रावेरच्या व्ही. एस. नाईक महाविद्यालयाची ॲथलेटिक्समध्ये दणदणीत बाजी!
पुरुष व महिला दोन्ही गटांत प्रथम क्रमांक; जनरल चॅम्पियनशिपवरही महाविद्यालयाची मोहोर..
(विकास आमोदकर तालुका प्रतिनिधी रावेर)
रावेर : परिसर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री व्ही. एस. नाईक कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, रावेरने कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या जळगाव विभागांतर्गत आयोजित आंतरमहाविद्यालयीन ॲथलेटिक्स स्पर्धा २०२६–२७ मध्ये उत्कृष्ट कामगिरी करत क्रीडा क्षेत्रात आपला दबदबा कायम ठेवला आहे.
या स्पर्धेत महाविद्यालयाने पुरुष तसेच महिला दोन्ही गटांत प्रथम क्रमांक पटकावत जनरल चॅम्पियनशिपवरही आपले नाव कोरले. या उल्लेखनीय यशामुळे महाविद्यालयाच्या क्रीडा क्षेत्रातील कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
खेळाडूंची दमदार कामगिरी
महाविद्यालयाच्या पुरुष संघातील कृष्णा राठोड, यश पगारे, वेदांत जाधव, भावेश चौधरी आणि रवींद्र बारेला यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. तर महिला संघातील जानवी रोजुदे, तेजस्विनी ढाके, राधा नाईक, ममता सूर्यवंशी, हर्षा पवार आणि मानसी पाटील यांच्यासह इतर खेळाडूंनीही विजेतेपदासाठी मोलाचे योगदान दिले.
हेमंतदादा नाईक यांच्याकडून खेळाडूंचे अभिनंदन
या अभिमानास्पद यशाबद्दल परिसर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा. हेमंतदादा नाईक यांनी सर्व यशस्वी खेळाडू, संघ व्यवस्थापक, प्रशिक्षक आणि शारीरिक शिक्षण विभागाचे अभिनंदन केले. खेळाडूंनी मेहनत, शिस्त आणि सातत्याच्या जोरावर महाविद्यालयाचा नावलौकिक वाढविला असून भविष्यात विद्यापीठ, राज्य तसेच राष्ट्रीय स्तरावरही अशीच उज्ज्वल कामगिरी करावी, अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या.
प्राचार्यांकडूनही कौतुक
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल पाटील यांनी पुरुष व महिला दोन्ही संघातील खेळाडूंच्या कामगिरीचे विशेष कौतुक केले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षणाबरोबरच क्रीडा क्षेत्रालाही महत्त्व देणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. या यशामुळे महाविद्यालयाची प्रतिष्ठा आणखी उंचावली असून विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्रात पुढे जाण्यासाठी सातत्याने प्रोत्साहन व मार्गदर्शन दिले जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सराव, शिस्त आणि मार्गदर्शनामुळे यश
महाविद्यालयाचे क्रीडा संचालक डॉ. उमेश नारायण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली खेळाडूंनी नियमित सराव, मेहनत आणि शिस्तीच्या जोरावर हे यश संपादन केले. पुरुष व महिला दोन्ही गटांत प्रथम क्रमांकासह जनरल चॅम्पियनशिप पटकावणे ही महाविद्यालयासाठी निश्चितच अभिमानाची बाब ठरली आहे.
या यशाबद्दल परिसर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा. हेमंतदादा नाईक, प्राचार्य डॉ. अनिल पाटील, उपप्राचार्य प्रा. एस. यू. पाटील, उपप्राचार्य डॉ. एच. डी. धापसे, आयक्यूएसी सदस्य विजय महाजन, डॉ. पी. व्ही. दलाल, नॅक समन्वयक डॉ. बी. जी. मुख्यदल, क्रीडा संचालक डॉ. उमेश नारायण पाटील, क्रीडा समिती सदस्य प्रा. चतुर गाडे व प्रा. लालचंद वळवी तसेच सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी खेळाडूंचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
रावेरच्या व्ही. एस. नाईक महाविद्यालयाच्या या यशामुळे क्रीडा क्षेत्रात महाविद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला असून, सर्व यशस्वी खेळाडूंचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

