ग्रामसभा टाळुन कोणाला वाचवले जातेय; आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात शहापूरमध्ये नागरिकांचा आक्रोश.
पिंजारी माहेमूद तालुका
प्रतिनिधी: देगलूर
देगलूर:शहापूर ग्रामपंचायतीतील कोट्यवधी रुपयांच्या कथित आर्थिक गैरव्यवहाराच्या पार्श्वभूमीवर ग्रामसभा न घेण्याचा प्रकार समोर आल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. मागील काही वर्षांतील विकासकामांवर मोठ्या प्रमाणात खर्च दाखवण्यात आला असला, तरी प्रत्यक्षात कामे अपूर्ण अथवा निकृष्ट असल्याचे आरोप होत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, सुमारे ३ कोटी ४० लाख रुपयांचा खर्च दाखवण्यात आला असून, प्रत्यक्ष विकासकामे
अत्यल्प झाल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. लेखापरीक्षण अहवाल, बँक व्यवहार आणि कॅशबुक यामध्ये तफावत आढळल्याचा मुद्दा 'जागरूक होऊ' समूहाने पुढे आणला आहे. दरम्यान, २६ जानेवारी रोजी घेणे अनिवार्य असलेली ग्रामसभा घेण्यात आली.लाल बहादूर शास्त्री पंचायत भवने शहापूर नाही, तसेच १७ मार्च रोजी ग्रामसभा घेण्याबाबत सादर केलेल्या अर्जावरही अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. यामुळे ग्रामपंचायतीकडून माहिती जाणीवपूर्वक दडवली जात असल्याचा संशय नागरिक व्यक्त करीत आहेत. ग्रामसभा ही गावाच्या कारभाराचा हिशोब मांडण्याचे व नागरिकांना प्रश्न विचारण्याचे प्रमुख व्यासपीठ असताना, तीच सभा टाळली जात असल्याने पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. लेखापरीक्षणातील आक्षेप, निधीचा वापर, अपूर्ण कामे आणि इतर प्रशासकीय बाबींवर चर्चा होऊ नये, यासाठीच ग्रामसभा टाळली जात असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांकडून कोणतीही स्पष्ट भूमिका मांडण्यात आलेली नाही. मात्र, नागरिकांनी लवकरात लवकर ग्रामसभा घेऊन सर्व आर्थिक व्यवहारांचा खुलासा करावा, अशी जोरदार मागणी केली आहे.

