भद्रावती आयटीआय प्रवेश प्रक्रियेला वेग ; 21 जून पर्यंत अर्ज भरण्याची संधी
महेश निमसटकर
भद्रावती चंद्रपूर जिल्हा विभागीय संपादक
भद्रावती, दि. 10 : कौशल्य विकास, उद्योजकता व नाविन्यता विभाग तसेच व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयांतर्गत ऑगस्ट 2026 सत्रासाठी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून शहीद नानक भील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आदिवासी), भद्रावती, जिल्हा चंद्रपूर येथे विविध व्यवसायांमध्ये प्रवेशासाठी जागा उपलब्ध आहेत.
प्रवेश सत्र 2026-27 करिता संस्थेत आयसीटीएसएम (ICTSM), रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशन टेक्निशियन, पंप ऑपरेटर कम मेकॅनिक, प्लंबर, सेविंग टेक्नॉलॉजी तसेच कॉस्मेटोलॉजी या व्यवसायांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. विशेष म्हणजे प्लंबर व सेविंग टेक्नॉलॉजी या व्यवसायांसाठी 10 वी उत्तीर्ण तसेच अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांनाही प्रवेशाची संधी उपलब्ध आहे.
इच्छुक विद्यार्थ्यांनी ऑनलाईन प्रवेश अर्ज भरणे, कागदपत्र पडताळणी, प्रवेश स्वीकृती व निश्चिती यासाठी संस्थेशी संपर्क साधावा. प्रवेश अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 21 जून असून विद्यार्थ्यांनी माहिती पुस्तिकेतील नियम व अटींचा अभ्यास करूनच अर्ज सादर करावा.
पात्र उमेदवारांनी दहावीची गुणपत्रिका, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचे प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, नॉन-क्रीमीलेयर प्रमाणपत्र तसेच इतर आवश्यक कागदपत्रांसह प्रवेश प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहन संस्थेच्या प्राचार्य प्रणाली एच. दहाटे यांच्या मार्फत करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी सौ. व्ही. ए. पुनवटकर (मो. 9860454474), कु. वाय. व्ही. बोपले (मो. 8208846827) यांच्याशी संपर्क साधावा. तसेच ऑनलाईन फॉर्म भरण्यासंदर्भातील माहितीसाठी एस. पी. वावरे (मो. 9730991455) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

