गोरक्षेच्या नावाखाली जमावशाहीचा कहर!**_फैजपूरमध्ये मजुरावर जीवघेणा हल्ला, अल्पवयीन पुतण्या फरहानलाही लोखंडी रॉडने अमानुष मारहाण_**BNS अंतर्गत गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करण्याची मागणी*. (रावेर/शेख शरीफ)गोरक्षेच्या नावाखाली कायदा हातात घेऊन उन्माद माजवणाऱ्या टोळ्यांचे धाडस दिवसेंदिवस वाढत असतानाच फैजपूर तालुक्यातील आंदलवाडी परिसरात मानवतेला काळीमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. जलील शेख साबीर (वय 53, मजूर) व त्यांचा अल्पवयीन पुतण्या फरहान शेख (वय 17) यांच्यावर गौमांस विक्रीच्या खोट्या संशयावरून अमानुष मारहाण, जिवे मारण्याच्या धमक्या व जबरी चोरी करण्यात आल्याचा गंभीर आरोप आहे.दिनांक 18 जानेवारी 2026 रोजी रात्री जलील शेख हे बागोदा येथून फैजपूरकडे मोटरसायकलने जात असताना आंदलवाडी गावाबाहेर काही तरुणांनी त्यांची दुचाकी अडवली. “तू गौमांस विकतोस” असा खोटा आरोप करत शिवीगाळ सुरू करून लोखंडी फायटर व रॉडने छाती, पोट व संपूर्ण शरीरावर बेदम मारहाण करण्यात आली.मारहाणीदरम्यान “यांना जिवंत सोडू नका” अशा धमक्या देण्यात आल्या. याचवेळी आरोपींनी ₹2000 ते ₹2200 रोख रक्कम व मोबाईल फोन जबरदस्तीने हिसकावून घेतला.घटनास्थळी आलेल्या स्थानिक महिलेने समजावून सांगण्याचा प्रयत्न केला तरीही हल्लेखोर थांबले नाहीत. धक्कादायक बाब म्हणजे पोलिसांच्या उपस्थितीतही पीडिताला जबरदस्तीने मोटरसायकलवर बसवून नेत दसनूर परिसरात पुन्हा मारहाण व शिवीगाळ करण्यात आली.या अमानुष हल्ल्यात जलील शेख यांची प्रकृती गंभीर झाली. चक्कर येणे, उलट्या, अंतर्गत दुखापती वाढल्याने प्रथम रावेर व नंतर जळगाव जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार करण्यात आले. 19 जानेवारी रोजी डिस्चार्ज देण्यात आला असला तरी आजही तीव्र वेदना व दुखापती कायम आहेत.या प्रकरणी भूषण बाळू कोळी, सागर प्रकाश कोळी, हर्षल विजय कोळी, हर्षल ज्ञानेश्वर कोळी, गज्या रमेश, अश्विन सोपान कोळी, ओम योगेश कोळी, चेतन चंदू कोळी, कुलदीप पवार, वृषाली हॉटेलवाला (वाघोदा) तसेच 10 ते 15 अज्ञात व्यक्तींविरोधात BNS अंतर्गत गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे.पीडितांच्या वतीने ही तक्रार निंभोरा पोलीस स्टेशन येथे दाखल करण्यात आली असून, या घटनेमुळे परिसरात भीती व संतापाचे वातावरण पसरले आहे. या प्रकरणी दोषींवर कठोर कलमांखाली कारवाई करून तात्काळ अटक करावी, जमावशाहीला आळा घालावा व पीडितांना संरक्षण द्यावे, अशी जोरदार मागणी निवेदनाद्वारे पोलिस व प्रशासनाकडे करण्यात आली आहे.कायदा हातात घेणाऱ्या जमावशाहीवर पोलिसांचा कडक अंकुश कधी? असा संतप्त सवाल आता जनतेतून उपस्थित केला जात आहे.
byमीडीया पोलीस टाईम
-
0