रावेर पोलिसांची दमदार कारवाई! शेतातील वीजतार चोरीप्रकरणी दोघांना अटक.
५० हजार रुपये किमतीच्या वीजतार चोरीचा उलगडा; २६ किलो तारांचे तुकडे जप्त.
(जळगाव जिल्हा प्रतिनिधी । जितु इंगळे)
रावेर : शेतशिवारातील विद्युत खांबांवरील अॅल्युमिनियमच्या वीजतारा चोरी करणाऱ्या दोघांना रावेर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली आहे. या कारवाईत चोरीच्या गुन्ह्यातील २६ किलो वीजतारांचे तुकडे जप्त करण्यात आले असून, आरोपींकडून आणखी चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
रावेर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर क्रमांक २२५/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम १३६ अन्वये ६ मे २०२६ रोजी वीजतार चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. अग्रवाल पावर प्रा. लि. येथे साईट सुपरवायझर म्हणून कार्यरत असलेले फिर्यादी राजेंद्र रामदास ठाकूर (रा. भादली, ता. जि. जळगाव) यांनी याबाबत तक्रार दिली होती. भोर शिवारातील गट क्रमांक ८६१ मध्ये भोर ते अजंदा रस्त्यालगत असलेल्या विद्युत खांबांवरील सुमारे ५० हजार रुपये किमतीच्या अॅल्युमिनियमच्या वीजतारा अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्या होत्या.
या गुन्ह्याचा तपास सुरू असताना रावेर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांनी गुन्हे शोध पथकाला तपासाच्या सूचना दिल्या. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले; मात्र घटनास्थळ शेतशिवारात असल्याने ठोस माहिती मिळत नव्हती.
दरम्यान, जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली शेतशिवारातील मोटारपंप व वीजतार चोरी करणाऱ्या टोळ्यांचा शोध घेण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत होती. या मोहिमेअंतर्गत रावेर शहरातील भंगार दुकाने तसेच संशयित चोरट्यांची तपासणी करण्यात येत होती.
गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई
१४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री गस्तीवर असताना पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांना रावेर-अजंदा रस्त्यावर काही संशयित व्यक्ती फिरत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार पोलिस पथकाने तपासणी केली असता जुबेर रमजान तडवी आणि शरीफ राजू तडवी (दोघेही रा. विवरे, ता. रावेर) हे आढळून आले. त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे वीजतारा कापण्यासाठी वापरले जाणारे कटर व पक्कड आढळून आले.
दोघांना पोलिस ठाण्यात आणून चौकशी केली असता, वीजतार चोरी करण्याच्या उद्देशाने आल्याचे त्यांनी सांगितल्याची माहिती पोलिसांनी दिली. तसेच, दोन ते तीन महिन्यांपूर्वी भोर ते अजंदा रस्त्यावरील वीजतारा चोरी केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी नमूद केले.
आरोपी जुबेर तडवी याचे विवरे गावात भंगाराचे दुकान असून, त्याच्याकडून चोरीच्या मालापैकी २६ किलो वीजतारांचे तुकडे जप्त करण्यात आले. दोन्ही आरोपींना अटक करून न्यायालयात हजर केले असता, त्यांना एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, आरोपींकडून आणखी चोरीचे गुन्हे उघडकीस येतात का, याकडे पोलिसांचे लक्ष आहे.
या पथकाने केली कारवाई
ही कारवाई पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलिस अधीक्षक संदीप गावित (जळगाव परिमंडळ) आणि फैजपूर विभागाचे पोलिस उपअधीक्षक अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
रावेर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संदीप पाटील, सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल बच्छाव, पोलिस हवालदार नितीन आमोदकर, विजय चौधरी तसेच गुन्हे शोध पथकातील पोलिस हवालदार समाधान ठाकूर, पोलिस कॉन्स्टेबल विकार शेख, श्रीकांत चव्हाण, प्रमोद पाटील, विशाल पाटील, सुकेश तडवी, तुषार पाटील आणि रुबाब तडवी यांनी या कारवाईत सहभाग घेतला. पुढील तपास पोलिस हवालदार विजय चौधरी करीत आहेत.

