शिक्षकांच्या संतापाचा जिल्हा परिषदेत एल्गार! प्रशासकीय दडपशाहीविरोधात हजारो शिक्षक रस्त्यावर!घोषणाबाजीने परिसर दणाणला.

शिक्षकांच्या संतापाचा जिल्हा परिषदेत एल्गार! प्रशासकीय दडपशाहीविरोधात हजारो शिक्षक रस्त्यावर!
घोषणाबाजीने परिसर दणाणला.


अहिल्यानगर | प्रशांत बाफना

प्रशासकीय कामांचा वाढता बोजा, वारंवार मागविण्यात येणारी ऑनलाइन माहिती, विविध अ‍ॅपवरील कामांचा ससेमिरा आणि कारवाईच्या धमयांमुळे त्रस्त झालेल्या प्राथमिक शिक्षकांच्या असंतोषाचा बुधवारी अहिल्यानगरमध्ये उद्रेक झाला. अहिल्यानगर जिल्हा प्राथमिक शिक्षक समन्वय समितीच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील शिक्षकांनी जिल्हा परिषद कार्यालयावर भव्य मोर्चा काढत प्रशासनाविरोधात जोरदार एल्गार पुकारला. विविध मागण्यांच्या समर्थनार्थ दिलेल्या आक्रमक घोषणांनी जिल्हा परिषद परिसर अक्षरशः दणाणून सोडला.

बुधवारी सकाळी १० वाजता वाडिया पार्क येथून या मोर्चाला सुरुवात झाली. जिल्ह्यातील विविध प्राथमिक शिक्षक संघटनांचे पदाधिकारी, शिक्षक आणि शिक्षिका मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते. हातात मागण्यांचे फलक आणि तोंडी प्रशासनाविरोधातील घोषणांचा गजर करीत शिक्षकांनी जिल्हा परिषद कार्यालयाकडे कूच केली. शिक्षकांच्या प्रश्नांवर प्रशासनाने तातडीने तोडगा काढावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.शालेय पोषण आहार योजनेची जून महिन्यापासूनची पाच महिन्यांची बिले प्रलंबित असल्याचा मुद्दाही शिक्षकांनी आक्रमकपणे मांडला. आहार शिजविणार्‍या महिलांचे मानधन वेळेवर मिळत नसल्याने निर्माण होणार्‍या अडचणींकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले.

गणवेश वाटपानंतर अनुदान मिळण्यास झालेला विलंब, डछ स्पर्श प्रणालीतील तांत्रिक अडचणी, गणवेशाच्या कापडाच्या गुणवत्तेबाबत बजावण्यात आलेल्या नोटिसा आणि शाळा अनुदान खर्च करण्यासाठी दिल्या जाणार्‍या तातडीच्या आदेशांबाबतही नाराजी व्यक्त करण्यात आली.याशिवाय पदोन्नती प्रक्रियेत अन्याय झाल्याची भावना असलेल्या शिक्षकांच्या तक्रारींची पारदर्शक चौकशी करून न्याय द्यावा, अशी मागणी करण्यात आली.या मोर्चाच्या माध्यमातून अनावश्यक ऑनलाइन कामांचे नियमन करणे, माहिती संकलनासाठी निश्चित वेळापद्धती लागू करणे, शाळा तपासणीवेळी अध्यापन आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेला प्राधान्य देणे, पोषण आहाराची प्रलंबित बिले अदा करणे, गणवेश अनुदान व डछ स्पर्श प्रणालीतील अडचणी दूर करणे आणि पदोन्नती प्रक्रियेतील तक्रारींचे निराकरण करणे अशा विविध मागण्या प्रशासनासमोर मांडण्यात आल्या.

ऑनलाइन कामांच्या ओझ्याखाली अध्यापनाचा बळी!
शिक्षक हा विद्यार्थ्यांचे भविष्य घडविणारा घटक असताना त्याला ऑनलाइन माहिती भरणारा कर्मचारी बनविण्याची वेळ आली आहे, अशी भावना आंदोलनकर्त्या शिक्षकांनी व्यक्त केली. अध्यापनापेक्षा विविध पवरील नोंदी, ऑनलाइन माहिती संकलन, वारंवार येणारे तातडीचे आदेश आणि माहिती न भरल्यास कारवाईचे इशारे यामुळे शिक्षकांचे मानसिक स्वास्थ्य बिघडत असल्याचा आरोप करण्यात आला. विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी शिक्षकांकडे वेळच उरत नसेल, तर गुणवत्तापूर्ण शिक्षणाची अपेक्षा कशी करणार, असा सवालही यावेळी उपस्थित करण्यात आला
Previous Post Next Post