एकता संघटनेकडून परतवाडा आणि नाशिक येथील गंभीर घटनांचा तीव्र निषेध; कठोर कारवाईची मागणी

**एकता संघटनेकडून परतवाडा आणि नाशिक येथील गंभीर घटनांचा तीव्र निषेध; कठोर कारवाईची मागणी

(महाराष्ट्र राज्य विभागीय संपादक रावेर / शेख शरीफ)

परतवाडा येथे मुलींच्या रील्सचा गैरवापर करून अनैतिक कृत्ये केल्याच्या धक्कादायक घटना समोर आल्या आहेत. तर नाशिक येथे एका मल्टीपर्पज कंपनीमार्फत धर्मांतराच्या नावाखाली संशयास्पद हालचाली होत असल्याची माहिती समोर आली आहे. या दोन्ही घटना समाजाला हादरवून सोडणाऱ्या असून अशा विकृत प्रवृत्तीला अजिबात सहन केले जाणार नाही, असा ठाम इशारा एकता संघटनेकडून देण्यात आला आहे.
संघटनेने स्पष्ट शब्दांत सांगितले की,
हे दोन्ही प्रकार पूर्णपणे गुन्हेगारी स्वरूपाचे असून त्यांना कोणत्याही जाती किंवा धर्माशी जोडण्याचा प्रयत्न करणे म्हणजे समाजात द्वेष पसरवण्यासारखे आहे. कोणताही धर्म अशा कृत्यांना मान्यता देत नाही.
यावेळी एकता संघटनेचे समन्वयक फारुक शेख यांनी माध्यमे, राजकीय आणि सामाजिक संघटनांना इशारा देत सांगितले की,
खोट्या बातम्या पसरवून किंवा एखाद्या विशिष्ट समाजाला लक्ष्य करून वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न झाल्यास तो सहन केला जाणार नाही.
त्यांनी प्रशासनालाही स्पष्टपणे सांगितले की,
या प्रकरणातील सर्व आरोपी आणि संबंधित व्यक्तींवर तात्काळ व कठोर कारवाई करण्यात यावी. केवळ अटकच नव्हे, तर त्यांच्या बेकायदेशीर मालमत्तेवरही कायदेशीर कारवाई (बुलडोझर कारवाईसह) करण्यात यावी. अमरावती येथे जशा प्रकारे बेकायदेशीर बांधकामांवर कारवाई झाली, त्याच धर्तीवर नाशिकमधील संबंधितांवरही कोणताही भेदभाव न करता कारवाई करावी.
एकता संघटनेचे कार्याध्यक्ष मौलाना रहीम पटेल यांनी प्रशासनाला इशारा देत म्हटले की,
जर तात्काळ आणि न्याय्य कारवाई झाली नाही, तर संघटनेकडून लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.
पालकमंत्र्यांमार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांना पालकमंत्री नामदार गुलाबराव पाटील यांच्या मार्फत, तसेच आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे, आमदार संजय सावकारे, आमदार अनिल पाटील आणि जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या उपस्थितीत हे निवेदन सादर करण्यात आले.
यावेळी संघटनेच्या वतीने फारुक शेख, हाफिज रहीम पटेल, अनीस शाह, अनवर शिकलगार, नजमुद्दीन शेख, सलीम इनामदार, मजहर पठाण, मुझफ्फर खान, ताहेर शेख, मौलाना गुफरान, आरिफ देशमुख, सदाकत सैयद, अब्दुल रऊफ, सईद शेख, साबिर शेख, रफीक पठाण, अख्तर शेख, वसीम शेख, जगी पटेल आदी उपस्थित होते.
Previous Post Next Post