वादळ, उष्णता अन् अवकाळीचे संकेत; कापूस, गहू व हरभर्‍याला चांगला भाव; मिरीत होईक

वादळ, उष्णता अन् अवकाळीचे संकेत; कापूस, गहू व हरभर्‍याला चांगला भाव; मिरीत होईक

प्रशांत बाफना |अहिल्यानगर


पाथर्डी : राज्यातील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पाथर्डी तालुयातील श्री क्षेत्र मिरी येथील राजा वीरभद्र उर्फ बिरोबा देवाचे पारंपरिक होईक सोमवारी दुपारी मोठ्या भक्तिभावात पार पडले. आगामी वर्षाची भविष्यवाणी ऐकण्यासाठी राज्याच्या विविध भागांतून आलेल्या भाविकांनी मंदिर परिसरात गर्दी केली होती. होईकात वादळी वारे, उष्णतेची लाट, अवकाळी पाऊस आणि काही भागांत अतिवृष्टीचे संकेत वर्तवण्यात आले.दुपारी सुमारे एक वाजता मुख्य होईक सोहळ्याला प्रारंभ झाला.

दरवर्षीच्या परंपरेनुसार देवाचे पुजारी सीताराम भगत यांनी लोखंडी साखळीचा लंगर तोडून अंगावर तलवारीचे ३६ वार झेलण्याचा पारंपरिक विधी केला. त्यानंतर त्यांनी आगामी वर्षाचे होईक कथन केले.यंदाच्या होईकात शेतकरी, सर्वसामान्य नागरिक आणि पशुधनासाठी आगामी वर्ष अडचणीचे राहण्याची भविष्यवाणी करण्यात आली. काही भागांत वादळी वारे व चक्रीवादळ, तर बहुतांशी ठिकाणी तीव्र उष्णतेमुळे नागरिकांसह जनावरांना त्रास होण्याचे संकेत कथन करण्यात आले. अवकाळी पावसामुळे हाताशी आलेल्या पिकांचे नुकसान आणि जनावरांच्या चार्‍याची टंचाई निर्माण होण्याची शक्यताही वर्तवण्यात आली. काही भागांत ढगफुटीसदृश पाऊस व महापुराचे संकेत देण्यात आले. दुसरीकडे कापसाला चांगला भाव, तर गहू व हरभर्‍याचे उत्पादन कमी राहून त्यांनाही चांगला दर मिळण्याची भविष्यवाणी करण्यात आली.उत्सवानिमित्त धनगर समाजातील अनेकांनी डफांच्या गजरात सादर झालेली धनगरी नृत्ये, ओव्या आणि कवणांनी वातावरण भारावून गेले. होईकातील भविष्यवाणी खरी ठरते, अशी भाविकांची श्रद्धा असल्याने या सोहळ्याला दरवर्षी मोठी गर्दी होते
Previous Post Next Post