सत्ताधारी पक्षाला बाद करण्यासाठी कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे- राष्ट्रवादी (श. प.)चे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील.. (नंदुरबार जिल्हा विभागीय संपादक) : भाजपाने संविधान बदलण्यासाठी प्रयत्न केला होता परंतु जागृत मतदारांनी त्यांचा प्रयत्न हाणून पाडला. राज्यात महाविकास आघाडीला लोकसभा निवडणुकीत चांगले यश मिळाले आहे. विधानसभा निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीला सत्तेवर आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे माझ्या स्वप्नातला महाराष्ट्र हे अभियान सुरू केले असून सदर अभियान तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेऊन सत्ताधारी पक्षाला महाराष्ट्रातून बाद करावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी केले. येथील जैन प्लाझा येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटातर्फे निष्ठावान कार्यकर्ता संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे, जिल्हा परिषदेच्या सभापती हेमलता शितोळे पाटील, युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे संदीप परदेशी, डॉ. तुषार सनंसे, कमलेश चौधरी, शहराध्यक्ष एन.डी. पाटील, अल्पसंख्यांक विभागाचे ॲड. दानिश पठाण, मंजुळा पाडवी, रेश्मा पवार आदी उपस्थित होते. मार्गदर्शन करताना श्री पाटील म्हणाले की, नंदुरबार जिल्ह्यात खंबीर पक्ष संघटन बांधणे गरजेचे आहे. त्यासाठी लवकरच निरीक्षकांची नेमणूक करून नवीन पक्ष संघटन बांधण्यात येईल. लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने चांगली कामगिरी केली आहे. भाजपाने संविधान निर्माण करताना टीका केली, तिरंगा झेंड्यावर पण टीका केली. त्यांनी संविधान बदलण्याची प्रक्रिया केली पण मतदार जागृत झाला आणि भाजपाला त्याची जागा दाखवली. आदिवासी क्षेत्रात पेसा कायदा, बिंदू नामावली सोबत अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. बेरोजगारी वाढली आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच्या काळात महाराष्ट्र गुजरातच्या मागे पडला आहे. रोजगाराच्या संधी कश्या उपलब्ध होतील यासाठी महाविकास आघाडी प्रयत्न करेन .हमीभाव देण्यासाठी सरकार उदासीन आहे. केळी पपईला आधारभूत किमती देण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. सरकारचे भ्रष्टाचाराचे मुद्दे आम्ही विधानसभेत मांडले पण सरकारला उत्तर देता आले नाही. हे सरकार श्रीमंतांसाठी आहे. सदर सरकार घालवण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर माझा स्वप्नातला महाराष्ट्र कसा राहील हे अभियान राबवून जनतेत जागृती करण्यात येणार आहे. यासाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे असे आवाहन त्यांनी केले. यावेळी रोहिणी खडसे म्हणाल्या की, विधानसभा निवडणुकांना सामोरे जायचे आहे. त्या दृष्टिकोनातून हा संवाद मेळावा आयोजित करण्यात आला आहे .पक्षाचे संघटन मजबूत केल्याशिवाय निवडणुकीत यशस्वी होता येत नाही. पक्ष बळकट करण्यासाठी तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचण्याची गरज आहे. महाविकास आघाडीच्या पाठीशी जनता उभी आहे. संघटन वाढीसाठी सर्व कार्यकर्त्यांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे. वेळ कमी आहे त्यासाठी कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे. निष्ठेने पक्षाचे काम करा पक्षाचे जो चांगले काम करतो त्याला जबाबदारी दिली जाईल मतभेद विसरून कार्यकर्त्यांनी काम करावे असे त्यांनी सांगितले. यावेळी डाॅ. विशाल कुवरसिंग वाळवी यांनी कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी रवींद्र वळवी, मदन पावरा, डॉ. विशाल वळवी, वासुदेव गांगुर्डे यांनी आमदारकीसाठी आपण इच्छुक असल्याचे मनोगत व्यक्त केले.

Previous Post Next Post