राजकीय 'मैत्री' की 'गद्दारी'? फैजपूर पालिकेत काँग्रेसच्या आशीर्वादाने भाजपाचे 'पतीराज' स्वीकृत! (मयूर मेढे | फैजपूर | मो. 8806010700फैजपूर | ) प्रतिनिधी, राजकारणात कोणीही कोणाचा कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो, ही म्हण फैजपूर नगर परिषदेच्या विशेष सभेत काँग्रेसच्या नगरसेवकांनी तंतोतंत खरी करून दाखवली आहे. निमित्त होते उपनगराध्यक्ष आणि स्वीकृत सदस्य निवडीचे, पण चर्चा रंगली ती काँग्रेस आणि भाजपाच्या अभद्र युतीची! ज्या भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी राज्यात आणि केंद्रात काँग्रेस जीव तोडून लढते, त्याच काँग्रेसने फैजपुरात चक्क भाजपाच्या नगराध्यक्षांच्या पतीला पालिकेत एन्ट्री देण्यासाठी रेड कार्पेट अंथरल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे.काँग्रेसचे कमळ प्रेम उफाळून आले!नगराध्यक्षा दामिनी पवन सराफ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या सभेत घडलेला प्रकार निष्ठावान काँग्रेस कार्यकर्त्यांच्या डोळ्यात अंजन घालणारा ठरला आहे. स्वीकृत सदस्य पदासाठी काँग्रेसकडे सक्षम कार्यकर्ते किंवा अल्पसंख्यक चेहऱ्यांची वानवा होती का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. कारण, काँग्रेसच्या गटातून चक्क भाजपा नगराध्यक्षांचे पती पवन सराफ यांचा प्रस्ताव दाखल केला जातो आणि तो मंजूरही होतो, हे मॅच फिक्सिंग नाही तर काय?डॉ. दानिश शेख यांचा प्रस्ताव दाखल करणे आणि तो तांत्रिक मुद्द्यांवरून अपात्र ठरवणे, हा केवळ एक 'दीखावा' होता का? अशी शंका आता उपस्थित होत आहे. जर काँग्रेसला खरोखरच डॉ. शेख यांना संधी द्यायची होती, तर पवन सराफ यांचा पर्यायी प्रस्ताव का दिला? आणि तोच प्रस्ताव मंजूर झाल्यावर काँग्रेस गटनेते आता जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेण्याची भाषा करत आहेत, हे म्हणजे वरातीमागून घोडे दामटण्याचा प्रकार असल्याची बोचरी टीका होत आहे.गद्दारांचा बाजार आणि निष्ठेचा बळीया राजकीय साठमारीत काँग्रेसचे एकनिष्ठ कार्यकर्ते आणि मित्रपक्ष उघड्यावर पडले आहेत. माजी उपनगराध्यक्ष शेख कुर्बान यांनी नगरपरिषदे समोर "गद्दार... गद्दार..." अशा घोषणा देत केलेला संताप हा केवळ त्यांचा एकट्याचा नसून, तो प्रत्येक फसवल्या गेलेल्या कार्यकर्त्याचा आवाज होता. शहर विकास आघाडीचे नगरसेवक केतन किरंगे यांनी मांडलेली भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. मित्रपक्षांना विश्वासात न घेता, परस्पर भाजपाशी सोयरीक साधून काँग्रेसने नेमकं काय साध्य केलं? अंबरनाथ आणि अकोट नंतर आता फैजपुरातही काँग्रेस नगरसेवकांनी गद्दारीचा पॅटर्न राबवला आहे, असा थेट आरोप होत आहे. पक्षादेश धुडकावून आणि शहराध्यक्षांना अंधारात ठेवून घेतलेला हा निर्णय काँग्रेसच्या स्थानिक नेतृत्वाचे वस्त्रहरण करणारा आहे.उपनगराध्यक्ष पदी निकिता कोळी, पण चर्चा सराफ फॅक्टरचीचदुसरीकडे, उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भाजपच्या निकिता कोळी यांनी १३ मते मिळवून बाजी मारली. त्यांनी राष्ट्रवादीच्या (अजित पवार गट) सफुराबी शेख यांना (९ मते) यांचा पराभव केला. निकिता कोळी या सर्वात कमी वयाच्या उपनगराध्यक्षा ठरल्या, ही जमेची बाजू असली तरी, या निवडीपेक्षा जास्त चर्चा पवन सराफ यांच्या 'बॅकडोअर एन्ट्री'चीच रंगली आहे. एमआयएमचे युनूस मोमीन यांनी तटस्थ राहून आपली वेगळी भूमिका जपली, पण काँग्रेसच्या या भूमिकेने भाजपाला मात्र आयते बळ मिळाले आहे.राहुल गांधी संविधान वाचवा म्हणत देश पिंजून काढत असताना, फैजपुरातील त्यांचेच शिलेदार स्थानिक फायद्यासाठी संविधानात्मक मूल्यांना हरताळ फासून भाजपाशी हातमिळवणी करत आहेत. राहुल गुजराथी यांची भाजपाकडून आणि पवन सराफ यांची काँग्रेसच्या पाठिंब्यावर झालेली निवड, हे फैजपूरच्या राजकारणातील सोयीच्या राजकारणाचे उत्तम उदाहरण आहे. आता काँग्रेस शहराध्यक्ष शेख रियाज कारवाईचा बडगा उगारणार असल्याचे सांगत असले, तरी झालेले नुकसान भरून निघणार का? की ही केवळ मलमपट्टी ठरणार? हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. जनतेने ज्यांना विरोधात बसण्यासाठी कौल दिला, त्यांनीच सत्तेतील नेत्यांच्या पतीला खुर्ची दिली, याला लोकशाहीचा विजय म्हणायचे की मतदारांची थट्टा?

राजकीय 'मैत्री' की 'गद्दारी'? फैजपूर पालिकेत काँग्रेसच्या आशीर्वादाने भाजपाचे 'पतीराज' स्वीकृत!                          
Previous Post Next Post