महागाईचा 'तडाखा' अन् सणांचा 'धडाका'देगलूरच्या बाजारपेठेत गुढीपाडवा व ईदची विक्रमी गर्दी..


तालुका प्रतिनिधी देगलूर  (पिंजारी माहेमूद ) मराठी नववर्षाची नवी उमेद घेऊन येणारा गुढीपाडवा आणि पवित्र रमजान ईद या सणांनी देगलूरच्या बाजारपेठेत चैतन्य पसरले आहे. मात्र, यंदा या आनंदाला 'महागाईच्या झळा' सोसाव्या लागत असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या गगनाला मिडलेल्या किमती असूनही, सण साजरा करण्याच्या उत्साहात देगलूरकरांनी बाजारपेठ गजबजवून टाकली आहे. महागाईचा खिसा कापला, पण उत्साह मात्र कायम यामध्ये शंका नाही.

१) गोडधोड महागले साखरेच्या गाठी, श्रीखंड, खवा आणि सुका मेवा यांच्या किमतीत गेल्या वर्षाच्या तुलनेत १५ ते २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. तरीही पाडव्याच्या गुढीसाठी आणि ईदच्या शिरखुरम्यासाठी नागरिक गर्दी करत आहेत.

२) कपड्यांच्या दुकानात 'बार्गेनिंग'चा जोर रेडीमेड कपड्यांच्या किमती वाढल्याने मध्यमवर्गीय कुटुंबांचे बजेट कोलमडले आहे. तरीही ईदच्या निमित्ताने नवीन पोशाख खरेदी करण्यासाठी 'पेंशन'ची दुकाने खचाखच भरली आहेत.

३) फुले अन् फळांचा भाव वधारला-गुढीसाठी लागणारी झेंडूची फुले आणि सणासुदीची फळे यांचे दर दुप्पट झाले आहेत. मात्र, परंपरेसाठी नागरिक आपला खिसा रिकामा करताना मागे-पुढे पाहत नाहीत.

३) व्यापाऱ्यांची कसरत, ग्राहकांची चिंता व्यक्त केली जात आहे.महागाईमुळे ग्राहकांच्या खरेदीची क्षमताकमी झाल्याची भीती व्यापाऱ्यांना होती, परंतु देगलूरच्या ग्रामीण भागातील ग्राहकांनी मोठ्या संख्येने शहरात धाव घेतल्याने बाजारपेठेत पाय ठेवायलाही जागा उरलेली नाही. सणांच्या या 'डबल धमाक्या' मुळे उलाढाल कोर्टीच्या घरात जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे

.४) वाहतुकीचा खोळंबा, पोलिसांची कसरतबाजारपेठेत उसळलेल्या या जनसागरामुळे देगलूरच्या मुख्य रस्त्यांवर वाहतुकीची मोठी कोंडी झाली आहे. दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या रांगा लागल्या असून, वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलीस प्रशासनाला मोठी कसरत करावी लागत आहे. महागाई वाढली असली तरी सण हा सण असतो.वर्षातून एकदा येणाऱ्या या आनंदासाठी आम्ही बजेट थोडे वाढवले आहे, पण परंपरा तर जपलीच पाहिजे. एक स्थानिक ग्राहक, देगलूर
Previous Post Next Post