"11 वर्षांपूर्वीच्या निवासी अतिक्रमणधारकांना हक्काची जमीन मिळणार कधी? फैजपूरमध्ये प्रशासनाच्या दिरंगाईविरोधात MPJ जिल्हाध्यक्ष मुस्तकीम खान आक्रमक!"
"जिल्हाधिकाऱ्यांचे स्पष्ट आदेश, तरीही फैजपूर नगर परिषद व प्रशासनाची सुस्ती; निवासी अतिक्रमण नियमितीकरण प्रक्रियेला तात्काळ सुरुवात करण्याची मागणी"
(महाराष्ट्र राज्य विभागीय संपादक रावेर / शेख शरीफ)
महाराष्ट्र शासनाच्या ऐतिहासिक निर्णयानुसार दिनांक १ जानेवारी २०११ पूर्वी शासकीय जमिनीवर अस्तित्वात असलेल्या निवासी अतिक्रमणांचे नियमन (Regularization) करण्याची प्रक्रिया राज्यभर राबविण्यात येत असताना, फैजपूर नगर परिषद क्षेत्रात अद्याप कोणतीही प्रभावी कार्यवाही सुरू नसल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर MPJ जळगाव जिल्हाध्यक्ष मुस्तकीम खान यांनी उपविभागीय अधिकारी, फैजपूर विभाग तसेच मुख्याधिकारी, नगर परिषद फैजपूर यांना स्वतंत्र निवेदने देऊन तात्काळ कारवाईची मागणी केली आहे.
महसूल व वन विभागाच्या दिनांक २५ मार्च २०२६ च्या शासन निर्णयानुसार तसेच जिल्हाधिकारी जळगाव यांच्या दिनांक २३ एप्रिल २०२६ च्या आदेशानुसार एप्रिल ते जुलै २०२६ दरम्यान अतिक्रमणधारकांची माहिती संकलित करणे, सर्वेक्षण करणे, पात्र-अपात्र यादी तयार करणे, अर्ज मागविणे आणि मंजुरीसाठी प्रस्ताव पाठविणे अशी संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करणे अपेक्षित होते.
मात्र, फैजपूरमध्ये या प्रक्रियेबाबत कोणतीही ठोस हालचाल दिसून येत नसल्याने अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या नागरिकांमध्ये संभ्रम, अस्वस्थता आणि नाराजी वाढत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
मुस्तकीम खान यांनी प्रशासनाला दिलेल्या निवेदनात संबंधित समिती तात्काळ गठीत करून पात्र अतिक्रमणधारकांची माहिती संकलित करावी, सर्वेक्षण व मोजणी करून स्वतंत्र यादी प्रसिद्ध करावी तसेच आतापर्यंत झालेल्या कार्यवाहीचा अहवाल सार्वजनिक करावा, अशी मागणी केली आहे.
याशिवाय शासन निर्णय आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशांचे काटेकोर पालन करून पात्र नागरिकांचे प्रस्ताव मंजुरीसाठी त्वरित पुढे पाठविण्यात यावेत, अशीही मागणी करण्यात आली आहे.
स्थानिक नागरिकांच्या मते, शासनाने दिलेल्या या महत्त्वपूर्ण संधीचा लाभ हजारो कुटुंबांना मिळू शकतो. मात्र प्रशासकीय दिरंगाईमुळे ही प्रक्रिया रखडल्यास नागरिकांना मोठा फटका बसू शकतो. त्यामुळे आता उपविभागीय अधिकारी आणि नगर परिषद प्रशासन या निवेदनाची कितपत गंभीर दखल घेते, याकडे संपूर्ण फैजपूर शहराचे लक्ष लागले आहे.
"शासनाचे आदेश कागदावरच का? – फैजपूरमधील निवासी अतिक्रमणधारकांचा संतप्त सवाल"
निवेदनाच्या माध्यमातून प्रशासनाला दिलेला हा इशारा भविष्यात मोठ्या लोकआंदोलनाचे रूप धारण करू शकतो, अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू असून, आता संबंधित विभागाकडून तात्काळ कार्यवाही होते की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सदर निवेदन देताना MPJ जळगाव जिल्हाध्यक्ष मुस्तकीम खान, MPJ जिल्हा उपाध्यक्ष शेख अहमद मुल्ला, MPJ फैजपूर शहराध्यक्ष रहीमदिन, महेबूब खान, छबू तडवी, अरमान तडवी, जावेद अहमद काझी तसेच फिरोज खान उपस्थित होते.

