माजी सैनिकाने पूर्वजांच्या पावन स्मृती जपत जि.प.शाळेतील विद्यार्थ्यांना स्पोर्ट्स शूज व सॉक्सचे वाटप केले.
(महाराष्ट्र राज्य सहसंपादक सुरेश पाटील यावल)
यावल दि.३
यावल तालुक्यातील राजोरा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत ‘पितृस्मृती कृतज्ञता सोहळा २०२६’ उत्साहात संपन्न झाला.यात विद्यार्थ्यांना स्पोर्ट्स शूज व सॉक्सचे वाटप मुंबई येथील माजी सैनिक सुधाकर सोनवणे यांनी मोफत करून दातृत्व दाखविले पूर्वजांच्या स्मृती जपणाऱ्या या उपक्रमाचे ग्रामस्थांमध्ये आणि शैक्षणिक क्षेत्रात कौतुक करण्यात येत आहे.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, राजोरे येथे पूर्वजांच्या पावन स्मृती जपत समाजाविषयी कृतज्ञता व्यक्त करणारा ‘पितृस्मृती कृतज्ञता सोहळा २०२६' अत्यंत उत्साहपूर्ण आणि भावूक वातावरणात पार पडला. या सोहळ्याचे औचित्य साधून मुंबई स्थित निवृत्त भारतीय सैन्य दल सैनिक सुधाकर लक्ष्मण सोनवणे यांच्या दातृत्वातून शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना स्पोर्ट्स शूज (खेळाचे शूज) व सॉक्सचे मोफत वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावाच्या सरपंच सौ.पुष्पा गिरधर पाटील उपस्थित होत्या.ज्यांच्या सेवाभावी वृत्तीतून आणि दातृत्वातून विद्यार्थ्यांना या वस्तूंचे वाटप करण्यात आले,ते सुधाकर लक्ष्मण सोनवणे यांनी थेट मुंबईहून व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्या लताताई जयराम सोनवणे,सौ.माधुरी योगेश कोळी,योगेश कोळी, राजेंद्र महाजन,दिलीप महाजन तसेच व्यवस्थापन समिती सदस्या सौ.पूजाताई बिऱ्हाडे यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती.
कार्यक्रमाची सुरुवात मुख्याध्यापक रवींद्र पाटील यांच्या प्रास्ताविकाने झाली. त्यांनी उपस्थितांचे स्वागत करत ‘पितृस्मृती कृतज्ञता सोहळा २०२६’ मागील सामाजिक संकल्पना आणि त्याचे महत्त्व विषद केले."आपल्या पूर्वजांचे स्मरण करताना समाजातील घटकांना मदत करणे ही खरी कृतज्ञता आहे," असे मत त्यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन आणि उपस्थितांचे आभार प्रदर्शन सौ.वैशाली पाटील यांनी केले.गावातील मान्यवर, शिक्षकवृंद आणि विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत हा सोहळा अत्यंत आनंददायी वातावरणात संपन्न झाला.नवीन शूज व सॉक्स मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता.

