गुलाबी मैनांची हवाई कसरत " विशेष लेख ..

"गुलाबी मैनांची हवाई कसरत " 
विशेष लेख ..

(प्रशांत बाफना 8055440385 महाराष्ट्र राज्य विभागीय संपादक)


             गुलाबी मैना (Rosy Starling) तथा लोकभाषेत 'पळस मैना' म्हणून ओळखला जाणारा एक छोटासा पक्षी 'स्थलांतरीत पक्षी' म्हणून ओळखला जातो.हाताच्या मुठीत सहज सामावून जाईल,असा हा चिमुकला जीव आपल्या रंगरूपाने आणि हवेतील समूह-नृत्याच्या अप्रतिम अविष्काराने सर्वांचे लक्ष वेधून घेतो. धान्यपिके,विविध फळे आणि त्यामधील 'बीटा कॅरोटीन 'या रंगद्रव्याच्या सेवनामुळे त्याच्या पंखांना हळूहळू आकर्षक गुलाबी रंग प्राप्त होतो. पळसाच्या झाडावर हा पक्षी बसला,की लालसर-गुलाबी फुलांमध्ये त्याला ओळखणेही कठीण होते,म्हणूनच त्याला पळस मैना हे नाव अगदी सार्थ वाटते.
             बहुतांश स्थलांतरित पक्षी हिवाळ्यात उत्तरेकडील थंड प्रदेशातून दक्षिणेकडील उबदार भागांकडे प्रवास करतात.परंतु गुलाबी मैना या सर्वसाधारण उत्तर-दक्षिण स्थलांतरित मार्गाला अपवाद ठरतो.हा पक्षी मध्य आशिया,पूर्व युरोप आणि कझगिस्तान परिसरातून भारतीय उपखंडात गुजरात, राजस्थान,मध्य प्रदेश, महाराष्ट्र,कर्नाटक,केरळ छत्तीसगड,तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या राज्यात,जुलै-ऑगस्टच्या सुमारास आढळून येतो. गुलाबी मैनांचे मोठे थवे दिसू लागतात.महाराष्ट्रात जायकवाडी धरण परिसर,उजनी धरणाचा पाणलोट प्रदेश आणि ज्वारीचे पिक मोठ्या प्रमाणात घेतले जाणारे भाग यांसारख्या ठिकाणी या पक्ष्यांचे मोठे समुदाय पाहायला मिळतात. धान्यपिके,लहान मऊ फळे आणि पिकांचे नुकसान करणारे टोळ यांसारखे कीटक हे त्यांचे प्रमुख खाद्य आहे.म्हणूनच अनेक शेतकरी या पक्ष्याला आजही आपला मित्र मानतात.मार्च किंवा एप्रिलपर्यंत त्याचा मुक्काम भारतात असतो.
            सायंकाळी सूर्यास्ताच्या साधारण तासभर आधी हजारोंच्या संख्येंने हे पक्षी आकाशात एकत्र येतात.झाडावर विसावण्यापूर्वी ते मोकळ्या आकाशात जी हवाई कसरत करतात,ती खरोखरच डोळ्यांचे पारडे फेडणारी असते. अतिशय चपळतेने आणि आश्चर्यकारक वेगाने उडताना त्यांचे थवे विविध आकार घेतात.कधी ते गोलाकार,कधी कंकणाकृती,कधी विशाल लाटेसारखे,तर कधी नागमोडी वळणांसारखे दिसतात.आकाशात काळसर-करड्या ढगांसारखे हे थवे क्षणाक्षणाला दिशा बदलतात.अनेकदा ते जमिनीकडे झेपावतात आणि लगेच पुन्हा उंचावर जातात.संपूर्ण थव्यात कोणताही एक नेता नसतो.प्रत्येक पक्षी आपल्या आसपासच्या सहा- सात पक्ष्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवतो.त्यामुळे संपूर्ण थवा एकाच लयीत दिशा बदलताना दिसतो. या सामूहिक आणि शिस्तबद्ध क्रियेला पक्षीविज्ञानाच्या भाषेत " मर्म्युरेशन 'असे म्हणतात.
           अलीकडे या हवाई कसरतीच्या रहस्याचा उलगडा करण्याचा प्रयत्न अहमदाबाद विद्यापीठातील जितेश झावर आणि वेणू डिव्हिन यांनी केला. त्यांनी अहमदाबाद विद्यापीठ परिसर,शहरातील
साबरनदीचा काठ आणि जामनगर येथील प्रसिद्ध लाखोटा तलाव येथे संशोधन केले. जानेवारी आणि फेब्रुवारी २०२५ या काळात सलग २८ दिवस बहुमजली इमारतींच्या गच्चींवरून हाय-स्पीड कॅमेरे आणि व्हिडोओ तंत्रज्ञानाच्या साहाय्याने सूर्यास्तापूर्वीच्या मर्म्युरेशनचे चित्रीकरण आणि निरीक्षण करण्यात आले.या अभ्यासात एकूण
३,०२३ थव्यांचे बारकाईने निरीक्षण करण्यात आले.थव्यांचे आकार, त्यातील पक्ष्यांची अंदाजे संख्या, आकाराची स्थिरता, उडण्याची दिशा, थव्यांचे विभाजन-
एकत्रिकरण आणि शिकारी पक्षी जवळ आल्यावर होणारे तातडीचे बदल नोंदवले गेले.या निरीक्षणात गुलाबी मैनांच्या थव्यांचे १२ वेगवेगळे आकार नोंदवले गेले. त्यात वर्तुळाकार, लाटांसारखे,सर्पाकृती, अंडाकृती,
विळ्यासारखे,बांगडीसारखे आणि सरळ आकार समाविष्ट होते. नोंदवलेल्या ३,०२३ थव्यांपैकी तब्बल ७१ टक्के थवे शिकारी पक्षी आसपास असताना अरूंद रस्त्यासारख्या आकारात आढळले. तसेच १८१ वेळा शिकारी पक्षी थव्याजवळ अवघ्या दहा मीटर अंतरावर आले,तरी या आकारबदलामुळे त्यांना शिकार करता आली नाही.धोका नसताना मात्र हे थवे गोलाकार,नागमोडी किंवा लाटांसारखे मुक्त आकार घेत हवेत नृत्य करत राहतात.
            गुलाबी मैनांची हवाई कसरत ही केवळ करमणूक नाही;ती शिकारी पक्ष्यांपासून बचाव करण्याची विकसित झालेली अत्यंत प्रभावी सामूहिक संरक्षण प्रणाली आहे हे स्पष्ट झाले आहे.या प्रक्रियेतून निसर्गातील " सामूहिक बुद्धिमत्ता " स्पष्ट दिसते.एकेकट्या पक्ष्याच्या निर्णयापेक्षा संपूर्ण समुदायाची समन्वित प्रतिक्रिया अधिक परिणामकारक ठरते.गुलाबी मैनांची ही हवाई कसरत म्हणूनच केवळ सौदर्याचा अनुभव देत नाही,तर निसर्गातील गुढ,
अद्भुत आणि अचूक विज्ञानाचेही दर्शन घडविते
Previous Post Next Post