दसरा नीट काढा..
(प्रशांत बाफना/8055440385 विभागीय संपादक महाराष्ट्र राज्य)
: झाला एकदाचा गणेशोत्सव, निर्विघ्नं पार पडला. आता नवरात्रोत्सवाचे वेध लागतील. पब्लिकलाच नाही तर राजकर्त्यांना, व्यापारी आणि दुकानदारांना, देवींच्या देवस्थानांना. अशा सर्वांनाच. आजकाल लोक दसरा काढतात की नाही, माहिती नाही. ट्रेंन्डच बदलले आहेत. म्हणजे नवरात्र उत्सवात आता शहरातच नाही तर तालुका आणि गावोगाव सुद्धा रास दांडिया लागतात. रोज कुठल्या तरी रंगाची साडी घालून रास दांडीयाला खेळायला जायचे. महिला, पुरुष, लहान मुले, युवक युवती असे सगळेच. त्यासाठी मग कपडे खरेदी, स्पेशल हेअरस्टाईल, ब्युटी पार्लर, मेकअप, मेंहदी, टॅट्यू, नकली असली ज्वेलरी, कॉस्मेटिक, हॉटेलिंग आणखी काय काय. विचारु नका... जसा सरकारचा गोंधळ झालाय तसा प्रत्येक तरुण पोरा-पोरींचा सुध्दा झालाय. सगळे मूळ प्रश्नांपासून भरकटलेत. चांगलं वाईट हे स्वतःला ठरवता येत नाही. पुर्वी गाडीखालून कुत्रं चालायला लागलं की आजुबाजुची सगळी कुत्री त्या कुत्र्याला येऊन भुंकायची. आता कोणी काही म्हणण्याचा अवकाश, सगळी एका तालासुरात भुंकायला लागतात. आपल्या हिताचं काय? आपले प्रश्न काय? याचं काही कुणाला घेणं देणं नाही. तो भुंकतोय ना मग आपणही भुंकलच पाहीजे. हे असं आहे. जाऊद्या ‘झालं गेलं गंगेला मिळालं’ पण आता तरी जागरूक होऊ. निदान दसरा मेळाव्यातून तरी आपले प्रश्न एखादा तरी मायचा लाल मांडतंय का ते पाहू... नसतील मांडणार तर मांडायला लावू...
धार्मिक सण उत्सव आता श्रद्धा आणि भक्ती पेक्षा राजकीय इव्हेंट आणि सेलिब्रेशन झाले आहेत. पूर्वी नवरात्र दसरा म्हटले की घराघरात दसरे काढले जायचे. या निमित्ताने घरातली आडगळ निघायची. घराची, सामानाची स्वच्छता व्हायची. उभी आडवी सारवणं, भांडी कुंडी, गोधड्या असं सगळं धुवून पूसून चकाचक केलं जायचं. उकीरड्याची दैना निघायची. पहाटे दारात माळ परडी घेऊन आरादी यायचे. संध्याकाळी गोंधळी संबळ वाजवीत गोंधळ घालायचे. घराघरात घट बसायचे. मग दसर्याला नवे किंवा ठेवणीतले कपडे घालून, डोक्यावरच्या टोपीत घटाचे धन खोचून सीमोल्लंघन (शिलंगण)! आताही यातलं बरच काही होतं. पण त्यात पूर्वीची मजा नाही राहिली. सगळं व्हॉटसअप झालंय. दसर्याच्या शुभेच्छा सोनं सगळं व्हॉटसअपवर. औपचारिकता म्हणून. त्यात गोडी नाही. आपलेपणा, आपुलकी नाही. एकोपा नाही. माणूस आतून बाहेरून तुटलाय. आपट्याच्या पानांसारखाच किडलाय. दसर्याला सगळीकडे झेंडू फुटतो ना तसा झेंडू फुटलाय माणसांचा. दमछाक झाली आहे. मेटाकुटीला आलाय माणूस. सोन्यासारखी माणसं दगडासारखी होऊन एकमेकांवर खापर फोडताहेत. माणसात माणूस राहीला नाही. कसले दसरा मेळावे? सालाबादप्रमाणे याही वर्षी ते होतील. किती होतात? कुठे कुठे होणार? माहिती नाही! काय होणार या दसरा मेळाव्यात? कसलं विचारांचं सोनं? कसलं परिवर्तन? कसलं नवनिर्माण? कसला विकास? काही नाही! निव्वळ उखाळ्या पाखाळ्या. जनतेच्या प्रश्नांचा सत्यानाश. त्यांचीच गार्हाणी आणि रडगाणी ऐकून घ्या. इकडे सरकारी भरतीच्या नावाखाली फी स्वरूपात कोट्यावधी रुपये गोळा केले जातात. पण आतून काय चालतं? सगळी भरती मॅनेज! पेपर फोडणारे जेसीबींच्या खोर्यानं पैसे ओढतायत अन् पुढारी आपला हिस्सा घेऊन मोकळे. तरुणांना बेरोजगारीची चीड नाहीये. त्यांना अशा डुप्लीकेट भरती प्रक्रीयेची चीड आहे.यंदा तर पाऊस नसल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. पण या नापिकीपेक्षा डुप्लीकेट रायायनिक खते, बी-बियाणे अन् औषधांच्या चरकात तो जास्त पिळला जातोय. राज्याच्या गादीवर कोणाचेही सरकार बसलेले असो ते जनतेला लुटायला आणि फसवायला निघाले आहे. समाजा समाजात भांडणं लावीत आहे. आरक्षणाचं सरण पेटलय. त्यासाठी मढी शोधतंय सरकार. दुसरीकडे कंत्राटी भरतीने तर आता सगळा आरक्षण प्रश्नच नासवून टाकलाय. पीकविम्याची फसवणूक, शेतमालाचे आयात निर्यात धोरण, कांद्याची परवड, उसाची एफआरपी हे सगळे तुमचे आमचे जिव्हाळ्याचे प्रश्न आहेत. पण सरकार म्हणतं रडू नका. सरकार आपल्या दारी,
*तुम्हाला खरंच वाटतं का की हा सगळा दसरा आता तकटून निपटून काढण्याची वेळ झाली आहे. बस झाला गोंधळ! सोन्यासारख्या माणसांची कवडी किंमत करता आणि वरतून त्यालाच विकास म्हणता? राज्याच्या राजकारणाचा सगळा उकीरडा करुन ठेवलात. या उकीरड्याची दैना आता फेडावीच लागेल. आवंदा दसरा नीट काढावा लागेल. कामाच्या माणसाची पारख तुम्हाला करावी लागेल. निव्वळ सहानुभुतीचं शिलांगण नको. बिनाकामाचा, तुम्हाला लुटणारा, तुमच्या मताची कवडीमोल किंमत करणारा, वारंवार पेपर फोडणारा रावण मारायचाय ना? मग शांत बसू नका. विचारांचा सेतू पक्का बांधा. अपहरण झालेले मूळ प्रश्न आपण परत आणू अन् जमलंच तर ती लंकाही जाळू... पण आता आपल्यालाच बिभीषण, हनुमान, राम, लक्ष्मण अन् त्यांची वानरसेना व्हावं लागेल

