आज वर्धा जिल्हाधिकारी कार्यालयात सिकलसेल ॲनेमिया विशेष अभियान, बालवयीन असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम (Childhood NCD Program) तसेच एकात्मिक सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळा (IPHL) यांच्या उद्घाटनाचा भव्य कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. या महत्त्वपूर्ण उपक्रमाचे उद्घाटन वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री मा. श्री. पंकजजी भोयर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. जिल्ह्यातील नागरिकांना दर्जेदार, सुलभ व प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा उपलब्ध करून देणे हा या कार्यक्रमाचा मुख्य हेतू होता.सिकलसेल ॲनेमिया हा आजार प्रामुख्याने आदिवासी व ग्रामीण भागात आढळून येतो. या पार्श्वभूमीवर राबविण्यात येणारे विशेष अभियान अत्यंत उपयुक्त ठरणार असून यामधून नागरिकांमध्ये आजाराबाबत जनजागृती, नियमित तपासणी, योग्य उपचार व समुपदेशन सुविधा अधिक प्रभावीपणे उपलब्ध होतील. सिकलसेल आजाराचे लवकर निदान झाल्यास रुग्णांचे जीवनमान सुधारण्यास मदत होईल तसेच पुढील पिढीमध्ये या आजाराचा प्रसार रोखण्याच्या दृष्टीने हे अभियान महत्त्वाची भूमिका बजावेल.याच कार्यक्रमात बालवयीन असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमालाही प्रारंभ करण्यात आला. सध्याच्या जीवनशैलीतील बदलांमुळे लहान वयातच मधुमेह, रक्तदाब, स्थूलता, हृदयविकार यांसारख्या असंसर्गजन्य आजारांचे प्रमाण वाढत आहे. या कार्यक्रमांतर्गत मुलांची नियमित आरोग्य तपासणी, संतुलित आहार, शारीरिक व्यायाम, मानसिक आरोग्य आणि आरोग्यदायी जीवनशैलीविषयी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. यामुळे बालकांचे आरोग्य बळकट होऊन भविष्यात उद्भवणाऱ्या गंभीर आजारांना प्रतिबंध करता येईल.या सोहळ्यात IPHL (Integrated Public Health Laboratory) या आधुनिक प्रयोगशाळेचे उद्घाटन हा आणखी एक महत्त्वाचा टप्पा ठरला. या प्रयोगशाळेमुळे विविध आजारांचे जलद व अचूक निदान शक्य होणार असून जिल्ह्यातील सार्वजनिक आरोग्य सेवेला नवे बळ मिळणार आहे. रक्त, पाणी, अन्न तसेच संसर्गजन्य व असंसर्गजन्य आजारांच्या तपासण्या एकाच ठिकाणी उपलब्ध होणार असल्याने नागरिकांना वेळेत आणि विश्वासार्ह आरोग्य सेवा मिळू शकणार आहे.या कार्यक्रमास देवळी विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा. श्री. राजेशजी बकाने, मा ना श्री.समीर कुन्नावार हिंगणघाट विधानसभा मतदारसंघाचे,मा. श्रीमती वान्मथी सी. (भा.प्र.से.) जिल्हाधिकारी, वर्धा, मा. श्री. पराग सोमण (भा.प्र.से.) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद वर्धा, मा ना श्री.सौरभ कुमार अग्रवाल आईपीएस वर्धा जिला पोलिस अधीक्षक ,डॉ. शशिकांत शंभरकर उपसंचालक आरोग्य सेवा, नागपूर मंडळ, डॉ. सुमंत वाघ जिल्हा शल्य चिकित्सक, वर्धा, डॉ. स्वप्नील बेले जिल्हा आरोग्य अधिकारी, वर्धा तसेच प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी, आरोग्य विभागाचे अधिकारी, वैद्यकीय तज्ज्ञ उपस्थित होते..मो मकसूद बावा पत्रकार हिंगणघाट जिला वर्धा मिडिया पोलिस टाइम विभागीय उपसंपादक

Previous Post Next Post