*सातपुड्यातील गुरुजनांचा शिष्यांकडून सन्मान* (धडगाव तालुका प्रतिनिधी)- कोणत्याही देशाला बलवान बनवायचे असेल तर तेथील जनतेला उत्तम शिक्षण देणे आवश्यक असते, या विचाराने प्रेरित होऊन सातपुडा परिसरातील शिक्षकांनी आपले संपूर्ण आयुष्य खर्ची घातले. खऱ्या अर्थाने भारतात स्वातंत्र्यानंतर शिक्षणाची गंगा घरोघरी पोहोचली, परंतु सातपुडा परिसरात घरोघरी शिक्षण पोहोचविणे मोठे आव्हान होते. रस्त्यांचा अभाव व परभाषा सर्वात मोठे आव्हान होते. अतिदुर्गम भाग असल्याने पक्क्या वर्ग खोल्यांचा अभाव, आरोग्याच्या कुठल्याही सुविधा नसताना 70-80 च्या दशकात शिकलेल्या युवकांनी शिक्षकी पेशा स्वीकारला. त्यामुळे सातपुड्यातील मुलांना अक्षर ओळख होऊन भारतीय राज्यघटनेतील आदिवासींसाठी असलेले अधिकार माहित झाले असे उद्गार कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्रा.शांताराम वळवी यांनी काढले. हा सोहळा धडगाव येथील जनार्दन विद्याश्रम सभागृहात आयोजित करण्यात आला होता. तोरणमाळ पासून ते वडफळी पर्यंतचे शिक्षण स्नेही युवकांनी 'सातपुडा परिवर्तन परिवार' समूह तयार करून समाजाकडून सातपुडा परिसरात आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केलेल्या 138 निवृत्त शिक्षकांचा मोठ्या आनंदाने सन्मान केला. 'सातपुडा परिवर्तन परिवार' समूहाने या सोहळ्यासाठी समाजाला आर्थिक मदत करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला मोठा प्रतिसाद लाभून समाजाने या शिक्षकांप्रती ऋण व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. खुमानसिंग वळवी यांनी याप्रसंगी या भागात काम केलेल्या शिक्षकांच्या अद्वितीय योगदानाबद्दल गौरव उद्गार काढले. तसेच या परिसरात शिक्षणाचे जाळे विणणाऱ्या सातपुडा आदिवासी शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक शिक्षण महर्षी जनार्दन पोहऱ्या वळवी यांचेही स्मरण केले व त्यांच्या कार्याचा लेखाजोखा मांडला. कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण असलेले सुप्रसिद्ध कवी संतोष पावरा यांनी 'आमू आखा एक से' कवितेच्या माध्यमातून निवृत्त शिक्षकांप्रती हृदयपूर्वक आदरभाव व्यक्त केला. याप्रसंगी निवृत्त शिक्षक तानाजी पराडके, प्रा.केशव पावरा, अलका करमसिंग पाडवी जहांगीर टेट्या वळवी यांनी सत्काराला उत्तर देताना भौगोलिक दृष्ट्या अतिशय प्रतिकूल परिस्थितीत तसेच कुठलीही भौतिक सुविधा नसताना अतिशय प्रामाणिकपणे काम केल्याचे सविस्तर अनुभव कथन केले व सातपुडा परिवर्तन परिवार या युवकांच्या समूहाचे विविध सामाजिक उपक्रमाचे कौतुकही केले. तसेच याप्रसंगी सुप्रसिद्ध आदिवासी गीतकार सुभाष वळवी,आकाश वसावे व विश्वनाथ पाडवी यांनी विविध सामाजिक प्रबोधनात्मक गीते सादर करून निवृत्त शिक्षकांप्रती ऋण व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजीव पावरा, प्रा.राकेश वळवी आणि आभार विजय पराडके यांनी व्यक्त केले. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते धीरसिंग वळवी, शैलेंद्र वळवी, रोहित वळवी, भरत पावरा, विनोद वळवी, बाबुलाल पावरा, महेश पाडवी, गुलाब पावरा, सुभाष तडवी, शिवराम पाडवी, कुंदा वळवी, शिल्पा वळवी, आरती वळवी, पल्लवी वळवी, रीना वसावे यांनी विशेष परिश्रम घेतले.

सातपुड्यातील गुरुजनांचा शिष्यांकडून सन्मान*        
Previous Post Next Post