उष्माघातामुळे शेतकरी मृत्यूंचा गोपीनाथ मुंडे,अपघात विमा योजनेत समावेश करा.
नांदेड जिल्हा प्रतिनिधी मारोती एडकेवार
नांदेड : राज्यातील वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर शेतातील कामे करताना उष्माघातामुळे शेतकऱ्यांचे मृत्यू होत असून शासनाच्या कृषी विभागाच्या गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेत उष्माघातामुळे शेतकरी मृत्यूचा समावेश करण्यात यावा, अशी मागणी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे तालुकाध्यक्ष सतिश पांडवे यांनी देगलूरचे उपजिल्हाधिकारी यांच्यामार्फत राज्याचे कृषी मंत्री ना.दत्तात्रय भरणे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत राबविण्यात येणारी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना ही शेतकरी कुटुंबांना संकट काळात आर्थिक आधार देणारी महत्त्वपूर्ण कल्याणकारी योजना आहे. मात्र या योजनेत उष्माघातामुळे होणाऱ्या मृत्यूबाबत स्पष्ट तरतूद नसल्याने अनेक शेतकरी कुटुंबे मदतीपासून वंचित राहत आहेत.
सध्या राज्यात तीव्र उष्णतेची लाट असून अनेक भागांमध्ये तापमान ४४ ते ४६ अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचत आहे. अशा परिस्थितीत शेतकरी हळद, कांदा, भुईमूग आदी पिकांची काढणी तसेच खरिप हंगामपूर्व मशागतीची कामे करत आहेत. कडक उन्हात दीर्घकाळ काम करताना उष्माघातामुळे शेतकऱ्यांचे मृत्यू होत असल्याच्या घटना वाढत असल्याने शासनाने तातडीने या गंभीर प्रश्नाची दखल घेण्याची आवश्यकता असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
उष्माघातामुळे होणाऱ्या शेतकरी मृत्यूंचा अपघात विमा योजनेत समावेश केल्यास मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत मिळून मोठा दिलासा मिळेल, अशा आग्रही मागणीचे निवेदन नायब तहसीलदार विलास तेलंग यांना पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे देगलूरच्या वतीने देण्यात आले. यावेळी तालुकाध्यक्ष सतीश पांडवे, सूर्याजी पाटील जाधव, प्रा.निवृत्ती भागवत, किरण कांबळे, देवेंद्र कांबळे व गौतम वनंजे आदी उपस्थित होते.

