कपट कारस्थानी लोकांच्या नादी लागू नका - आनंदराज आंबेडकर.
आरक्षण उपवर्गीकर मोर्चाला हजारो जनसमुदाय उपस्थित.
धर्माबाद .काही मोजक्या लोकांना हाताशी धरुन समाजा-समाजा मध्ये भांडणे लावणाऱ्या, आपल्या राजकिय हितासाठी एखाद्या समाजाचा वापर करुन घेणाऱ्या कपट कारस्थानी लोकांपासून सावध रहा असा सल्ला रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांनी धर्माबाद येथील आरक्षण उपवर्गीकरण विरोधी महामोर्चाला संबोधित करतांना दिला.
दि. 3 नोव्हेंबर रोजी धर्माबाद येथे अनुसुचित जाती उपवर्गीकरण विरोधी महामोर्चा काढण्यात आला.मोर्चाची सुरुवात छत्रपती चौकात रयतेचे राजे शिवछत्रपती महाराज, फुले नगरातील महात्मा ज्योतिबा फुले, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर व महात्मा बसवेश्वर महराज यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून शहराच्या मुख्य रस्त्यावरून भव्य मिरवणूक काढण्यात आली.नगर परिषद मैदानावर भव्य सभेचे आयोजन करण्यात आले.या सभेला प्रमुख मार्गदर्शक रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आंनदराज आंबेडकर व युवा नेतृत्व अँड. अमन आंबेडकर हे होते. तसेच आंबेडकरी चळवळीचे भाष्यकार प्रा. सिध्दार्थ शिनगारे, ढोरसमाज प्रदेश सचिव एन. एस. फुलपगार, भीम आर्मी प्रदेशाध्यक्ष अशोक कांबळे, भिम टायगर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दादासाहेब शेळके, आंबेडकरी कार्यकर्ता रुक्मीनीताई लोंढे, अण्णाभाऊ साठे पिपल्स फोर्स अध्यक्ष बा. रा. वाघमारे, प्रसिध्द व्याख्याता प्रियाताई कांबळे, बहुजन टायगर सेनेचे माधव जमदाडे, एससी फॉर एस्सीज राईटचे अध्यक्ष एम. सायलुदादा म्हैसेकर, प्रा. राजू सोनसळे इत्यादींची विशेष उपस्थिती होती.
पुढे बोलतांना आनंदराज आंबेडकर यांनी सांगीतले की, भाजपचा आणि आरएसएसचा अजेंडाच आहे समाजा-समाजामध्ये भांडणे लावून आपला राजकिय स्वार्थ साधणे. सुरुवातीला मराठा, कुणबी, धनगर, आणी आता उपवर्गीकरणाच्या माध्यमातून मातंग समाजाच्या काही मोजक्या लोकांना हाताशी धरुन बौध्द समाजाच्या विरोधात भांडणे लावण्याचा प्रकार सुरु आहे. परंतु अशा भुलथापांना बळी न पडता समाजाने विचार करणे गरजेचे आहे तसेच जोपर्यंत शासन उपवर्गीकरणाचा मुद्दा थांबवणार नाही तोपर्यंत उपवर्गीकरण विरोधी मोर्चा चालूच राहील अशी भूमिका आनंदराज आंबेडकर यांनी व्यक्त केली.
अँड .अमन आंबेडकर यांनी तरुणांना मार्गदर्शन करतांना सांगीतले कि, देशातले वातावरण बदलत चालले आहे, येणारा काळ हा आंबेडकरवाद्यांचाच आहे. त्यामुळे आमदार, खासदारांच्या नादी न लागता तरुणांनी आपल्या भविष्याकडे लक्ष द्यावे व आंबेडकर घराण्याशी एकनिष्ठ रहावे असा संदेश दिला. यावेळी प्रा. सिध्दार्थ शिनगारे, एन. एस. फुलपगार, अशोक कांबळे, दादासाहेब शेळके, रुक्मीनीताई लोंढे, बा. रा. वाघमारे प्रियाताई कांबळे, रोहीदास बनसोडे, प्रा. राजू सोनसळे यांची दमदार भाषणे झाली. आरक्षण उपवर्गीकरण विरोधी कृती समितीच्या वतीने खिचडी तर विर शिरोमणी महाराणा प्रताप सेवाभावी संस्था अध्यक्ष नागनाथ गुरजुलावाड यांच्या वतीने उस्मानिया बिस्कीट वाटप करण्यात आले.यावेळी हजारो जनसमुदाय उपस्थित होता.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कुलदिप मस्के यांनी केले, सुत्रसंचालन संदीप मस्के यांनी केले तर आभार बालाजी घायाळ यांनी मानले.

