धारदार तलवारीसह गावात दहशत माजवणारा युवक पोलिसांच्या जाळ्यात.

धारदार तलवारीसह गावात दहशत माजवणारा युवक पोलिसांच्या जाळ्यात.

पिंजारी माहेमूद 
तालुका प्रतिनिधी देगलूर 

देगलूर :चाकूर गावात हातात धारदार तलवार घेऊन मोटारसायकलवर फिरत नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या एका युवकाला देगलूर पोलिसांनी शिताफीने पकडून ताब्यात घेतले. या कारवाईत आरोपीकडून एक धारदार तलवार आणि हिरो कंपनीची स्प्लेंडर प्लस मोटारसायकल जप्त करण्यात आली असून त्याच्याविरुद्ध देगलूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या धाडसी कारवाईमुळे परिसरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून देगलूर पोलिसांच्या तत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, करडखेड बीट परिसरात बौट जमादार साहेबराव सगरोळीकर आणि संतोष बॉकलवार हे गुन्ह्यांच्या तपासात व्यस्त असताना त्यांना गोपनीय माहिती मिळाली. चाकूर गावात एक युवक हातात धारदार तलवार घेऊन मोटारसायकलवरून फिरत असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करत असल्याची माहिती त्यांला प्राप्त झाली ही माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ हालचाली सुरु केल्या.पोलीस अधीक्षक अविनाश कुमार, अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुरव आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूर्यमोहन बोलावाड यांनी तातडीने कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार बीट जमादार साहेबराव सगरोळीकर व संतोष बोकलवार यानी सहकाऱ्यांसह चाकूर गाव गाठून संशयिताचा शोध सुरू केला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूर्यमोहन बोलमवाड यांच्या नेतृत्वाखाली देगलूर पोलिसांची धडाकेबाज कारवाईदरम्यान, संबंधित युठक मोटारसायकलवरून गावातील विविध भागांत फिरत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्याच्या हातात धारदार तलवार असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी अत्यंत सावधगिरीने त्याचा पाठलाग केला. काही काळ पाठलाग केल्यानंतर पोलिसांनी शिताफीने आणि धाडसी पद्धतीने त्या युवकाला फिल्मी स्टाईलने त्याला ताब्यात घेतले. प्रत्यक्ष कारवाईदरम्यान पोलिसांनी दाखविलेल्या धैर्याची परिसरात मोठी चर्चा होत आहे.
ताब्यात घेतल्यानंतर करण्यात आलेल्या चौकशीत संबंधित युवकाची ओळख आनंदा रामराव आवळे (वय 28, रा. चाकूर, ता. देगलूर) अशी पटली. त्याच्याकडून एक धारदार तलवार आणि हिरो कंपनीची स्प्लेंडर प्लस मोटारसायकल जप्त करण्यात आली. त्यानंतर आरोपीला देगलूर पोलीस ठाण्यात आणून त्याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील तसेच शस्त्रासंदर्भातील संबंधित कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.या कारवाईमुळे चाकूर गावासह परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. गावात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीवर पोलिसांनी वेळीच कारवाई केल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी देगलूर पोलीस सातत्याने दक्ष असल्याचे या कारवाईतून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.या यशस्वी आणि धडाकेबाज कारवाईचे श्रेय वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूर्यमोहन बोलमवाड यांच्या अचूक नियोजनाला, तसेच बौट जमादार साहेबराव सगरोळीकर यांच्या धाड‌सी, तत्पर व कर्तव्यदक्ष कामगिरीला श्रेय दिले जात आहे. देगलूर पोलिसांच्या या कारवाईमुळे परिसरात कायद्याचा धाक कायम असून नागरिकांकडून पोलिसांच्या कार्यक्षमतेचे विशेष कौतुक केले जात आहे.
Previous Post Next Post