शाळेच्या इमारतीसाठी सरपंचांनी केले अर्धनग्न आंदोलन; शिक्षणाधिकाऱ्यांकडून दखल !निधी उपलब्ध होताच तात्काळ दुरुस्तीचे आश्वासन.. . . (नंदुरबार जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी) : नवापूर तालुक्यातील खांडबारा जिल्हा परिषद मराठी, गुजराती व उर्दू माध्यमाच्या प्राथमिक शाळेच्या इमारतीची दुरवस्था झाली आहे. शाळेची जीर्ण भिंत, कुजलेले लाकूड, फुटलेले पत्र्यांमुळे विद्यार्थ्यांचे जीव धोक्यात आले आहेत. मात्र, याकडे मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षण विभागाने दुर्लक्ष केल्याचा आरोप होत आहे. शालेय इमारतीच्या दुरुस्तीसाठी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी खांडबारा ग्रामपंचायतीचे सरपंच अविनाश गावित यांच्यासह ग्रामस्थांनी जिल्हा परिषदेच्या कार्यालयाच्याबाहेर अर्धनग्न आंदोलन केले. यावेळी खांडबारा जिल्हा परिषद शाळेची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. दरम्यान, सदर आंदोलनाची दखल घेत शिक्षणाधिकारी वंदना वळवी यांनी आंदोलकांना लेखी आश्वासन देत निधी उपलब्ध होताच तात्काळ दुरुस्ती करण्यात येणार असल्याचे सांगितले. यामुळे सदरचे आंदोलन स्थगित करण्यात आले आहे. खांडबारा जि.प. शाळेच्या छताच्या फुटलेल्या पत्र्यांमुळे वर्गातील विद्यार्थी ओलेचिंब होऊन शिक्षण घेताना दिसून येत आहेत. ही अवस्था मागील अनेक वर्षांपासून खांडबारा जिल्हा परिषदेच्या शाळेची आहे. शाळेची इमारत जीर्ण झाल्याने तसेच भौतिक सुविधांचा अभाव असल्याने विद्यार्थ्यांना आहे त्या अवस्थेत शिक्षण घ्यावे लागत आहे. गावातील ग्रामस्थ व पालकांनी अनेक वेळा तक्रारी केल्या. मात्र, कुठलीही उपाययोजना करण्यात आलेली नाही. काही लोकप्रतिनिधींनी शाळेला व्हिजिट देऊन दुरुस्ती करण्याचे सांगितले, तरी कुठलीही दुरुस्ती केली नाही. निवडून आलेले लोकप्रतिनिधी असो की संबंधित विभागाचे अधिकारी शाळा कोसळल्यावर व जीवित हानी झाल्यावर या शाळेला भेट देतील का? असा असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी केला आहे. खांडबारा जिल्हा परिषद शाळेत मराठी, उर्दू व गुजराती या तिन्ही भाषेत विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जात आहे. नंदुरबार जिल्ह्यातील अधिकारी व लोकप्रतिनिधींना त्याचे काही देणे घेणे नाही. त्यामुळे यासंदर्भात थेट मुख्यमंत्र्यांनीच लक्ष घालावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. अधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर तात्पुरते आंदोलनाला स्थगिती देत शाळेच्या दुरुस्ती कामाला सुरुवात न झाल्यास पूर्ण नग्न आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, शिक्षणाधिकारी वंदना वळवी यांनी सदर आंदोलनाची दखल घेत निधी उपलब्ध होताच तात्काळ दुरुस्ती करण्यात येण्याचे लेखी आश्वासन दिल्याने सदरचे आंदोलन स्थगित करण्यात आल्याचे सांगण्यात आले. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी वंदना वळवी यांनी दिलेल्या लेखी आश्वासनात म्हटले आहे की, जिल्हा परिषद शाळा, खांडबारा ता. नवापूर येथील मराठी शाळेच्या 3 वर्गखोल्या, उर्दू शाळेच्या 2 वर्गखोल्या दुरुस्तीसाठी निधीची मागणी करण्यात आली आहे. निधी उपलब्ध होताच प्रथम प्राधान्याने या दोन्ही शाळांच्या वर्गखोल्या दुरुस्त करण्याची कार्यवाही विनाविलंब करण्यात येईल.
byMEDIA POLICE TIME
-
0