जुईनगर, सानपाडा -पामबीच वा वाशीगाव येथे हळदीकुंकू कार्यक्रमांच्या आयोजनातून महिला सुरक्षा विषयक जनजागृतीपर पोलिसांच्या संवादाचे आयोजन. नवी मुंबईतील विविध ठिकाणी मकरसंक्राती पासुन हळदीकुंकूवाच्या कार्यक्रमांचे आयोजन विविध संस्था, लोकप्रतिनिधी वा पक्षांच्या माध्यमातून केले जाते. त्यानुसार माजी नगरसेविका श्रीमती फशीबाई करसन भगत, वैजयंती दशरथ भगत व रुपाली निशांत भगत यांनी जुईनगर, सानपाडा - पामबीच वा वाशीगाव अश्या तीनही ठिकाणी तीनही प्रभागातील महिला भगिनींसाठी २४ ते २६ जानेवारी या तिन्ही दिवशी हळदीकुंकू कार्यक्रमांचे आयोजन केले होते. हळदीकुंकू कार्यक्रमात केवळ हळदीकुंकू व वाण एवढेच नियोजन न करता याच कार्यक्रमातून उपस्थित महिलांना नवी मुंबई पोलिसांच्या निर्भया पथकातील महिला अधिकारी सविता मोहिते यांनी महिलांच्या बाबतीत होणारे सायबर गुन्हे, ऑनलाईन फसवणूक व मोबाईलशी संबंधित कॉल व इतर गैरवापर याबाबतीत घडलेल्या घटनांच्या उदाहरणासह सावधानता कशी बाळगावी याबाबत सविस्तर माहिती दिली, तसेच कार्यक्रमात उपस्थित महिलांशी थेट संवाद देखील महिला पोलीस अधिकाऱ्यांनी साधला. कार्यक्रमांत निवेदक राजेश तांबडे व दामिनी नलावडे यांच्यावतीने विविध खेळांचे मनोरंजनपर आयोजन करण्यात आले होते.
byMEDIA POLICE TIME
-
0