सुलेमान खानच्या मृत्यूप्रकरणी मोठ्या राजकीय नेत्याचा दबाव? जामनेर तालुक्यातील बेटावद खुर्द येथील तरुण सुलेमान खान याचा सामूहिक मारहाणीत झालेल्या मृत्यूप्रकरणी मुख्य गुन्हेगारांवर कारवाई झाली पाहिजे. ती होत नाही. कारण एका बड्या राजकीय नेत्याचा पोलिसांवर दबाव येत आहे, असा आरोप सोशल मीडिया डेमोक्रॅटिक पार्टी तर्फे करण्यात आला असून, आज जिल्हाधिकारी कार्यालयात धरणे आंदोलन करून जिल्हाधिकाऱ्यांना मागण्याचे निवेदन देण्यात आले. तब्बल 11 दिवस या घटनेला झाले असून अद्याप मुख्य गुन्हेगारांना पकडले जात नाही. पोलिसांवर दबाव येतो आहे. मुख्य गुन्हेगारांना पकडले नाही तर जिल्ह्यासह महाराष्ट्रात मोठे आंदोलन केले जाईल, असा इशारा सुद्धा या संघटनेने दिला आहे.गेल्या 11.12. दिवस झाले सुलेमान खान मृत्यू प्रकरण दिवसेंदिवस तापत आहे. महाराष्ट्रातील विविध भागातून अल्पसंख्यांक मुस्लिम समाजाचे नेते बेटावदला तसेच जामनेर आणि जळगावला भेटी देऊन जिल्हा प्रशासनाशी चर्चा करून मुख्य गुन्हेगारांना तातडीने पकडावे अन्यथा त्यांचे महाराष्ट्रभर पडसाद उमटतील, असा इशारा देत आहेत. समाजवादी पक्षाचे अबू आझमी यांनीही थेट जामनेरचे नेते जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचा पोलिसांवर दबाव येतोय कारण गिरीश महाजन यांच्या ड्रायव्हरचा मुलगा त्यात मुख्य गुन्हेगार असून त्याच्यावर पोलीस कारवाई करीत नाहीत, असा आरोप केला. पोलिसांनी सुलेमांच्या मृत्यूनंतर आठ जणांना ताब्यात घेतले असले तरी मुख्य गुन्हेगार मोकाट आहेत, असा आरोप केला जातो आहे. त्यांना पोलीस का पकडत नाहीत? अशी त्यांची मागणी आहे.पोलिसांनी जामनेर मधील ज्या कॅफेमध्ये सुलेमान बसला होता आणि त्याला तेथून उचलून नेऊन सामूहिक अमानुष मारहाण केली, त्या कॅफेवर कारवाई करून ते कॅफे सील केले आणि जामनेर मधील 10 कॅफेंवर कारवाई करून ते कॅफे बंद केले असले तरी सुलेमान मृत्यूप्रकरणी पोलिसांच्या या कारवाईबाबत समाधानी नाहीत. जामनेरचे सुलेमान खान मृत्यू प्रकरण जामनेर सहज जळगाव जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रातला काळीमा फासणारी घटना आहे. बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी मिळती जुळती घटना असल्याचा आरोप केला जातो आहे. सुलेमानच्या मृत्यूप्रकरणी चौकशीच्या मागणीसाठी बेटावद, जामनेर आणि जळगाव येथे अल्पसंख्यांक नेत्यांची जणू रीघच लागली आहे. संभाजीनगरचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी सुद्धा जिल्हा प्रशासनाची भेट घेऊन पारदर्शकपणे चौकशी करावी, अशी मागणी केली आहे. तसे झाली नाही तर महाराष्ट्रभर आंदोलन करण्याचा इशारा देखील दिला आहे.जळगाव जिल्ह्यातील एकता संघटनेतर्फे सुलेमानचा मृत्यू झाला त्या दिवसापासून या घटनेची पारदर्शक चौकशी व्हावी म्हणून सातत्याने मागणी केली जात आहे. परवा उपमुख्यमंत्री अजित पवार जळगावला आले असता त्यांना एकता संघटनेचे नेते फारुक शेख यांचे नेतृत्वात भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करत या प्रकरणात पोलिसांवर राजकीय दबाव येतो आहे, त्यामुळे सुलेमान मृत्यूप्रकरणी न्याय मिळणार नाही, तो मिळावा, म्हणून अजित पवारांना त्यांनी निवेदन दिले. सुरुवातीपासून सुलेमान मृत्यू प्रकरणातील आरोपींना मकोका कायद्याअंतर्गत कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे. तसेच एकदा संघटनेतर्फे आठ ते दहा मागण्या केल्या आहेत. या मागण्यांची पूर्तता झाली नाही तर एकता संघटनेतर्फे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देखील त्यांनी दिला आहे.एकंदरीत सुलेमान मृत्यू प्रकरण दिवसेंदिवस तापत असून त्यांने महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेत आहे. याबाबत अनेक अल्पसंख्यांक नेत्यांचा जामनेरचे मंत्री गिरीश महाजन यांच्यावर संशय व्यक्त केला जात असून या प्रकरणी गिरीश महाजन यांनी ते नाकारले आहे. पोलीस यांची कारवाई करीत आहेत. आरोपींना पकडले आहे. त्यात कसलाही हस्तक्षेप केला जात नाही, असे महाजन यांनी म्हटले आहे. तरीसुद्धा सुलेमान खान या तरुणाचा सामूहिक मारहाणीत मृत्यू प्रकरण दिवसेंदिवस तापात आहे. पोलिसांनी पारदर्शक चौकशी करावी आणि जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही याची काळजी घ्यावी. या घटनेचे मुख्य तपास अधिकारी कासार यांना एसआयटीतून वगळा, ही मागणी केली जाते आहे. तेव्हा त्या अधिकाऱ्याला तपासातून वगळले तर काय बिघडणार आहे?
byMEDIA POLICE TIME
-
0