*“वेळ पाळा, अन्यथा रजा कपात!”*
*@)> तहसिलदार भारत गंगावणे.*
मानवत परभणी जिल्हा विभागीय संपादक/ अनिल चव्हाण.
———————————
वेळ पाळा अन्यथा रजा कपात करण्याचा ईशारा
पाथरी तहसील कार्यालयात शिस्तीचा बडगा तहसीलदार भारत गंगावणे यांची कडक कारवाईची मोहीम सुरू
सविस्तर वृत्त असे की,
पाथरी तहसील कार्यालयात आता “वेळेवर या आणि जबाबदारीने काम करा” हा संदेश प्रत्यक्षात उतरविण्यासाठी प्रशासनाने कडक भूमिका घेतली आहे. नव्याने रुजू झालेले कर्तव्यदक्ष तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी भारत गंगावणे यांनी कार्यालयीन शिस्तीबाबत कठोर पावले उचलत अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी वेळेवर उपस्थिती अनिवार्य केली आहे. यासंदर्भात १२ मे रोजी परिपत्रक जारी करण्यात आले असून १३ मे पासून नवीन नियमांची अंमलबजावणी सुरू करण्यात आली.
लोकाभिमुख प्रशासन अधिक गतिमान आणि प्रभावी करण्याच्या उद्देशाने हे आदेश लागू करण्यात आल्याचे परिपत्रकात नमूद करण्यात आले. कार्यालयीन वेळेचे काटेकोर पालन करून नागरिकांची कामे वेळेत पूर्ण व्हावीत, यासाठी प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्याने निर्धारित वेळेत कार्यालयात उपस्थित राहणे बंधनकारक करण्यात आले आहे.
नवीन आदेशानुसार गट *‘ड’* कर्मचाऱ्यांसाठी सकाळी ९.३० ते सायंकाळी ६.३० अशी वेळ निश्चित करण्यात आली. तर गट ‘अ’ ते ‘क’ संवर्गातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सकाळी ९.४५ ते सायंकाळी ६.१५ या वेळेत उपस्थित राहणे आवश्यक राहणार आहे. सर्वांनी उपस्थिती नोंदवहीत सही करणे ही अनिवार्य करण्यात आले आहे.
तहसील प्रशासनाने केवळ सूचना देऊन न थांबता शिस्तभंग करणाऱ्यांवर थेट कारवाई करण्याचा इशाराही दिला आहे. सलग तीन दिवस उशिरा येणाऱ्या अथवा विनाकारण गैरहजर, कामचूकार पणा करणाऱ्या अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांची एक दिवसाची रजा कपात करण्यात येणार आहे. तसेच वारंवार सूचना देऊन ही वेळेचे पालन न करणाऱ्यांची त्या दिवसाची अनुपस्थिती ग्राह्य धरून विनावेतन नोंद करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. संबंधितांविरुद्ध नियमानुसार प्रशासकीय कारवाई ही प्रस्तावित करण्यात येणार असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
तहसीलदार भारत गंगावणे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर कार्यालयीन कामकाजात शिस्त, वेळेचे व्यवस्थापन आणि नागरिकांच्या कामांना प्राधान्य देण्यावर विशेष भर दिला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांमध्ये हालचाल वाढली असून, प्रशासन अधिक जबाबदार आणि कार्यक्षम होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
दरम्यान, या निर्णयाचे नागरिकांमधून स्वागत होत असून शिस्तीच्या या मोहिमेमुळे तहसील कार्यालयातील कामे अधिक जलद, पारदर्शक आणि परिणामकारक पद्धतीने मार्गी लागतील, अशी अपेक्षा नागरिकांतून व्यक्त केली जात आहे.
***

