जि.प. अध्यक्षांविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल, 20 सदस्यांनी दिले जिल्हाधिकाऱ्यांना पत्र;31 जुलैला विशेष सभेचे आयोजन..... (नंदुरबार जिल्हा विभागीय संपादक) : सदस्यांना विश्वासात न घेता निर्णय घेण्यात येत असल्याने नाराज असलेल्या भाजपासह काँग्रेस, राष्ट्रवादीच्या 20 सदस्यांनी नंदुरबार जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे दाखल केला आहे. दरम्यान, याबाबत जिल्हा परिषदेच्या सभागृहात दि. 31 जुलै रोजी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे. याबाबत पिठासीन अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी गोविंद दाणेज यांनी नोटीस देत सदस्यांना या सभेस उपस्थित राहण्याचे सूचित केले आहे. सदस्यांना विश्वासात न घेता निर्णय घेणे, सार्वजनिक कार्यक्रम तसेच निर्णय प्रक्रियेत सहभागी न करता परस्पर निर्णय घेणे, सदस्यांच्या गटातील विविध विकास योजनांना विनाकारण अडथळा निर्माण करणे, गटातील गावांना विविध शासकीय व निमशासकीय योजनांचा निधी उपलब्ध न करुन देणे तसेच योग्य प्रकारे योजना न राबविणे, सदस्यांना भेटण्यासाठी वेळ न देणे त्यांना ताटकळत उभे ठेवणे आदींबाबत नाराजी व्यक्त करीत जिल्हाधिकाऱ्यांकडे 20 सदस्यांनी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावितांवर अविश्वास आणण्यासाठी प्रस्ताव आणत असल्याचे नमूद केले आहे. या अविश्वास प्रस्तावावर जिल्हा परिषदेच्या सभापती हेमलता शितोळे, जिल्हा परिषदेचे सदस्य सुभाष पटले, सुनिल गावित, धरमसिंग वसावे, रुपसिंग तडवी, प्रताप वसावे, सुशिला चौरे, सुरख्याबी आमिन, निलूबाई पाडवी, शंकर पाडवी, मंगलाबाई जाधव, वंदना पटले, मोगरा पवार, रजनी सुरेश नाईक, कुंदाबाई नाईक, भारती भील, जिजाबाई ठाकरे, प्रकाश कोकणी, सुनिता पवार, गुलाब भील यांच्या सह्या आहेत. या अविश्वास प्रस्तावाने जिल्हा परिषद वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. जिल्हा परिषदेत एकूण 56 सदस्य असून यात भाजप 20, काँग्रेस 24, राष्ट्रवादी 4, शिंदेसेना 6 व उबाठा गटाचे 2 सदस्य आहे. दरम्यान, अध्यक्ष निवडी वेळी भाजपला काँग्रसेचे 8, शिंदे सेना व उभाठा गटाचे प्रत्येकी 6, राष्ट्रवादीचे 3 सदस्यांनी पाठिंबा दिला होता. दरम्यान या अविश्वास प्रस्ताव दाखल प्रकरणी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित यांनी आपली भूमिका विषद करताना सांगितले की, चार दिवसांपूर्वी विरोधकांनी जलजीवन मिशनवर आंदोलन केले होते. मात्र विरोधकांच्या काळातच तीन हजाराहून अधिक योजना मंजूर झाल्या आहेत. याची आकडेवारीच मांडल्याने विरोधकांचे आंदोलन स्टंटबाजी ठरली. यातून काँग्रेसची दुटप्पी भूमिका स्पष्ट झाली. केवळ गावित परिवाराला टार्गेट करण्यासाठी आता अविश्वास ठराव आणला जात आहे. मात्र, सर्व सदस्य माझ्याच बाजूने आहेत. पिठासीन अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी गोविंद दाणेज यांनी अविश्वास प्रस्तावाबाबत दि. 31 जुलै रोजी सकाळी 11 वाजता जिल्हा परिषदेच्या सभागृहात विशेष सभेबाबत सदस्यांना नोटीसद्वारे कळविले आहे. यामुळे 31 रोजी होणाऱ्या सभेत अविश्वास ठराव मंजूर होतो की फेटाळला जातो, यासाठी सत्ताधारी आणि विरोधकांकडून नेमकी कोणती राजकीय खेळी केली जाणार, याकडे जिल्हावासियांचे लक्ष लागून आहे.
byMEDIA POLICE TIME
-
0