सर्व आरोपींना अटक झालीच पाहिजे!’ भगवान बाबा मल्टीस्टेट प्रकरणी ठेवीदारांचा एल्गार.भगवान बाबा मल्टीस्टेट गैरव्यवहार..सर्व आरोपींना अटक झालीच पाहिजे..ठेवीदारांचे अहिल्यानगरमध्ये जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर तीव्र आंदोलन..

‘सर्व आरोपींना अटक झालीच पाहिजे!’ भगवान बाबा मल्टीस्टेट प्रकरणी ठेवीदारांचा एल्गार.

भगवान बाबा मल्टीस्टेट गैरव्यवहार..

सर्व आरोपींना अटक झालीच पाहिजे..

ठेवीदारांचे अहिल्यानगरमध्ये जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर तीव्र आंदोलन..

प्रशांत बाफना/अहिल्यानगर:

 श्री संत भगवान बाबा मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीमधील करोडो रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहारामुळे ठेवीदार अखेर आक्रमक झाले आहेत. या प्रकरणातील सर्व दोषी व उर्वरित आरोपींना तातडीने बेड्या ठोकण्यात याव्यात, या प्रमुख मागणीसाठी ठेवीदारांनी अहिल्यानगर येथील जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयावर धडक देऊन जोरदार निदर्शने केली.

सर्व ठेवीदारांचा एल्गार

शेवगाव, पाथर्डी, श्रीरामपूर आणि अहिल्यानगर परिसरातील सुमारे ६० ते ७० पीडित ठेवीदारांनी एकत्र येत जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आंदोलन छेडले. सर्व आरोपींना अटक झालीच पाहिजे! ठेवीदारांना न्याय मिळालाच पाहिजे! अशी आंदोलकांनी मागणी केलीये. आपल्या कष्टाची जमापुंजी अडकल्याने संतप्त झालेल्या ठेवीदारांनी प्रशासनाच्या संथ कारभाराविषयी तीव्र रोष व्यक्त केला.



चेअरमन, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाईची मागणी- आंदोलकांनी जिल्हा पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांची भेट घेऊन त्यांना मागण्यांचे निवेदन सादर केले. निवेदनात संस्थेच्या विद्यमान चेअरमन मंदाकिनी रंगनाथ वैद्य आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जयशाली मयूर वैद्य यांना तात्काळ अटक करून कडक कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. तसेच, जयशाली वैद्य यांच्या बहीण वैशाली योगेश गायकवाड यांच्या नावे संस्थेतून तब्बल ३० कोटी रुपयांचे कर्ज दाखवण्यात आल्याचा खळबळजनक दावा आंदोलकांनी केला आहे. या संशयास्पद व्यवहाराची निष्पक्ष व सखोल चौकशी करून दोषींवर तात्काळ गुन्हे दाखल करावेत, अशी जोरदार मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.

तपास अधिकाऱ्यांचे आश्वासन, आंदोलक शांत

आंदोलनाची तीव्रता पाहून आर्थिक गुन्हे शाखेचे तपास अधिकारी शिरीष देशमुख यांनी आंदोलकांशी चर्चा केली. प्रकरणातील उर्वरित सर्व आरोपींचा लवकरात लवकर शोध घेऊन त्यांना अटक केली जाईल आणि कायदेशीर कारवाई गतीने केली जाईल असे ठोस आश्वासन त्यांनी दिले. तपास अधिकाऱ्यांच्या या आश्वासनानंतर ठेवीदारांनी आपले आंदोलन तूर्तास मागे घेतले.

प्रत्यक्ष कारवाईकडे सर्वांचे लक्ष

आंदोलन मागे घेतले असले तरी, पोलिसांनी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता कधी होणार, याकडे आता सर्व ठेवीदारांचे लक्ष लागले आहे. कष्टाचा पैसा सुरक्षित परत मिळावा आणि दोषींना कठोर शिक्षा व्हावी, हीच सर्व पीडित ठेवीदारांची एकमेव अपेक्षा आहे. पोलीस प्रशासन यावर आता काय पावले उचलते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे
Previous Post Next Post