बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीची बैठक
"धार्मिक सलोखा व एकात्मतेची भावना जपत बकरी ईद साजरी करावी"
*@)}जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण*
———————————
मानवत परभणी जिल्हा विभागीय संपादक/ अनिल चव्हाण
परभणी जिल्हात बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आज शांतता समितीची बैठक संपन्न झाली. नागरिकांनी धार्मिक सलोखा, शांतता आणि एकात्मतेची भावना जपत बकरी ईद उत्साहात साजरी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी केले.
बैठकीस नूतन पोलीस अधीक्षक पंकज कुमावत, निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, विविध विभागांचे अधिकारी-कर्मचारी तसेच शांतता समितीचे अध्यक्ष ,सदस्य व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
यावेळी प्रथम बकरी ईदच्या शुभेच्छा देऊन जिल्हाधिकारी श्री. चव्हाण म्हणाले की, सणांच्या काळात कोणाच्याही धार्मिक भावना दुखावल्या जाणार नाहीत याची सर्वांनी दक्षता घ्यावी. बकरी ईदनिमित्त जनावरांची कुर्बानी दिली जाते. मात्र, जनावरांची अवैध वाहतूक करणाऱ्यांवर संबंधितांनी कारवाई करावी. कचरा रस्त्यावर पडणार नाही तसेच त्याची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने विशेष लक्ष द्यावे. सणांच्या काळात स्वच्छता राखणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असल्याचेही त्यांनी सांगितले.
महाराष्ट्रामध्ये गोवंश हत्या प्रतिबंधक कायदा लागू असून कोणीही गोवंश हत्या करू नये. तसे आढळून आल्यास कारवाई करण्यात येईल. शहरी तसेच ग्रामीण भागात शांतता अबाधित राहावी यासाठी आवश्यक बंदोबस्त ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या. सोशल मीडियावर वादग्रस्त संदेश किंवा व्हिडिओ प्रसारित करून वातावरण बिघडविणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
पोलीस अधीक्षक श्री. पंकज कुमावत म्हणाले की, बकरी ईद शांततेत आणि उत्साहात साजरी व्हावी यासाठी पोलीस प्रशासन सतर्क आहे. ईदनिमित्त नमाजासाठी मोठ्या संख्येने नागरिक ईदगाह मैदानावर येत असल्याने आवश्यक सुरक्षा व्यवस्था करण्यात येणार आहे. समाजांमध्ये तेढ निर्माण होईल, असे संदेश किंवा व्हिडिओ कोणत्याही समाज माध्यमांवर प्रसारित करू नयेत, असे आवाहन त्यांनी केले.
जिल्ह्यात कोणतीही अप्रिय घटना घडल्यास नागरिकांनी तात्काळ 112 या क्रमांकावर पोलीस यंत्रणेशी संपर्क साधावा. सोशल मीडियावर पोलीस प्रशासनाचे विशेष लक्ष असून कायदा व सुव्यवस्थेला बाधा आणणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल. कोणीही कायदा हातात घेऊ नये, संविधानाने दिलेल्या अधिकारांचा योग्य वापर करावा तसेच परवानगी असलेल्या जनावरांचेच बलिदान द्यावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांमध्ये मकोका अंतर्गत कारवाई करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.
बकरी ईद सण सुरळीत आणि उत्साहात साजरा व्हावा यासाठी महानगरपालिकेने आवश्यक नियोजन करावे, अशा सूचनाही बैठकीत देण्यात आल्या. यावेळी शांतता समिती सदस्यांनी विविध सूचना प्रशासनाकडे मांडल्या.
****

