*प्रा.सुरेश परसावार यांचे प्रयागराज येथे हृदयविकाराच्या झटक्याने निधन*. (महेश निमसटकर तालुका प्रतिनिधि भद्रावती ) भद्रावती,दि.२९:-येथील लोकमान्य कनिष्ठ महाविद्यालयाचे सेवानिवृत्त उपप्राचार्य प्रा.सुरेश परसावार यांचे प्रयागराज येथे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दि.२९ जानेवारी रोजी दुपारी १२.३० वाजताच्या दरम्यान निधन झाले. मृत्यू समयी ते ६१ वर्षांचे होते. प्रा.परसावार प्रयागराज येथे कुंभमेळ्यासाठी विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांसोबत गेले होते.दरम्यान बुधवारी दुपारी ऑटोत बसत असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यात त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, जावई आणि नातवंड असा बराच मोठा आप्त परिवार आहे. प्रा.परसावार रा.स्व.संघाचे निष्ठावंत स्वयंसेवक होते. संघाच्या प्रत्येक कार्यक्रमात ते हिरीरीने सहभागी होत होते. त्यांनी रा.स्व.संघाचे जिल्हा कार्यवाह म्हणून यशस्वीरित्या आपले दायित्व पार पाडले होते. तसेच विश्व हिंदू परिषदेचे चंद्रपूर विभाग मंत्री आणि विदर्भ प्रांत धर्माचार्य संपर्क प्रमुख म्हणून त्यांनी कार्य केले आहे. ते येथील लोकमान्य कनिष्ठ महाविद्यालयात मराठी विषयाचे अधिव्याख्याते होते. नुकतेच २०२१ मध्ये कनिष्ठ महाविद्यालयातून उपप्राचार्य पदावरून सेवानिवृत्त झाले होते.एक मनमिळाऊ व्यक्तीमत्व हरपल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
byMEDIA POLICE TIME
-
0