नाशिक ग्रामीण पोलीस दलात ४३ नवीन चारचाकी वाहने दाखल.. (मनमाड नाशिक विभागीय संपादक सतीश परदेशी) दिनांक ०५/१२/२०२५नाशिक ग्रामीण पोलीस दलात नव्याने दाखल झालेल्या एकूण ४३ चारचाकी वाहनांचा हस्तांतर सोहळा मा. जिल्हाधिकारी नाशिक श्री. आयुष प्रसाद, मा. विशेष पोलीस महानिरीक्षक श्री. दत्तात्रय कराळे, नाशिक परिक्षेत्र नाशिक, पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण श्री. बाळासाहेब पाटील यांचे उपस्थितीत आज रोजी पोलीस मुख्यालय आडगाव येथील परेड मैदानावर संपन्न झाला. यावेळी अपर पोलीस अधीक्षक श्री. आदित्य मिरखेलकर, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा श्री. रविंद्र मगर, पोलीस निरीक्षक मोटर परिवहन विभाग श्री. अनिल घाडगे, पोलीस निरीक्षक वेल्फेअर श्री. राहुल मोरे, राखीव पोलीस निरीक्षक श्री. पंडित चव्हाण यांचेसह अधिकारी व अंमलदार उपस्थित होते. सदर सोहळयाप्रसंगी प्रमुख अतिथींनी नवीन चारचाकी वाहनांना हिरवा झेंडा दाखवून मार्गस्थ केले.नाशिक ग्रामीण जिल्हा हा भौगोलिकदृष्ट्या मोठा असुन जिल्हयास गुजरात राज्याची व इतर जिल्हयांची सीमा जोडलेली असल्याने तसेच मालेगाव हा संवेदनशील भाग असल्याने पोलीस यंत्रणेस सातत्याने कायदा व सुव्यवस्था बंदोबस्त पार पाडावा लागतो. तसेच नाशिक जिल्हयात आगामी सिंहस्थ कुंभमेळयाकरीता देश-विदेशातुन फार मोठ्या प्रमाणात भाविक येणार असल्यामुळे कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने तसेच व्हीआयपी/व्हीव्हीआयपींच्या सुरक्षेच्या दृष्टीने वाहनताफ्यांकरीता वाहनांची अत्यंत आवश्यकता भासणार आहे.त्याचप्रमाणे जिल्हयात त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग, सप्तश्रृंगी गड, मांगीतुंगी व लगतचे शिर्डी यासारखे धार्मिकस्थळे असल्याने राज्यातुन व परराज्यातुन भाविक मोठ्या प्रमाणात येत असतात तसेच जिल्हयातील कृषीउत्पन्न बाजार समित्या, पर्यटनस्थळे, विमानतळ या ठिकाणांवर सुरक्षा बंदोबस्त / व्हीआयपी भेटींच्यावेळी वाहनताफे पुरविणे आवश्यक असते.तसेच नाशिक ग्रामीण पोलीस घटकात एकूण ४० पोलीस स्टेशन, आठ उपविभागीय पोलीस अधिकारी यांची कार्यालये, तर अपर पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण व मालेगाव विभाग अशी एकूण ५० कार्यालये व इतर शाखा कार्यरत आहेत. सुमारे साडेतीन हजार पोलीस अंमलदार व पोलीस अधिकारी कार्यरत असलेले जिल्हा ग्रामीण पोलीस दल सुमारे १५,००० चौरस किलोमीटर परिसरातील कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी सांभाळत आहेत. मागील काही दिवसांपासून जिल्हा ग्रामीण पोलीसांकडे वाहनांची कमतरता भासत होती. उपलब्ध असलेली वाहने मोठया प्रमाणावर नादुरूस्त झाल्याने पोलीस ठाण्यांच्या एकंदर कामकाजावर त्याचा विपरीत परिणाम होत होता.तसेच जिल्हयातील नागरीकांच्या तक्रारींची शीघ्रतेने दखल घेण्यासाठी डायल ११२ ही योजना कार्यन्वीत आहे. सदर योजनेअंतर्गत जिल्हयाच्या नियंत्रण कक्षास प्राप्त झालेल्या तक्रारींची माहिती अगदी कमी कालावधीत संबंधीत कॉल करणा-या व्यक्तीच्या अधिक जवळ असणा-या वाहनास पुरवली जाते. नागरीकांच्या तक्रारींची शिघ्रतेने दखल घेऊन त्यांच्या सोडवणुकीसाठी ग्रामीण पोलीस दलास वाहनांची असणारी गरज आणखी वाढली होती.सदरची बाब लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. बाळासाहेब पाटील यांनी वाहनांबाबतची मागणी मा. जिल्हाधिकारी श्री. आयुष प्रसाद यांचे मार्फतीने जिल्हा नियोजन समितीकडे नोंदवली होती. ग्रामीण पोलीस दलास वाहनांची असलेली निकडीची गरज लक्षात घेवून शासनाने सदर कामास प्राधान्याने मंजुरी देत नाशिक ग्रामीण घटकास जिल्हा नियोजन समितीच्या निधीमधून एकलस्त्रोत पध्दतीने नाशिक ग्रामीण पोलीस दलास नवीन ४३ चारचाकी वाहने त्यात ३५ महिंद्रा बोलेरो न्युओ, ०५ महिंद्रा स्कॉर्पिओ-एन, ०२ इनोव्हा क्रिस्टा, ०१ एक्सयुव्ही ७०० अशी एकूण ४३ वाहने प्राप्त झाली आहे. तसेच नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस दलास मंजुर असलेल्या ८३ वाहनापैकी उर्वरीत ४० वाहने व आवश्यक वाहनांबाबत निधी मंजुर करून, तातडीने वाहने पुरविण्यात येतील असे यावेळी मा. जिल्हाधिकारी यांनी सांगितले. तसेच आगामी कालावधीत पोलीस दलास उपयुक्त साधनसामुग्रीसाठी तत्पर राहु असेही यावेळी सुचित करण्यात आले.सदर नवीन व सुसज्ज वाहनांच्या उपलब्धतेमुळे नाशिक ग्रामीण पोलीसांना जिल्हयातील कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्न, रात्रगस्त, विविध प्रकारचे बंदोबस्त / व्हिआयपी दौरे, नाकाबंदी याबरोबरच डायल ११२ योजनेंतर्गत तक्रारदारांचे कॉल स्वीकारून त्यावर शिघ्रतेने कारवाई करण्यासाठी मोठी मदत होणार आहे.

नाशिक ग्रामीण पोलीस दलात ४३ नवीन चारचाकी वाहने दाखल..                                           
Previous Post Next Post