*देवळीतील नागरिकांच्या हक्कासाठी निवेदन; कुरण की वनक्षेत्र यावर प्रशासन गोंधळले... (*वर्धा जिल्हा प्रतिनिधी:-(अब्दुल कदिर) देवळी शहरातील प्रभाग क्रमांक 8, वार्ड नंबर 16, मीरंनाथ मंदिर मागील सर्वे नंबर 961 येथील नागरिकांच्या हक्कासाठी समाजसेवक व माजी नगराध्यक्ष जब्बार तवर यांच्या नेतृत्वाखाली आज नगरपरिषद मुख्याधिकारी व तहसीलदार देवळी यांना निवेदन सादर करण्यात आले. नगरपरिषदेकडून सांगण्यात आले की सदर जागा 2023 पर्यंत कुरण क्षेत्रात होती; मात्र 2023 नंतर ती वनक्षेत्रात दाखल झाल्याचे कळविण्यात आले. परंतु हा फेरफार नेमका कधी, कसा व कोणाच्या आदेशाने झाला याचे स्पष्ट उत्तर प्रशासन देऊ शकले नाही. नागरिकांनी थेट सवाल उपस्थित केला – “2010-11 मध्ये येथे घरकुलाची निर्मिती झाली आणि 2023 पर्यंत जागा कुरण क्षेत्रात होती, तर अचानक ती वनक्षेत्रात कशी दाखल झाली? तसेच जर ती वनक्षेत्रातच असेल, तर नगरपरिषद आजतागायत कर वसूल कसा करते? हे कायद्याला धरून आहे का?” तहसीलदार देवळी यांनीही मान्य केले की सदर जागा खरोखर वनक्षेत्रात आहे की कुरण क्षेत्रात, याबाबत त्यांनाही खात्री नाही. एवढ्या गंभीर विषयावर प्रशासन हात झटकते, हे नागरिकांना अजिबात मान्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. हा फेरफार राजकीय दबावाखाली झाला की प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या हस्तक्षेपामुळे, हा प्रश्न स्थानिकांमध्ये चर्चेचा मुख्य विषय ठरला आहे. निवेदनावेळी माजी नगराध्यक्ष जब्बार तवर, समाजसेवक शंकर केवदे, किरण बोंडे, विष्णू तडसे, संतोष शिवरकर, निलेश महाजन, गजानन निकुरे, धनराज निंभोरे आदींसह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. नागरिकांनी इशारा दिला की या प्रकरणात अधिकृत कागदपत्रांच्या आधारे पारदर्शक उत्तर मिळालेच पाहिजे; अन्यथा न्याय मिळवण्यासाठी पुढील तीव्र आंदोलनाचा मार्ग अवलंबावा लागेल.
byमीडीया पोलीस टाईम
-
0