*भुसावळ महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी डिव्हायडरला लोखंडी जाळी बसवा; १०० मीटर रस्ता तयार करण्याचीही मागणी*
हॉटेल गॅलेक्सी व मशिदीकडे जाणाऱ्या मार्गाचा प्रश्न ऐरणीवर; पोलीस हक्क संघर्ष संघटनेचे संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन..
(भुसावळ (प्रतिनिधी) : विशेष जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी जुम्मा तडवी)
भुसावळ शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील वाढत्या अपघातांचा प्रश्न ऐरणीवर आला असून नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महामार्गाच्या डिव्हायडरमध्ये मजबूत लोखंडी जाळी बसविण्याची मागणी पोलीस हक्क संघर्ष संघटना महाराष्ट्र राज्य, जिल्हा जळगाव यांच्या वतीने करण्यात आली आहे. तसेच हॉटेल गॅलेक्सी व मशिदीकडे जाण्यासाठी सुमारे १०० मीटरचा रस्ता तयार करून द्यावा, अशी मागणीही करण्यात आली आहे.
यासंदर्भात गुरुवार, दि. १ ऑक्टोबर २०२६ रोजी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी संबंधित राष्ट्रीय महामार्ग विभाग व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना निवेदन सादर केले.
भुसावळ शहरातील वांजोळा रोड चौक, सिटी हॉस्पिटल, आर. के. पेट्रोल पंप आणि राधाकृष्ण हॉटेल परिसरात नागरिकांची तसेच वाहनांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. मात्र, महामार्गाच्या डिव्हायडरमध्ये योग्य प्रकारची लोखंडी जाळी नसल्यामुळे नागरिक व वाहनचालकांकडून शॉर्टकटने रस्ता ओलांडला जातो. तसेच महामार्गाच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेतूनही नागरिक रस्ता ओलांडत असल्याने अपघातांचा धोका वाढला आहे.
ही बाब लक्षात घेऊन महामार्गाच्या डिव्हायडरमध्ये मजबूत लोखंडी जाळी बसवावी, अनधिकृत क्रॉसिंग व मार्ग बंद करावेत आणि आवश्यक ठिकाणी सुरक्षित पादचारी मार्गाची व्यवस्था करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यासोबतच हॉटेल गॅलेक्सी व मशिदीकडे जाण्यासाठी सुमारे १०० मीटरचा रस्ता तयार करून नागरिकांची गैरसोय दूर करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.
संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी या परिसराची प्रत्यक्ष पाहणी करून नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने तातडीने आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी विनंती संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.
यावेळी संघटनेच्या जिल्हाध्यक्ष वर्षाताई तल्लारे, प्रदेश संघटक फैयाज हुसेन, खानदेश अध्यक्ष शेख फिरोज रहमान, उपजिल्हाप्रमुख नदीम शेख, ओसामा खान, सोशल मीडिया सेल अध्यक्ष बाबू खान, मीडिया सेल जिल्हाध्यक्ष फिरोज तडवी, अबुजर शेख, सदस्य आशा कोठारी, उत्तर महाराष्ट्र मीडिया सेल उपाध्यक्ष सद्दाम खाटीक, सलीम भाई, शहरप्रमुख अकबर गवळी, युवा जिल्हाप्रमुख फरहान शेख आणि सोशल मीडिया पदाधिकारी असगर शेख आदी उपस्थित होते.

