वृद्धेश्वर’बदनामीचे षड्यंत्र सहन करणार नाही : आमदार राजळे यांचा इशारा.

वृद्धेश्वर’बदनामीचे षड्यंत्र सहन करणार नाही : आमदार राजळे यांचा इशारा.

(अहिल्यानगर । प्रशांत बाफना महाराष्ट्र राज्य विभागीय संपादक)


गेल्या गळीत हंगामात 2807 रुपये एफआरपी असतानाही शेतकऱ्यांच्या हितासाठी श्री वृद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याने 3000 रुपये दर दिला. यंदा दुष्काळी परिस्थितीमुळे गळीत हंगाम अडचणीचा असून ऊस उत्पादकांनी कार्यक्षेत्राबाहेर ऊस देऊ नये. शेजारील कारखान्यांच्या बरोबरीने ऊसदर देण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी ग्वाही कारखान्याच्या संचालक तथा आमदार मोनिका राजळे यांनी दिली.

श्री वृद्धेश्वर कारखान्याची 55 वी वार्षिक सर्वसाधारण सभा अध्यक्ष अप्पासाहेब राजळे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. सभेत वजन काट्याबाबत विरोधकांकडून उपस्थित करण्यात आलेल्या आक्षेपांना उत्तर देताना आमदार राजळे यांनी कारखान्याची व संचालक मंडळाची बदनामी यापुढे सहन केली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा दिला. वजन काटा सदोष असल्याचा वारंवार खोटा प्रचार करून संचालक मंडळाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करू नये. ज्यांना शंका आहे त्यांनी वजन काट्यासमोर उभे राहून खात्री करावी. शेतकऱ्यांचे नुकसान करण्याचे पाप आम्ही कदापी करणार नाही, असे त्या म्हणाल्या.

तालुक्यात दुष्काळाची तीव्र परिस्थिती असून पाटपाण्याचा भाग वगळता बहुतांश ठिकाणी पाण्याचे संकट गंभीर झाले आहे. चाऱ्यासाठी उसाची मोठ्या प्रमाणावर तोड सुरू असून शासनाच्या सर्वेक्षणानुसार केवळ दोन महिने पुरेल एवढाच चारा शिल्लक आहे. दुष्काळामुळे तालुक्याचे अर्थचक्र बिघडले असून यंदा ऊस पळवापळवी वाढण्याची शक्यता आहे. कारखाना सुरळीत चालावा, शेतकरी, कामगार व तोडणी मजुरांचे प्रपंच सुरळीत चालावेत, यासाठी संचालक मंडळ प्रयत्नशील आहे, असे राजळे यांनी सांगितले.बाहेरील कारखान्यांना ऊस दिलेल्या काही शेतकऱ्यांना वेळेवर पेमेंट मिळाले नसून काहींची देणी अद्याप प्रलंबित आहेत. त्यामुळे कोणत्याही आमिषाला बळी न पडता शेतकऱ्यांनी वृद्धेश्वरला सहकार्य करावे.

सभेस उपाध्यक्ष बाबासाहेब किलबिले, संचालक राहुल राजळे, रामकिसन काकडे, सुभाष बुधवंत, बापूसाहेब पाटेकर, बाळासाहेब गोल्हार, काकासाहेब शिंदे, संदीप लोखंडे, कुशीनाथ बर्डे, डॉ. यशवंत गवळी, नारायण काकडे, सुभाष बर्डे, कुंडलिक आव्हाड, संदीप पठाडे, शिवाजी मोहिते, भगवान साठे, कार्यकारी संचालक नितीन शिंदे यांच्यासह संचालक, अधिकारी, कर्मचारी, सभासद व शेतकरी उपस्थित होते.सभेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष शिवशंकर राजळे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे बाळासाहेब गर्जे, बबन बांगर यांनी विविध मुद्दे उपस्थित केले. ज्येष्ठ संचालक सुभाष ताठे यांनी स्वागत केले. संभाजी राजळे यांनी नफा-तोटा पत्रक व ताळेबंद सादर केला. रवींद्र महाजन यांनी अहवालवाचन केले, तर संचालक श्रीकांत मिसाळ यांनी आभार मानले
Previous Post Next Post