यात प्रशासन अपयशी ठरले आहे. त्यामुळे आसमानी संकटाबरोबर सुलतानी संकटालाही शेतकऱ्यांना सामोरे जावे लागत आहे.
       आज जरी पीक वरून हिरवे दिसत असले तरी त्यापासून मिळणारे उत्पन्न अत्यल्प असणार आहे. त्यातून झालेला खर्चही निघणार नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. विशेष म्हणजे कृषी विभागातील वरिष्ठ अधिकारी अजूनही शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचलेले नाहीत. केवळ कनिष्ठ कर्मचारी जाऊन औपचारिक पंचनामे करत असल्याने पंचनाम्यांवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
Previous Post Next Post