पत्रकारांच्या हक्कांसाठी आता बिलोलीत संघटनात्मक नेतृत्व; वैभव घाटे यांच्यावर तालुका सचिवपदाची जबाबदारी!
पत्रकार एकता महासंघ भारताकडून नियुक्ती; राष्ट्रीय व राज्यस्तरीय नेतृत्वाचा विश्वास, पत्रकारिता क्षेत्रासह विविध स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव..
मारोती एडकेवार
जिल्हा प्रतिनिधी नांदेड
नांदेड :पत्रकारांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज बुलंद करण्यासोबतच पत्रकारितेतील एकजूट अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने पत्रकार एकता महासंघ भारताच्या बिलोली तालुका सचिवपदी पत्रकार श्री. वैभव माधवराव घाटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या या नियुक्तीमुळे बिलोली तालुक्यातील पत्रकारिता क्षेत्रात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून पत्रकार बांधव, मित्रपरिवार आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
पत्रकार एकता महासंघ भारताचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. श्री. दिनेश गंगाराम भालेराव तसेच महाराष्ट्र उपाध्यक्ष मा. श्री.लक्ष्मण चन्नावार साहेब यांनी वैभव घाटे यांच्या कार्यक्षमतेवर विश्वास व्यक्त करीत त्यांच्याकडे बिलोली तालुक्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपविली आहे.
आजच्या बदलत्या प्रसारमाध्यमांच्या काळात ग्रामीण भागातील पत्रकारांना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागत आहे. पत्रकारांच्या समस्या, सुरक्षितता, सन्मान आणि न्याय्य हक्कांसाठी संघटित व्यासपीठ उपलब्ध होणे ही काळाची गरज बनली आहे. अशा परिस्थितीत पत्रकार एकता महासंघाच्या माध्यमातून बिलोली तालुक्यात पत्रकारांची एकजूट निर्माण करणे, पत्रकारांच्या प्रश्नांना योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देणे तसेच ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेचे प्रश्न निर्भीडपणे मांडण्यासाठी संघटनात्मक पातळीवर प्रयत्न करण्याची जबाबदारी आता वैभव घाटे यांच्यावर आली आहे.
नियुक्तीबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना वैभव घाटे म्हणाले की, राष्ट्रीय अध्यक्ष, महाराष्ट्र अध्यक्ष दिनेश भालेराव सर आणि विशेष माझे जुने मार्गदर्शक मित्र, महाराष्ट्र उपाध्यक्ष लक्ष्मण चन्नावार साहेब तसेच संघटनेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी माझ्यावर विश्वास दाखवून बिलोली तालुका सचिवपदाची जबाबदारी आणि काम करण्याची संधी दिली, ही माझ्यासाठी आनंदाची व अभिमानाची बाब आहे. आपण दाखविलेला विश्वास सार्थ ठरविण्यासाठी पत्रकारांचे हक्क, सन्मान, संघटनात्मक एकजूट आणि जनसामान्यांच्या प्रश्नांसाठी प्रामाणिकपणे व निष्ठेने कार्य करणार असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
या नियुक्तीबद्दल पत्रकार एकता महासंघ भारताचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. श्री. दिनेश गंगाराम भालेराव, महाराष्ट्र उपाध्यक्ष मा. श्री. लक्ष्मण चन्नावार, मराठवाडा सचिव श्री. दीपक माधवराव गजभारे घुंगराळेकर तसेच पत्रकार एकता महासंघ भारत सर्व पदाधिकारी यांनी वैभव घाटे यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या

