श्री. पी. के. अण्णा पाटील फाउंडेशनचे पुरुषोत्तम पुरस्कार जाहीर.संस्था स्तरावर आपकी जय परिवार तर व्यक्ती स्तरावर पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांची निवड.. (प्रा. डी. सी. पाटील नंदुरबार जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी ) शहादा (प्रतिनिधी) : येथील श्री. पी. के. अण्णा पाटील फाउंडेशन व पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळ यांच्या वतीने देण्यात येणाऱ्या पुरुषोत्तम पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. या वर्षी संस्था स्तरावर मोरवड (ता. तळोदा जि. नंदुरबार) येथील आपकी जय परिवार या संस्थेस तर व्यक्ती स्तरावर मुंबई येथील सुप्रसिध्द नेत्रतज्ञ पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांना दिला जाणार आहे.अशी माहिती फाउंडेशनचे अध्यक्ष बापूसाहेब दीपकभाई पाटील व सचिव प्रा.मकरंद पाटील यांनी दिली आहे.शहादा येथील श्री. पी. के. अण्णा पाटील फाउंडेशनच्या वतीने दरवर्षी सहकार महर्षी अण्णासाहेब पी. के. पाटील यांच्या जयंती दिनानिमित्त सामाजिक, शैक्षणिक व संशोधन क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणाऱ्या महाराष्ट्रातील व्यक्ती व संस्थेला पुरुषोत्तम पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. पुरस्काराचे स्वरुप एक लाख रुपये व मानचिन्ह या स्वरुपाचे असते. आतापर्यंत हा पुरस्कार व्यक्ती स्तरावर प्रा. डॉ. राम ताकवले (माजी कुलगुरु पुणे विद्यापीठ, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक व इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ नवी दिल्ली), डॉ.यु. म. पठाण (संत साहित्याचे गाढे अभ्यासक), डॉ. विजय भटकर (परम संगणकाचे प्रमुख वैज्ञानिक), डॉ. वसंत गोवारीकर (माजी संचालक, इस्रो, माजी कुलगुरु पुणे विद्यापीठ), प्रा. सुखदेव थोरात (माजी चेअरमन, विद्यापीठ अनुदान आयोग, नवी दिल्ली), डॉ. नागनाथ कोतापल्ले (माजी कुलगुरु डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद), डॉ. जयंत नारळीकर (जेष्ठ गणितज्ज्ञ व भौतिक शाखज्ञ, पुणे), डॉ. दिपक जयंतराव टिळक (कुलगुरु, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, पुणे), डॉ. बी. के. गोयल (बॉम्बे हॉस्पीटल, बॉम्बे), डॉ. नरेंद्र जाधव (सदस्य, नियोजन आयोग नवी दिल्ली), डॉ. सदानंद श्रीधर मोरे (प्राध्यापक तत्वज्ञान विभाग, पुणे विद्यापीठ, पुणे), सौ. सिंधुताई सपकाळ (संस्थापक अध्यक्षा, सन्मती बाल निकेतन संस्था), डॉ. शरद पी. काळे (भाभा अणुसंशोधन केंद्र, मुंबई येथील न्युक्लीअर ॲग्रीकल्चर व बायोटेक्नॉलॉजी विभागाचे प्रमुख), पोपटराव पवार (सरपंच हिवरे बाजार अहमदनगर, माजी विधानपरिषद सदस्य), जेष्ट कवी पद्मश्री ना.धों. महानोर, ज्ञानदेव गंगाराम हापसे उर्फ डॉ. डी.जी. हापसे (उस तज्ज्ञ), सतीश मराठे (संचालक रिझर्व बँक ऑफ इंडिया), पानिपतकार विश्वास पाटील (जेष्ठ साहित्यीक मुंबई), श्रीमती राहीबाई सोमा पोपेरे (कोंभाळणे ता. अकोले जि. अहमदनगर), जादुगार जितेंद्र रघुबीर भोपळे, (पुणे), चैत्राम देवचंद पवार (बारीपाडा), श्रीमती भारतबाई देवकर (तुळजापूर) यांना देण्यात आला आहे. तर संस्था स्तरावर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक, महात्मा ज्योतिबा फुले कृषि विद्यापीठ राहुरी, श्री क्षेत्र चैतन्य अध्यात्मिक केंद्र (दुधिबरे), मराठी साहित्य परिषद पुणे, महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभा पुणे, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव, कुसुमाग्रज प्रतिष्ठान नाशिक, भगिनी निवेदिता ग्रामीण विज्ञान संस्था बहादरपुर जि. जळगाव, साधना ट्रस्ट पुणे, हेल्पर्स ऑफ दि हॅन्डिकैप्ड कोल्हापूर, सेवाग्राम आश्रम वर्धा, डॉ. लाजपतराय मेहरा न्युरोथेरपी सुर्यमाळ जि. ठाणे, पालवी प्रतिष्ठान पंढरपूर, इतिहासाचार्य वि.का. राजवाडे संशोधन मंडळ, धुळे, मराठी विज्ञान परिषद मुंबई, श्रध्दा रिहॅबीलीटेशन फाउंडेशन वेणगाव कर्जत जि. रायगड नाम फाउंडेशन पुणे, टिळक राष्ट्रीय विद्यालय खामगाव जि. बुलढाणा, केशवस्मृती प्रतिष्ठान जळगाव, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती महाराष्ट्र प्रांत पुणे, तर्पण फाऊंडेशन मुंबई यांना दिलेला आहे.यावर्षी 9 ऑक्टोबर 2025 रोजी संस्था स्तरावरील पुरुषोत्तम पुरस्कार मोरवड (ता. तळोदा जि. नंदुरबार) येथील आपकी जय परिवार या संस्थेस देण्यात येणार आहे. तळोदा तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी वसलेल्या मोरवड गावातील आदिवासी कष्टकरी कुटुंबातील गुलाम महाराज या समाज सुधारणेची तळमळ असलेल्या प्रामाणिक व आदर्श व्यक्तिमत्वाने स्वातंत्र्यपूर्व काळात स्थापन केलेला आरती समाज अर्थात आपकी जय परिवार होय. भक्तीपंथाच्या माध्यमातून समाजाला योग्य दिशा देणाऱ्या या परिवाराकडे समाजातील सर्वच घटक आकर्षीत झाले आहेत. आपण सर्व एक आहोत या अर्थाने एकमेकांना भेटल्यावर आपकी जय असा जयकार करण्याच्या अनोख्या पध्दतीने परिवाराने समाजात आत्मसन्मानाची भावना निर्माण केली आहे. आप म्हणजेच आरती समाजाच्या दिनांक 22 ऑगस्ट 1938 रोजी झालेल्या आरतीला त्यावेळी सव्वा लाख लोकांची उपस्थिती असल्याची नोंद आहे. परिवाराकडून अविरतपणे सुरु असलेली दर सोमवारची सामुहिक आरती जनसामान्यात आदरभाव निर्माण करणारी आहे. शिक्षणाचा गंधही नसलेल्या या समाज सुधारकांच्या शिकवण व दशसुत्रीमुळे समाज मोठ्या प्रमाणात व्यसनमुक्त झाला आहे. त्यांच्या देवाज्ञेनंतर संत श्री. रामदास महाराज, संत श्री. चंद्रसेन महाराज व आता श्री. जितुदादा पाडवी व कुटूंबीय आपकी जय परिवाराच्या माध्यमातून समाज जागृती व भक्ती पंथाचा जागर करीत आहेत. त्यांच्या धार्मिक व सामाजिक कार्याची दखल घेत पुरुषोत्तम पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.यावर्षी व्यक्ती स्तरावरील पुरुषोत्तम पुरस्कार पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांना दिला जाणार आहे. माकेगाव (ता. रेणापूर जिल्हा लातुर) या लहानश्या खेडेगावात जन्मलेल्या डॉ. तात्याराव लहाने यांचे दहावी पावेतोचे शिक्षण गावीच झाले. कुशाग्र बुध्दीमत्ता व शिक्षकांचे मार्गदर्शन आणि मदतीने त्यांनी मराठवाडा विद्यापीठातून ऑप्थ्यामाॅलोजी विषयातून एम.बी.बी.एस.ची पदवी घेतल्यानंतर सन 1994 पासून जे.जे. रुग्णालयात नेत्रशल्य चिकित्सा विभाग प्रमुख म्हणून कार्यरत होते. त्यांनी सुमारे एक लाख सत्तर हजारपेक्षा अधिक नेत्र शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडल्या आहे. यासाठी त्यांनी कधी कधी अठरा ते तेवीस तास काम केले आहे. अत्यंत साधी व सर्वसामान्य रहाणीमान असलेले डॉ. लहाने जगविख्यात नेत्रतज्ञ आहेत. भारत सरकारने त्यांना सन 2008 साली पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले आहे. जे.जे. गृप ऑफ हॉस्पीटलचे प्रमुख आधारस्तंभ असलेले डॉ. तात्याराव लहाने यांना अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्यांच्या वैद्यकिय व समाजिक क्षेत्रातील कार्याचा गौरव म्हणून पुरुषोत्तम पुरस्कार प्रदान केला जाणार आहे अशी माहिती फाउंडेशनचे अध्यक्ष बापूसाहेब दीपकभाई पाटील व सचिव प्रा. मकरंद पाटील यांनी दिली आहे. दरम्यान, सदर पुरस्कार प्रदान समारंभ गुरूवार दि. 9 ऑक्टोबर रोजी सकाळी 9:30 वाजता पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाच्या प्रांगणात संपन्न होणार आहे.
byमीडीया पोलीस टाईम
-
0