शहादा शहरात दुकाने बंद करण्याच्या वेळेवरून दुजाभाव; नागरिकांचे पोलीस निरीक्षकांना निवेदन सादर... (प्रा. डी. सी. पाटील नंदुरबार जिल्हा विभागीय उपसंपादक)शहादा, दि. 05 : शहादा शहरातील व्यावसायिक प्रतिष्ठाने बंद करण्याच्या वेळेबाबत सध्या शहरात दोन वेगवेगळे नियम पाहायला मिळत असून, यामुळे नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. यासंदर्भात सोमवारी शहादा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक निलेश देसले यांना विविध क्षेत्रातील मान्यवर आणि नागरिकांच्या वतीने निवेदन सादर करण्यात आले. पोलिसांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शहादा बस स्थानक परिसरात प्रवाशांची रात्री उशिरापर्यंत ये-जा सुरू असते. मात्र, या भागातील दुकाने रात्री 10:30 वाजेदरम्यान बंद केली जातात. ज्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होते. याउलट शहरातील गरीब नवाज कॉलनी आणि इतर काही भागांत व्यावसायिक दुकाने रात्री 1 वाजेपर्यंत सुरू असल्याचे चित्र आहे. प्रशासनाचे नियम एकाच शहरात वेगवेगळे का? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.शहरातील सर्वच भागांसाठी दुकाने बंद करण्याची एकच वेळ निश्चित करण्यात यावी. जेणेकरून कोणत्याही एका भागातील व्यापाऱ्यांवर अन्याय होणार नाही आणि प्रवाशांचीही सोय होईल अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.हे निवेदन सादर करताना भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रा.मकरंद पाटील, गटनेत्या तथा नगरसेविका माधवीताई पाटील, शहराध्यक्ष ज्ञानेश्वर चौधरी, भाजपाचे राज्य परिषद सदस्य विनोद जैन, बजरंग दल अध्यक्ष राजा साळी, नगरसेवक ज्ञानेश्वर भिका चौधरी, मनोज चौधरी, अजबसिंग गिरासे, एकनाथ नाईक यांच्यासह भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शेकडो नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
byमीडीया पोलीस टाईम
-
0