🛑 *अकोल्यात स्थानिक गुन्हे शाखेचा मोठा दणका; गावठी कट्टा, काडतुसे व चाकूंसह ३ सराईत गुन्हेगार जेरबंद!*
🔹 *'ऑपरेशन प्रहार' अंतर्गत बोरगाव मंजू पोलीस ठाण्याच्या हद्दीत धडाकेबाज कारवाई*
🔹 *गंभीर गुन्ह्याचा कट उधळला; ४९ हजारांचा मुद्देमाल जप्त*
( अकोला जिल्हा विभागीय संपादक इमरान खान )
अकोला:अकोला पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पथकाने एका गंभीर गुन्ह्याचा कट उधळून लावत मोठी कामगिरी केली आहे. 'ऑपरेशन प्रहार' मोहिमेअंतर्गत कानशिवनी परिसरात लोकांमध्ये दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने अवैध घातक शस्त्रे बाळगणाऱ्या तीन सराईत गुन्हेगारांना पोलिसांनी शिताफीने अटक केली. आरोपींकडून एक देशी बनावटीचा कट्टा, दोन जिवंत काडतुसे, धारदार चाकू आणि मोबाईल असा एकूण ४९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
विजय अंबादास पवार (वय २६, रा. खांबोरा, ता. बार्शीटाकळी), संदीप श्रीराम वाहुराध (वय ३६, रा. कानशिवनी, ता. जि. अकोला) आणि सहील उर्फ वैभव देवानंद गांवडे (वय २०, रा. खांबोरा, ता. बार्शीटाकळी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
अशी झाली कारवाई
पोलीस अधीक्षक श्री. अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात अवैध धंद्यांविरुद्ध 'ऑपरेशन प्रहार' मोहीम राबवली जात आहे. ३० सप्टेंबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक अकोला हद्दीत पेट्रोलिंगवर असताना, गुप्त बातमीदाराकडून पोलिसांना खात्रीशीर माहिती मिळाली की, ग्राम कानशिवनी येथील गोरक्षण परिसरात काही इसम दहशत निर्माण करण्यासाठी देशी कट्टा व चाकू घेऊन फिरत आहेत. माहिती मिळताच पोलीस निरीक्षक नितीन लेव्हरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तातडीने कानशिवनी येथील गोरक्षणजवळ सापळा रचला आणि पंचांसमक्ष तीन संशयितांना ताब्यात घेतले.
कमरेला खोचला होता कट्टा!
पोलिसांनी संशयितांची अंगझडती घेतली असता, आरोपी विजय पवार याच्या हाफ पॅन्टच्या कमरेला ४०,००० रुपये किमतीचा देशी बनावटीचा कट्टा आणि मॅग्झीनमध्ये २,००० रुपयांची दोन जिवंत काडतुसे आढळून आली. तर दुसरा आरोपी संदीप वाहुराध याच्या खिशात १,००० रुपयांचा लोखंडी धारदार चाकू मिळून आला. पोलिसांनी या तिघांकडून शस्त्रांसह दोन मोबाईल फोन व इतर साहित्य जप्त केले आहे. आरोपींकडे सखोल विचारपूस केली असता, त्यांनी परिसरात दहशत निर्माण करण्यासाठी आणि कट कारस्थान रचण्याच्या उद्देशाने ही शस्त्रे बाळगल्याची कबुली दिली.
बोरगाव मंजू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
याप्रकरणी आरोपींविरुद्ध बोरगांव मंजु पोलीस स्टेशन येथे भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ६१ (२), ३ (५) आणि आर्म्स ॲक्ट कलम ३, २५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.
सदरची यशस्वी कामगिरी पोलीस अधीक्षक श्री. अर्चित चांडक, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. बी. रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन लेव्हरकर, अधिकारी निलेश देशमुख, गोपाल जाधव, विष्णू बोडखे, माजीद पठाण, अनिल चव्हाण आणि एलसीबीच्या अंमलदारांसह चालक पथकाने बजावली.

