ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरीचं रचना स्थान नेवासा...!
सोशल मिडियाच्या 'फेक अकाऊंट' वरुन होतंय बदनाम...!
पीआय प्रताप दराडे हे 'अकाऊंट' 'बॅन' करण्यासाठी पुढाकार घ्याच...!
(सडेतोड ,प्रशांत बाफना 8055440385 महाराष्ट्र राज्य विभागीय संपादक)
जगाला ज्ञानेश्वरी हा महान ग्रंथ ज्या पवित्र भूमीतून दिला गेला, साक्षात पांडुरंग परमात्मा संत ज्ञानेश्वरांच्या अवतारात ज्या पुण्य भूमीत प्रकटले, सच्चिदानंद बाबांच्या माध्यमातून ज्यांनी ज्ञानेश्वरी हा महान ग्रंथ ज्या नेवासे नगरीत लिहून भगवान श्रीकृष्णांनी पाच हजार वर्षांपूर्वी सांगितलेल्या श्रीमद् भगवतगीतेचं टिकात्मक विश्लेषण ज्या पुण्यभूमीतून जगासमोर आणलं गेलं, ती नेवासा नगरी पौराणिक दृष्टीने प्रचंड पवित्र आहे. कारण प्रत्यक्ष पांडूरंग परमात्मा याठिकाणी आले आणि ज्ञानेश्वरी ग्रंथाची रचना झाली. 'अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी' असं संत ज्ञानेश्वरांच्या आरतीमध्ये उगीचच म्हटलेलं नाही. असं असलं तरी ज्ञानेश्वरीचं रचना स्थान असलेली नेवासा नगरी दुर्दैवानं सोशल मिडियाच्या 'फेक अकाऊंट'वरुन प्रचंड बदनाम होत आहे. या पार्श्वभूमीवर नेवासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना या बातमीच्या माध्यमातून आम्ही जाहीर आवाहन करत आहोत, की नेवाशाची बदनामी करणारे सोशल मीडियावरचे हे सारे 'फेक' 'अकाऊंट' 'बॅन' करण्यासाठी नक्की् पुढाकार घ्याच.
आजकालच्या माहिती आणि तंत्रज्ञानाच्या (आयटी) युगात सारं काही सोपं झालं आहे. जग जवळ आलंय पण माणूस माणसापासून लांब जात आहे. कारण लोकशाहीनं दिलेल्या विविध प्रकारच्या स्वातंत्र्याचा गैरवापर करत हल्ली काही जण एकाच राजकीय पुढाऱ्याला खुश करण्यासाठी किंबहुना त्याचीच तळी उचलण्यासाठी आणि त्या माध्यमातून स्वतः 'मालामाल' होण्यासाठी कुठल्याही थराला जात आहेत. अगदी स्पष्ट शब्दांत सांगायचं झालं तर एका अतिउत्साही पत्रकाराने नेवासा या पवित्र नावाचा दुरुपयोग करत 'फेसबुक' या 'सोशल मीडिया प्लॅटफॉर्म'वर अनेक प्रकारचे 'फेक अकाऊंट' 'ओपन' केले आहेत. एकाच पुढाऱ्याची तळी उचलून हा अतिउत्साही पत्रकार त्याला जे वाटेल ते किंवा त्या पुढाऱ्याचे कार्यकर्ते जे सांगतील, तशा बातम्या काही वेळा 'ब्रेकिंग न्यूज' पसरविण्याचे नको ते उद्योग हा अतिउत्साही पत्रकार करत आहे. यामध्ये नेवासा या पवित्र नावाची सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचंड अशी बदनामी होत आहे. ती थांबविण्यासाठी कुठं तरी प्रयत्न होण्याची गरज आहे.
पत्रकारिता ही दुधारी तलवार (दोन्ही बाजूंनी धार असलेली) आहे. त्यामुळे पत्रकारितेची ही दुधारी तलवार चालवित असताना प्रत्येक पत्रकारांनी काळजी घ्यायला हवी आहे. कारण पत्रकारितेची ही दुधारी तलवार कशीही मारली तरी समोरच्या व्यक्तीची हत्या (चारित्र्य हनन) अटळ आहे. दुर्दैवानं अत्यंत बेजबाबदारपणे आज काल नेवासा या पवित्र नावाची बदनामी करण्याचं षडयंत्र पवित्र आणि लोकहितवादी असलेल्या पत्रकारितेच्या माध्यमातून केलं जात आहे. सर्वसामान्य माणसाला राजकीय पुढाऱ्यांच्या डाव आणि प्रतिडावांची काहीच कल्पना नसते. कारण रोजच्याच कामाच्या धबडग्यात सर्वसामान्य माणसाला याकडे लक्ष द्यायला कधीच वेळ मिळत नसतो. पत्रकारितेच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसांपर्यंत जे काही पोहोचविलं जातं, त्यावर विश्वास ठेवण्याशिवाय सर्वसामान्य माणसासमोर दुसरा कुठलाही पर्याय राहत नाही.
कामाच्या धबडग्यात या अशा बातम्यांची शहानिशा करण्यासाठी सर्वसामान्य माणसाला अजिबात वेळही नसतो. त्यामुळेच समजातल्या अशा काही अतिउत्साही पत्रकाराला चांगलंच 'बळ' मिळतं. एकाच राजकीय पुढाऱ्याला खुश करण्यासाठी हा अतिउत्साही पत्रकार सोशल मीडियावरुन नेवासा या पवित्र नावाची प्रचंड अशी बदनामी करत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर नेवासा किंवा नेवासकर या नावाने फेसबुकवर 'क्रिएट' करण्यात आलेल्या 'फेक अकाऊंट'ची सखोल चौकशी करुन हे 'फेक अकाउंट' पडद्याआडून नक्की कोण चालवतंय, यासाठी संबंधित अतिउत्साही पत्रकाराला किती 'बिदागी' दिली जाते, यातून या अतिउत्साही पत्रकाराने नेवासा शहरात किती ठिकाणी ठेकेदारीच्या माध्यमातून कामं केली आहेत, उदाहरणच द्यायचं झालं तर ड्रेनेजची आणि सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याच्या कामांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. अशा त्या कामांचा आजच्या काळात प्रत्यक्षात दर्जा कसा आहे, या अशा कामांवर किती खर्च झाला आहे आणि या कामांच्या माध्यमातून संबंधित अतिउत्साही पत्रकाराने नक्की किती 'माया' गोळा केली, याचा कसून तपास करण्याचं खरं तर नेवासा पोलिसांसमोर मोठं आव्हान आहे.
'त्या' अतिउत्साही पत्रकाराला कोण पुरवतंय 'रसद'...?
कोणाला प्रसिद्धी द्यायची, कोणाला बदनाम करायचं, कोणाला न्याय मिळवून द्यायचा, कोणत्या भ्रष्ट अधिकाऱ्यांचं कसं आणि किती प्रमाणात पितळ उघडं पाडायचं, कोणत्या नेत्याला किंवा अभिनेत्याला प्रसिद्धीच्या शिखरावर न्यायचं, कोणाला सुप्रसिद्ध करायचं, कोणाला कुविख्यात करायचं, हे सारं पत्रकार किंवा 'मीडिया पर्सन'च्या हातात असतं. हे करत असताना एखादा पत्रकार किंवा 'मीडिया पर्सन' पैशांच्या मागे लागला तर तो नक्कीच एकाला प्रसिद्धी देत असताना दुसऱ्याची बदनामी करणार, हे स्पष्ट आणि अधोरेखित आहे. नेवासा शहरातला 'तो' अतिउत्साही पत्रकारही याच पठडीतला आहे. त्याचा 'गॉडफादर' नक्की कोण आहे, कोण त्याला बातम्या पुरवतं, नक्की कोण त्याला यासाठी 'रसद' पुरवतं, हे माहित नाही, इतकी नेवाशाची जनता अडाणी आहे, असं अजिबात नाही. परंतू मांजराच्या गळ्यात घंटा बांधायची कोणी, हाच खरा प्रश्न आहे

