(तालुका प्रतिनिधी महेश निमसटकर ) भद्रावती एमआयडीसी परिसरात उद्योग क्षेत्रासाठी महत्त्वाची ठरणारी मोठी घडामोड घडली असून न्यू एरा क्लिनटेक प्रा. लि. आणि ग्रेटा एनर्जी प्रा. लि. यांच्या हरीत पोलाद प्रकल्पांचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रकल्पांमुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होणार असून स्थानिक तरुणांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. यावेळी केंद्रीय कोळसा व खाण मंत्री जी. किशन रेड्डी, आदिवासी विकास मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक वुईके, वित्त व नियोजन राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, खासदार प्रतिभा धानोरकर, आमदार किशोर जोरगेवार, देवराव भोंगळे, करण देवतळे, माजी मंत्री हंसराज अहीर, माजी खासदार अजय संचेती, कोल इंडियाचे चेअरमन संजीव कुमार झा, उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. पी. अनबलगन, ग्रेटा एनर्जीचे चेअरमन नितेश चौधरी, व्यवस्थापकीय संचालक अनुप गोयल, हेमंत पांडे, बाळासाहेब दराडे, तसेच जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, विदर्भात खनिज संपत्ती मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. या संपत्तीचा आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून योग्य वापर करून औद्योगिक विकास साधण्यावर राज्य सरकार भर देत आहे. उद्योग उभारले की केवळ उत्पादन वाढत नाही तर रोजगारनिर्मिती, सेवा क्षेत्राचा विकास आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळते. त्यामुळे उद्योग हे देशाच्या आर्थिक प्रगतीसाठी महत्त्वाचे साधन ठरतात, असे त्यांनी नमूद केले. भविष्यातील उद्योगक्षेत्र हे पर्यावरणपूरक आणि आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित असणार असून ग्रीन स्टीलसारख्या प्रकल्पांना जागतिक स्तरावर मोठी मागणी आहे. त्यामुळे भद्रावती येथे सुरू होणारे हे प्रकल्प औद्योगिकदृष्ट्या महत्त्वाचे ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकल्पांमुळे हजारो कोटींची गुंतवणूक होणार असून स्थानिक तरुणांना प्रशिक्षण देऊन रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यावर भर दिला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. केंद्रीय कोळसा मंत्री जी. किशन रेड्डी यांनी सांगितले की, देशाच्या औद्योगिक विकासात कोळशाची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने कोळशाचा अधिक प्रभावी वापर करता येत असून त्यातून उद्योगांना गती मिळत आहे. भद्रावती परिसरात उभारले जाणारे हे प्रकल्प या भागाच्या विकासासाठी महत्त्वाचे ठरणार असल्याचे त्यांनी नमूद केले. ग्रेटा एनर्जी कंपनीच्या प्रकल्पात हजारो कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असून मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होणार आहे. तर न्यू एरा क्लिनटेक कंपनीकडून उभारण्यात येणारा कोळसा गॅसिफिकेशन आधारित प्रकल्प हा आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित असून देशातील औद्योगिक क्षेत्रासाठी महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. या दोन मोठ्या प्रकल्पांच्या माध्यमातून भद्रावती आणि चंद्रपूर जिल्ह्यात औद्योगिक विकासाला नवी चालना मिळणार असून स्थानिक अर्थव्यवस्थेला बळ मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

